जयंतीनिमित्त अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

पुणे - अण्णा भाऊ साठे यांच्या 98 व्या जयंतीनिमित्त बुधवारी (ता. 1) सारस बागेसमोरील त्यांच्या स्मारकातील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हजारो कार्यकर्त्यांनी त्यांना अभिवादन केले. 

पुणे - अण्णा भाऊ साठे यांच्या 98 व्या जयंतीनिमित्त बुधवारी (ता. 1) सारस बागेसमोरील त्यांच्या स्मारकातील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हजारो कार्यकर्त्यांनी त्यांना अभिवादन केले. 

केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पहाटे स्मारकास भेट देऊन साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, परशुराम वाडेकर, रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष अशोक कांबळे, सुषमा कांबळे, सुनील जाधव, हनुमंत गायकवाड उपस्थित होते. विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते, नगरसेवक, पदाधिकारी यांनीदेखील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानिमित्ताने मिरवणुकाही काढण्यात आल्या होत्या. मातंग समाजाला आरक्षण देण्यासाठी, तसेच साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा या मागणीसह, मातंग भूमिहीनांचे प्रश्‍न, बेरोजगार तरुणांना रोजगार, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या कर्जमाफीचा प्रश्‍न सोडविण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच, अण्णा भाऊ यांचे जन्मगाव असलेल्या वाटेगाव (सांगली) येथील स्मारकाचे सुशोभीकरण व त्यास आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठीही पाठपुरावा करणार आहोत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय)ने देखील त्यास पाठिंबा दर्शविल्याची माहिती मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे यांनी दिली. 

पुणे शहर जिल्हा मातंग समाजातर्फे साहित्य क्रांती दिंडी काढण्यात आली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, अभय छाजेड, लता राजगुरू, डॉ. भरत वैरागे, भगवान वैराट, सचिन जोगदंड, प्रकाश वैराळ, अशोक कोवळे, सुरेखा भालेराव, विठ्ठल गायकवाड, रवी आरडे, रवी पाटोळे उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, ""अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याची नाळ तळागाळातील माणसाच्या दुःखाशी जोडलेली होती. लाल बावटा पथकाद्वारे समाजाच्या प्रबोधनाचा विडा उचलला. शाहिरीद्वारे सामाजिक क्रांतीची बीजे रोवली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचे मोठे योगदान होते.'' 

स्मारकासमोर यानिमित्ताने अभिवादन सभा घेण्यात आली. रिपब्लिकन घरेलू कामगार सेनेच्या अध्यक्षा अनिता लोंढे, कामगार नेते जगन्नाथ गायकवाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर कार्यवाह महेश करपे यांच्या हस्ते साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. राष्ट्रीय चर्मकार संघ, गटई कामगार सेल यांच्यातर्फे पुणे शहर निरीक्षक तुळशीराम साळुंके यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.

Web Title: anna bhau sathe jayanti celebration