"अण्णा भाऊ साठे'चा पडदा महिन्यानंतरही बंदच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

गेल्या महिन्यात धुवाधार पावसाचे पाणी शिरल्यामुळे बंद पडलेले सातारा रस्त्यावरील अण्णा भाऊ साठे सभागृह महिना उलटून गेला, तरी पुन्हा सुरू होण्याची चिन्हे दिसेनात.

पुणे -: गेल्या महिन्यात धुवाधार पावसाचे पाणी शिरल्यामुळे बंद पडलेले सातारा रस्त्यावरील अण्णा भाऊ साठे सभागृह महिना उलटून गेला, तरी पुन्हा सुरू होण्याची चिन्हे दिसेनात. या सभागृहाच्या पार्किंगमधील पाणी काढण्यात आले असले, तरी वातानुकूलन यंत्रणा बंद आहे. ती दुरुस्त करण्यात महापालिकेची चालढकल सुरूच आहे. 

सातारा रस्ता परिसराला पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. अण्णा भाऊ साठे नाट्यगृह आणि पार्किंगमध्ये पाणी शिरले होते. तेव्हापासून हे सभागृह बंद आहे. सध्या तेथे कोणत्याही नाटकाचे प्रयोग वा अन्य कार्यक्रमही होत नाहीत. नाट्यगृहातील वातानुकूलन यंत्रणा पार्किंगच्या मागील बाजूस असल्याने तेथे पाणी शिरल्यानंतर ही यंत्रणा पाण्यात गेली होती. त्यामुळे ती पूर्णत: नादुरुस्त झाल्याचे सांगण्यात आले. 

नाट्यगृहाचे व्यवस्थापक अरविंद भोसले यांनी सांगितले, की या परिसरात सतरा फुटांपर्यंत पाणी होते. ते नाट्यगृहातही शिरले. पिटात पाणी होते. ते उपसण्याचे काम सुरू केले होते. आता ते पूर्ण होत आले आहे. नाट्यगृहातील मॅट काही प्रमाणात खराब झाले आहे, ते बदलायचे आहे. विद्युत यंत्रणेचे काम झाले आहे; पण वातानुकूलन यंत्रणा पाण्यात असल्याने नादुरुस्त झाली आहे. त्यामुळे नाट्यगृह सुरू करता येत नाही. 

मुख्य व्यवस्थापक सुनील मते यांनीही वातानुकूल यंत्रणा बंद असल्याने नाट्यगृह बंद असल्याचे सांगितले. याबाबत महानगरपालिकेचा विद्युत आणि भवन विभागाला पत्र देण्यात आहे; पण नाट्यगृह नेमके कधी सुरू होणार याबाबत त्यांच्याकडूनही काही सांगण्यात येत नाही. वातानुकूलन यंत्रणा दुरुस्त करण्याचे काम मोठे आहे. ते झाल्याशिवाय नाट्यगृह सुरू करता येणार नाही, असे ते म्हणाले. 

आणखी महिनाभराची प्रतीक्षा 
महापालिकेच्या विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदुल यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांचा मोबाईल बंद होता. त्यामुळे वातानुकूलन यंत्रणेची दुरुस्ती कधी होणार, याबाबत खुलासा होऊ शकलेला नाही; पण सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार, ही यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी मोठा खर्च येणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करावी लागणार असल्याने आणखी पंधरा किंवा त्याहून अधिक दिवस तरी नाट्यगृह सुरू होऊ शकणार नाही. तोपर्यंत रसिकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Annabhau Sathe Theatre

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: