महाविद्यालयीन निवडणूक कार्यक्रम जाहीर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अखेर पुणे, नगर आणि नाशिक या जिल्ह्यांतील संलग्न महाविद्यालयांतील खुल्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार महाविद्यालयीन विद्यार्थी परिषदेसाठी सात सप्टेंबर रोजी, तर विद्यापीठ विद्यार्थी परिषदेसाठी २४ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अखेर पुणे, नगर आणि नाशिक या जिल्ह्यांतील संलग्न महाविद्यालयांतील खुल्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार महाविद्यालयीन विद्यार्थी परिषदेसाठी सात सप्टेंबर रोजी, तर विद्यापीठ विद्यार्थी परिषदेसाठी २४ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे.

महाविद्यालयातील निवडणुकांसाठी २९ ऑगस्टपासून अर्ज भरता येईल. सात सप्टेंबर रोजी मतदान झाल्यानंतर लगेचच मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. विद्यापीठ विद्यार्थी परिषदेसाठी १४ सप्टेंबरपासून अर्ज भरता येतील. या निवडणुकीचा निकाल २७ सप्टेंबर रोजी घोषित केला जाईल. महाविद्यालयांबरोबर विद्यापीठातील शैक्षणिक विभागातील निवडणूक एका दिवशी होतील. या निवडणुकीत महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी महाविद्यालय विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी आणि राखीव प्रवर्गाचा प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान करतील. महाविद्यालयाच्या विद्यार्थी परिषदेसाठी राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, क्रीडा आणि सांस्कृतिक विभागांतून चार जणांची गुणवत्तेच्या आधारावर प्राचार्य निवड करतील.

विद्यापीठातील शैक्षणिक विभागातील वर्ग प्रतिनिधी हेदेखील याच पद्धतीने चार पदाधिकारी निवडून देतील. महाविद्यालय आणि विद्यापीठ विभागांतून निवडून आलेले हे पदाधिकारी नंतर विद्यापीठ विद्यार्थी परिषदेसाठी उमेदवारी करू शकतील. तसेच, उर्वरित पदाधिकारी त्यांना मतदान करतील. त्यातून विद्यापीठ परिषदेचा अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी आणि राखीव प्रवर्गाचा प्रतिनिधी निवडला जाईल. त्यानंतर विद्यापीठ परिषदेचा अध्यक्ष हा महाविद्यालय स्तरावर एनएसएस, एनसीसी, क्रीडा आणि सांस्कृतिक विभागातून निवडलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या चार विद्यार्थ्यांची विद्यापीठ विद्यार्थी परिषदेसाठी निवड करील. निवडून आलेले चार आणि नामनिर्देशित चार अशा आठ सदस्यांची ही परिषद असेल.

विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी म्हणाले, ‘‘निवडणूक प्रक्रियेबाबत विद्यापीठात कार्यशाळा घेऊन सर्व प्राचार्यांना कार्यवाहीबद्दल सूचित करण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी प्रत्येक महाविद्यालयांत एक निवडणूक अधिकारी असेल. त्याच महाविद्यालयातील निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी त्याच्यावर असेल. प्रत्येक महाविद्यालयातील निवडणूक अधिकाऱ्याची नावे मागविण्यात येत असून, त्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल.’’

महाविद्यालयीन निवडणुकीचे यश हे विद्यार्थ्यांच्या सकारात्मक भूमिकेवर अवलंबून आहे. विद्यार्थ्यांमधील नेतृत्व घडविणारी ही निवडणूक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रगल्भपणे या प्रक्रियेत सहभागी होऊन सहकार्य करावे.
- डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू, पुणे विद्यापीठ

निवडणूक होणारी महाविद्यालये, संस्था -     ७५०
विद्यापीठ विभाग -     ४५

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Announces College Election Program