दौंड-पुणे पॅसेंजरला आणखी एक डबा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

पुणे - दौंड आणि पुण्याला जोडणाऱ्या पॅसेंजरला 42 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या गाडीला आता आणखी एक जादा डबा जोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने घेतला आहे. त्यामुळे या गाडीची क्षमता आणखी 105 प्रवाशांनी वाढली आहे. 

पुणे - दौंड आणि पुण्याला जोडणाऱ्या पॅसेंजरला 42 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या गाडीला आता आणखी एक जादा डबा जोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने घेतला आहे. त्यामुळे या गाडीची क्षमता आणखी 105 प्रवाशांनी वाढली आहे. 

नोकरी, व्यवसाय, शिक्षण आदी विविध कारणांमुळे दौंडहून पुण्याला येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासाठी 42 वर्षांपासून दौंड-पुणे पॅसेंजर सोडण्यात येत आहे. दौंडवरून ही गाडी सकाळी 7 वाजून 05 मिनिटांनी सुटते, तर पुण्याला सकाळी आठ वाजून 50 मिनिटांनी पोचते. सकाळी सुमारे दोन तासांच्या आत ही गाडी पुण्यात पोचत असल्यामुळे या गाडीसाठी प्रवाशांची गर्दी असते. दौंडवरून पुण्याला येण्यासाठी दिवसभरात 10-12 पॅसेंजर गाड्या आहेत. त्याशिवाय एक्‍स्प्रेस गाड्याही उपलब्ध आहेत. परंतु, ही पॅसेंजर प्रवाशांसाठी सोयीची ठरत आहे. तिला 42 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पुणे विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांनी पुढाकार घेऊन पुणे रेल्वे स्थानकावर एक छोटेखानी कार्यक्रम गुरुवारी आयोजित केला होता. त्यात या गाडीतून उतरणाऱ्या प्रवाशांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच, शुक्रवारपासून या गाडीला आणखी एक डबा जोडण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. 

राहुल आवारेच्या पदकाबद्दल गौरव 
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये राहुल आवारे याला सुवर्ण पदक मिळाल्याबद्दल मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने पेढे वाटून बुधवारी आनंद व्यक्त केला. 11 ऑगस्ट 2011 मध्ये राहुल पुणे विभागात रुजू झाला. गेल्यावर्षी 3 जानेवारीला कार्यालय अधीक्षक म्हणून त्याची बढती झाली आहे. राहुल परतल्यावर त्याच्या स्वागतासाठी सत्काराचा कार्यक्रम आयोजित करणार असल्याचे कृष्णाथ पाटील यांनी नमूद केले.

Web Title: Another bogie for the Daund-Pune passenger