kasar amboli
kasar amboli

मुळशीकरांना कोरोनाच्या लढाईसाठी मिळाले हत्तीचे बळ   

पिरंगुट (पुणे) : मुळशी तालुक्यातील कासार आंबोली येथे सुरू करण्यात आलेले कोविड केअर सेंटर मुळशीकरांसाठी वरदान ठरणार आहे. तालुक्यातील हे दुसरे कोविड सेंटर मध्यवर्ती ठिकाण असलेल्या सैनिकी शाळेत सुरू झाले आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी सोय झाली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या पॅाझिटिव्ह रुग्णाची स्वॅब चाचणी घेण्यापासून औषधोपचार, निवास तसेच बरे होईपर्यंतच्या सर्व सुविधा या केंद्रात मोफत उपलब्ध होणार आहेत. 

पिरंगुट परिसरातील विविध कंपन्यांतील कामगारांना या सेंटरची फार मोठी गरज होती. याशिवाय परिसरातील मजूर, गोरगरीब नागरिक तसेच सर्वसामान्य जनतेला या सेंटरचा मोठा लाभ होणार आहे. एकूण ९६ बेडची सुविधा असलेल्या या मोफत स्वरुपातील उपलब्ध झालेल्या कोविड केअर सेंटरचे (सीसीसी) उद्घाटन आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते झाले. या वेळी मावळ मुळशीचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार अभय चव्हाण, पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, गटविकास अधिकारी संदीप जठार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अजित कारंजकर, पौड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॅा. सुनील पाटील, महादेव कोंढरे, गंगाराम मातेरे आदी उपस्थित होते.

याबाबत तहसीलदार अभय चव्हाण यांनी सांगितले की, मुळशी तालुका इंडस्ट्रियल असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व तालुक्यातील विविध कंपन्यांतील संचालकांनी या सेंटरसाठी लागणाऱ्या वस्तू स्वरुपातील मदतीसाठी योगदान दिलेले आहे. त्यात बेडशिट, सॅनिटायझर, औषधे, पीपीई किट्स, मास्क, गाद्या, चादरी, ऑक्सिजन सिलिंडर व अन्य वस्तूंचा समावेश आहे. याशिवाय मुळशी तालुका खासगी डॅाक्टर्स असोशिएशनच्यावतीने रोज एक डॅाक्टर या सेंटरमध्ये तपासणी व सल्ल्यासाठी योगदान देणार आहेत. सध्या पिरंगुट परिसरातील विविध कंपन्यांत कामगारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढू लागलेले आहे. त्यामुळे तहसील कार्यालयाच्या माध्यमातून पिरंगुट परिसरातील विविध कंपन्यांचे मालक, पदाधिकारी, संचालक व अन्य प्रतिनिधी यांची तीन वेळा बैठक घेऊन यावर उपायांसाठी चर्चा घडवून आणली गेली होती. त्या चर्चेत पिरंगुट परिसरातील कंपन्यांनी कोवि़ड केअर सेंटरला मदतीसाठी आवाहन करण्यात आले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यामुळे हे सेंटर उभे राहत आहे. याशिवाय तालुक्यातील खासगी डॅाक्टरही विनामोबदला या सेंटरमध्ये काम पाहणार आहेत.

तालुका आरोग्य अधिकारी डॅा. अजित कारंजकर म्हणाले की, तहसील कार्यालय व्यवस्थापनाचे काम पाहणार असून पौड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॅा. सुनील पाटील हे वैद्यकीय सेवा व सुविधांचे प्रमुख काम पाहणार आहेत. याशिवाय तालुक्यातील ७ समुदाय आरोग्य अधिकारी (सीएसओ), ४ नर्स, १ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, १ अॅंब्यूलन्स व अन्य स्टाफ या केंद्रासाठी कार्यरत राहणार आहेत. ज्या रुग्णांना कोरोनाची सौम्य लक्षणे असतील व घरी क्वारंटाइनची सोय नसेल, त्यांना या केंद्रात निवास, जेवण व उपचाराची सोय उपलब्ध केली आहे.

याबाबत मुळशी तालुका इंडस्ट्रियल असोशिएशनचे अध्यक्ष सतीश करंजकर यांनी सांगितले की, तहसीलदार अभय चव्हाण यांनी केलेल्या आवाहनानुसार सामाजिक बांधिलकी म्हणून या कोविड केअर सेंटरच्या उभारणीत आम्ही सहभागी होत आहे. परिसरातील विविध कंपन्यांनी शासनाला या पूर्वी मदत केलेली आहेच, परंतु स्थानिक पातळीवरही योगदान देण्याच्या उद्देशाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. सध्या तालुक्यातील पंधरा कंपन्यांतील प्रशासनाने या सेंटरसाठी मदतीचे योगदान दिलेले असून, उर्वरित कंपन्या सहभागी होणार आहेत. परिसरातील कंपन्यांतील कामगारांनाही कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला असून, जेव्हा आमच्या कामगारांना कोरोनाची सौम्य लक्षणे सुरू होतील, तेव्हा त्यांना या सेंटरचा उपयोग होणार आहे. 

तालुका डॅाक्टर्स असोशिएशनचे अध्यक्ष डॅा. विलास दुडे यांनी सांगितले की, खासगी डॅाक्टरांचेही योगदान या सेंटरमध्ये असावे, सामाजिक देणे म्हणून आम्ही आमच्या संघटनेतील रोज एक डॅाक्टर या सेंटरमध्ये कार्यरत राहणार आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा, सामान्य नागरिक, खासगी डॅाक्टर यांच्यातील समन्वयामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यास नक्कीच मदत होणार आहे.    
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com