बारामतीकरांच्या कोरोना लढ्याला सलाम

मिलिंद संगई
Thursday, 10 September 2020

एकीकडे कोरोनाचे संकट बारामतीवर अधिकच गडद होत असताना दुसरीकडे सामाजिक संस्था या संकटावर मात करण्यासाठी पुढाकार घेऊ लागल्या आहेत.

बारामती (पुणे) : एकीकडे कोरोनाचे संकट बारामतीवर अधिकच गडद होत असताना दुसरीकडे सामाजिक संस्था या संकटावर मात करण्यासाठी पुढाकार घेऊ लागल्या आहेत. शहरातील नाट्य क्षेत्रात कार्यरत नटराज नाट्य कला मंडळाने इंदापूर रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहात सुरु केलेले 100 खाटांच्या क्षमतेचे लोकसहभागातील पहिले कोविड केअर सेंटर चारच दिवसात भरून गेले. त्यामुळे नटराजने नव्याने दुसरे कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याबाबत नटराज मंडळाचे अध्यक्ष व नगरसेवक किरण गुजर यांनी माहिती दिली की, विद्या प्रतिष्ठानच्या पाठीमागील बाजूस असलेल्या तारांगण या महिला वसतिगृहात कोविड केअर सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वसतिगृहात देखील 100 खाटांची क्षमता करण्यात आली आहे. लक्षणे नसलेले पण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत. चौदा दिवस या रुग्णांवर येथे उपचार होतील व रुग्ण पुन्हा घरी जातील. शासकीय यंत्रणेला कोविड केअर सेंटर चालविण्यासाठी लोकसहभागातून मदत करणे, असा या मागचा उद्देश आहे. या सेंटरचे व्यवस्थापन नटराज नाट्य कला मंडळ पाहणार असून, वैद्यकीय उपचार, तपासणी, रुग्ण दाखल करणे या बाबी आरोग्य विभागाच्या वतीने केल्या जाणार आहेत. नटराजचे कार्यकर्ते जेवण, चहा, नाश्ता, करमणुकीची सोय व रुग्णांना इतर सुविधांचे नियोजन करतील. 

कोरोनाबाधितांसाठी कॅशलेस सेवा, पण लूट सुरूच

वास्तविक दुसरे कोविड केअर सेंटर सुरू करावे लागणे, ही तशी चांगली बाब म्हणता येणार नाही, पण परिस्थिती गंभीर बनत असल्याने रुग्णांची चांगली सोय करण्याच्या उद्देशाने आम्ही प्रयत्न करीत आहोत. लवकरात लवकर यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न आरोग्य विभाग व प्रशासन करीत असून परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल. 
- किरण गुजर, अध्यक्ष, नटराज नाट्य कला मंडळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another Covid Center built through public participation in Baramati city