हर्षवर्धन पाटील यांची कन्या करणार आणखी एक विक्रम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

रत्नप्रभादेवी पाटील यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जिल्हा परिषद सदस्यपदाच्या पोटनिवडणुकीत अंकिता पाटील या निवडून आल्या आहेत.

पुणे : माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता
पाटील यांची जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सदस्यपदी एकमताने निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केवळ त्याबाबतची अधिकृत घोषणा बाकी आहे. याबाबतची अधिकृत घोषणा येत्या गुरुवारी (ता.22) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत होणार आहे.

जिल्हा परिषदेची स्थायी समिती ही सर्वाधिक महत्त्वपूर्ण समजली जाणारी विषय समिती आहे. त्यामुळे या समितीत शक्‍यतो ज्येष्ठ आणि अभ्यासू आणि अनुभवी सदस्यांचीच निवड करण्याची प्रथा आहे. मात्र या प्रथेला पाटील या अपवाद ठरणार आहेत. त्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सर्वांत तरुण सदस्य बनणार आहेत.

पुणे जिल्हा परिषदेत सर्वांत ज्येष्ठ सदस्य असलेल्या रत्नप्रभादेवी पाटील या स्थायी समितीच्या सदस्य होत्या, परंतु त्यांचे आकस्मिक निधन झाल्याने, हे पद रिक्त झाले आहे. रत्नप्रभादेवी पाटील यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जिल्हा परिषद सदस्यपदाच्या पोटनिवडणुकीत अंकिता पाटील या निवडून
आल्या आहेत.

जिल्हा परिषदेत स्थायी समिती (स्टॅंडिंग कमिटी), जलव्यवस्थापन व स्वच्छता, अर्थ, शिक्षण, बांधकाम, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा, समाजकल्याण आणि महिला व बालकल्याण अशा एकूण दहा विषय समित्या आहेत. या सर्व समित्यांमध्ये स्थायी समिती ही सर्वोच्च आणि सर्वाधिक महत्त्वपूर्ण अशी समिती आहे. त्यामुळे या समितीच्या सदस्यपदी ज्येष्ठ, अनुभवी आणि अभ्यासू जिल्हा परिषद सदस्यांचीच निवड केली जाते. हा काही अधिकृत नियम
नाही, पण ती प्रथा आहे.

या प्रथेला अंकिता पाटील छेद देणार आहे. कारण सध्या सर्व विषय समित्यांमध्ये मिळून केवळ स्थायी समितीचेच एक सदस्यपद रिक्त आहे. शिवाय या दहापैकी कोणत्याही समितीचे सदस्य नसलेल्या केवळ अंकिता पाटील या एकमेव जिल्हा परिषद सदस्या आहेत. त्यामुळे या पदावर त्यांची बिनविरोध निवड होणार आहे. या वृत्ताला जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागातूनही दुजोरा देण्यात आला आहे.

याआधी अंकिता पाटील यांनी जिल्हा परिषदेवर सर्वाधिक मताधिक्‍याने निवडून येण्याबाबतचे आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. त्यामुळे सध्या सर्वाधिक मताधिक्‍याने निवडून आलेल्या त्या एकमेव जिल्हा परिषद सदस्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another record will be made by the daughter of Harshvardhan Patil