पानसरेंमुळे भाजपमधील जगताप विरोधकांना बळ

उत्तम कुटे : सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जानेवारी 2017

या प्रवेशाने शहरातील राजकीय समीकरणाने एक मोठे वळण घेतले असून ते भाजपच्या पथ्यावर पडणारे असून राष्ट्रवादीला अडचणीत आणणार आहे. पानसरेंच्या आगमनाने उद्योगनगरीत कमळ आणखी फुलले असून पालिकेत ते उमलण्यास बळ मिळाले आहे.

पिंपरी : आझम पानसरे यांच्या येण्याने भाजपमधील लक्ष्मण जगताप यांचे विरोधक असलेल्या लांडगे गटाला मोठे बळ मिळाले आहे. खासदार अमर साबळे, लांडगे आणि पानसरे हे एका बाजूस असल्याने पक्षातील त्यांची बाजू मजबूत झाली आहे. त्यांच्या ताकदीने पक्ष पालिकेत सत्तेत आला, तर लांडगे यांची हुकूमत पक्षात चालणार आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (राष्ट्रवादी) पिंपरी-चिंचवडमधील एक बडे राजकीय प्रस्थ पक्षाचे माजी शहराध्यक्ष आणि माजी महापौर आझम पानसरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने 'राष्ट्रवादीच्या या बालेकिल्याला काल (ता. 8) एक मोठे खिंडार पडले. एकेक बुरूज ढासळू लागल्याने पालिका निवडणुकीत हा गड कायम ठेवण्याचे आवाहन आता पक्षासमोर उभे राहिले आहे. तर, दुसरीकडे तो सर करण्याचे निकराचे प्रयत्न भाजपने सुरू केले आहेत. दरम्यान, या प्रवेशाने शहरातील राजकीय समीकरणाने एक मोठे वळण घेतले असून ते भाजपच्या पथ्यावर पडणारे असून राष्ट्रवादीला अडचणीत आणणार आहे. पानसरेंच्या आगमनाने उद्योगनगरीत कमळ आणखी फुलले असून पालिकेत ते उमलण्यास बळ मिळाले आहे.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एक महत्त्वाचे सत्ताकेंद्र आणि एकहाती सत्ता असलेल्या उद्योगनगरीतून त्यांना पायउतार करण्याचा चंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांधला आहे. त्यानुसार प्रथम त्यांनी अजितदादांचा एक सरदार आणि भोसरीचे आमदार महेशदादा यांना फितूर केले. नंतर त्यांचे नऊ शिलेदार नगरसेवक फोडले. त्यानंतर आगामी पालिका निवडणुकीतील या पक्षाचे सेनापती असलेले पानसरे यांनाच आपल्याकडे घेऊन त्यांनी राष्ट्रवादीला आणखी एक जोरदार धक्का दिला.राम- लक्ष्मण (लांडगे आणि शहराध्यक्ष व चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप) यांच्या जोडीला आता भरत येऊन मिळाल्याने (पानसरे) पालिकेत सत्तेत येण्याचा भाजपचा मार्ग मोकळा झाला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचा पाय आणखी खोलात गेला असून आता, मात्र सत्ता टिकविण्यासाठी दादांना निकराचे प्रयत्न करावे लागणार आहेत. 

पानसरेंमुळे वाढली ताकद

शहरात दहा टक्के मुस्लिम समाज आहे. तो बहुतांश पानसरेंना मानणारा आहे. त्याजोडीने इतर समाजातही त्यांची क्रेझ आहे. झोपडपट्टीतील मतदारांवर त्यांचा चांगला प्रभाव आहे. त्यामुळे हा मतदार पालिका निवडणुकीत हा मतदार आता भाजपकडे वळणार आहे. शहरातील तीनपैकी भोसरी आणि चिंचवडचे आमदार भाजपचेच असून तेथे पक्षाला अडचण नाही. मात्र,पिंपरीत हुकूमत असलेले पानसरे आल्याने आता तिसऱ्या विधानसभा मतदारसंघातही भाजपची ताकद वाढली आहे. तेथील पानसरे यांचे राष्ट्रवादीतील अनेक समर्थक नगरसेवक व पदाधिकारीही आता भाजपमध्ये डेरेदाखल होणार आहेत. त्याजोडीने जगताप यांचे राष्ट्रवादीतील समर्थक नगरसेवक व पदाधिकारीही पक्ष सोडणार असून हा शेवटचा आणि निकराचा धक्का बसणे अद्याप बाकी आहे.

Web Title: anti jagtap group gets strength due to pansare