ॲन्टी रेबीज लसीचा तुटवडा

ॲन्टी रेबीज लसीचा तुटवडा

पिंपरी - शहरात भटक्‍या कुत्र्यांनी चावा घेतलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, महापालिकेच्या रुग्णालयांत गेल्या १५ दिवसांपासून ॲन्टी रेबीज लस उपलब्ध नाही. यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयातून ती घेण्यासाठी १५ हजारांचा भुर्दंड भरावा लागतो.

शहरात ७५ हजार भटकी कुत्री आहेत. रात्रीच्या वेळी दुचाकीवरून जाणाऱ्यांच्या अंगावर ती धावून येतात, चावा घेतात; तसेच गल्लीबोळांतील भटकी कुत्री कधी कोणाचा चावा घेतील, याचा नेम नसतो. गेल्या पावणेचार वर्षांत ४५ हजार ३४० जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद महापालिकेकडे आहे. तसेच, खासगी रुग्णालयात उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या वेगळी आहे. भटक्‍या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेचा पशुवैद्यकीय विभाग नसबंदीची शस्त्रक्रिया करतो. मात्र, महापालिकेचे हे प्रयत्न अपुरे असल्याने त्यांची संख्या वाढत आहे.

कुत्र्याने चावा घेतल्यावर इंडिरॅब इंजेक्‍शन हातावर, तर इक्‍विरॅब इंजेक्‍शन जखमेलगत दिले जाते. इंडिरॅबची किंमत साधारणतः ३५० रुपये, तर इक्‍विरॅबची किंमत अडीच हजार रुपये आहे. पाचवेळा ही इंजेक्‍शन घ्यावी लागत असल्याने रुग्णांना १५ हजारांचा भुर्दंड बसतो. हॉस्पिटलच्या दर्जानुसार हा खर्च कमी- जास्त होतो. महापालिकेची आठ रुग्णालये आणि इतर दवाखान्यांमध्ये ॲन्टी रेबीज इंजेक्‍शन दिले जाते. गरजूंना हा खर्च करणे शक्‍य नसल्याने काहीजण इंजेक्‍शनच घेत नाहीत, तर काहीजण पुण्यातील ससून रुग्णालयात जातात. 

महापालिकेला ॲन्टी रेबीजची दोन वेगवेगळ्या प्रकारची इंजेक्‍शन पुरविणाऱ्या दोन कंपन्या आहेत. निविदेत इंडिरॅबसाठी ठेकेदाराने १८३ रुपये, तर इक्‍विरॅबसाठी २७९ रुपये दर भरला होता. मात्र, ते जुने असून परवडणारे नाहीत. तसेच, बाजारात या लसींचा तुटवडा असल्याचे ठेकेदाराचे म्हणणे आहे. वायसीएम रुग्णालयात चार हजार लसींची वर्षभरात मागणी असताना अवघ्या दीड हजार लसींचाच पुरवठा ठेकेदाराने केला आहे. आगामी महिन्यासाठी एक हजार लसींची मागणी केली आहे.

नोव्हेंबरमध्ये ठेकेदाराची मुदत संपुष्टात येणार असल्याने सप्टेंबरमध्ये निविदा काढल्या आहेत. मात्र, बाजारपेठेतच ॲन्टी रेबीज लस उपलब्ध नसल्याने अडचण येत आहे. ठेकेदारासोबत बोलणी सुरू असून, दोन दिवसांत लस उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे.
- डॉ. प्रवीण आष्टीकर, सहायक आयुक्‍त

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com