स्वराभिषेकाने ओंकारेश्‍वर नादमय!

Anunad
Anunad

पुणे - ओंकारेश्वर मंदिराच्या सभामंडपात स्वरांचा ‘अनुनाद’ झंकारू लागला. ‘सकाळ’आयोजित या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमातून भारतीय शास्त्रीय संगीतसाधनेच्या मूळ रूपाची अनुभूती मनात सात्त्विक भाव जागवू लागली. मंद तेवणाऱ्या पणत्या, फुलांची आरास व स्वरांचा भक्तिभावाने चाललेला अभिषेक, या सगळ्यांचा एकत्रित परिणाम होऊन श्रोते अंतर्मुख होऊ लागले. जगण्यातली धावपळ विसरून ओंकार नादात साऱ्यांचीच भावसमाधी लागली.

आग्रा घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित राम देशपांडे यांच्या स्वरांनी गाभाऱ्यात अनुनाद घुमला. त्यांनी राग भैरवमधील ‘ओंकार नाद स्वरूप जानूं, शिव कृपा करो तब मानूं’ या स्वरचित बंदिशीने प्रारंभ केला. मग देवगिरी बिलावलमधील ‘कौन प्रीत’ ही रचना प्रस्तुत केल्यावर त्यांनी कालिंगडा रागातील पं. कुमार गंधर्व यांची स्वररचना असलेले ‘शून्य गढ शहर’ हे निर्गुणी भजन आळवले. भैरवीतील ‘लगन लागी श्‍यामसे’ या रचनेने त्यांनी समारोप केला. त्यांना डॉ. चैतन्य कुंटे (हार्मोनियम), स्वप्नील चाफेकर, मयूर कोळेकर (तानपुरा), आदित्य मोडक, अर्चना देशपांडे व गंधार देशपांडे (स्वरसाथ) यांनी 
साथ केली.

‘सकाळ’च्या संचालक मृणाल पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘अनुनाद’ या मैफलीचा हा तिसरा उपक्रम. अलीकडेच ओंकारेश्वर मंदिरात झालेली एक व नाशिकमध्ये एक, अशा दोन मंदिर मैफलींना भरभरून दाद मिळाली. या मैफलींमध्ये कृत्रिम ध्वनिव्यवस्था व प्रकाशयोजना पूर्णपणे टाळली गेली. पूर्वी संगीतसाधक मंदिरांमध्ये साधना करीत. देवळांच्या वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यरचनेमुळे वेगळा परिणाम साधला जातो, तेच मूळ स्वरूप या अनुनाद मैफलींमध्ये जपले जाते. गेल्या काही वर्षांत रंगमंचावरून केल्या जाणाऱ्या व्यावसायिक मैफलीचे पेव फुटले आहे. त्यातून श्रोत्यांना जिंकणाऱ्या सादरीकरणाचे स्तोम माजलेले दिसते. शास्त्रीय संगीतसाधनेच्या मूळ स्वरूपातील शुद्धतेचा अनुभव श्रोत्यांना करून देण्यासाठी मृणालताईंची ही धडपड आहे. यासाठी प्रायोजकांकडून मिळणाऱ्या निधीचा विनियोग शास्त्रीय संगीताची जोपासना व यात संशोधन करणाऱ्या तरुणांना शिष्यवृत्ती देण्यासाठी केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com