70 प्लससाठी वाट्टेल ते...

 70 प्लससाठी वाट्टेल ते...
70 प्लससाठी वाट्टेल ते...

पुणे महापालिकेच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत. केंद्रात आणि राज्यात सत्तेची चव चाखलेला भारतीय जनता पक्ष आता महापालिकेवर सत्ता गाजवायची तयारी करतो आहे. त्यासाठी जोरदार तयारी पक्षाने सुरू केली आहे. महापालिकेच्या निवडणुकीत किमान 70 जागा तरी मिळवायच्याच असा चंग बांधून भाजपच्या नेत्यांनी हालचाली सुरु केल्या आहेत. हा 70 प्लसचा आकडा गाठण्यासाठी आवश्यक वाटल्यास तडजोडीही करण्याची पक्षाची तयारी आहे.

केंद्रात कमळ, नंतर राज्यात कमळ फुललं. नुकत्याच झालेल्या नगरपरिषदांच्या निवडणुकांतही भारतीय जनता पक्ष चांगलीच चमक दाखवून गेला. आता या पक्षाचं लक्ष लागलं आहे ते आगामी महापालिका निवडणुकांवर. मुंबईच्या खालोखाल महत्त्वाच्या असलेल्या पुणे महापालिकेवर सत्ता गाजवायची या इच्छेने आता भारतीय जनता पक्षाने तयारी सुरु केली आहे. आज महापालिकेत भाजपाचे 26 नगरसेवक आहेत. त्यांचा मित्रपक्ष  असलेल्या शिवसेनेचे 15 नगरसेवक आहेत. आता आगामी निवडणूक एकट्याच्या जीवावर लढण्याच्या हालचाली भाजप करते आहे. हे करण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी भाजपनं केल्याचं दिसतं. मध्यंतरी पुण्यातल्याच एका गुंडाची भाजपच्या नेत्यांबरोबरची छायाचित्रे माध्यमांमध्ये गाजली. आजच्या फटाफट ब्रेकिंगच्या जमान्यात ही बातमी विस्मृतीत गेली. आता हळूहळू बातम्या येताहेत त्या पक्षप्रवेशाच्या. 

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने राष्ट्रवादीला खिंडार पाडले. स्वतः मुख्यमंत्री हा सोहोळा अनुभवायला उपस्थित होते. पुण्यातही भाजप हेच करते आहे. कालच पुण्याचे माजी उपमहापौर प्रसन्न जगताप काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करते झाले. या कार्यक्रमानंतर पुण्याच्या पालकमंत्र्यांशी अनौपचारिक गप्पा मारताना पक्ष 80 च्या वर जागा निवडून आणण्याची स्वप्ने पाहतो आहे, हे समजले. यासाठी भाजपनं दुसऱ्या पक्षांमध्ये चाचपणी सुरु केली आहे. एकतर ही निवडणूक प्रभाग पद्धतीने लढवली जाणार आहे. भाजपाने आपल्याला सोयीचे प्रभाग पाडून घेतल्याचा आरोप विरोधक करत आहेत. पण चार दोन अपवाद वगळता आक्षेप नोंदवूनही प्रभाग रचनेत फारसे बदल झालेले नाहीत. त्यामुळे अन्य पक्षातील ज्यांना ही निवडणूक अवघड वाटते आहे ते भाजपच्या आश्रयाला यायचा प्रयत्न करताहेत. एकेकाळी ज्यांनी भाजपच्या ध्येयधोरणांवर टीका केली, काही प्रसंगी भाजपच्या धोरणांच्या पार विरोधात जाऊन निर्णय घेतले ते देखिल आज भाजपच्या दिशेने डोळे लावून बसले आहेत आणि भाजपलाही त्याचे वावगे वाटत नाहीये. 

लाल महालाच्या आवारातून दादोजी कोंडदेवांचा पुतळा हलविण्याच्या निर्णयाला भारतीय जनता पक्षाचा विरोध होता. पण महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने ठराव करुन हा पुतळा हलविण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी कालच भाजपमध्ये दाखल झालेले प्रसन्न जगताप पुण्याचे उपमहापौर होते. या निर्णयानंतर भाजपच्या काही नगरसेवकांनी महापालिकेच्या सभागृहाची प्रचंड तोडफोड केली होती. त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने संख्याबळाच्या जोरावर हा निर्णय घेतला होता. त्यावेळी याच भाजपने प्रचंड आदळआपट केली होती. पण आता भाजपला याचे विस्मरण झाले आहे. त्यावेळी विरोधक असलेले प्रसन्न जगताप यांना आज भाजपनं पक्षात घेतलं आहे. ही फक्त झलक आहे. निवडून येण्याची क्षमता हाच निकष पुढे भाजप लावणार हे निश्चित. कारण त्या शिवाय महापालिकेवर सत्ता स्थापन करण्याचे त्यांचे स्वप्न खरे होणार नाही. त्यामुळे पुढच्या काळात असे अनेक नामवंत विरोधक चेहेरे भाजपच्या व्यासपीठावर दिसले तर त्यात आश्चर्य मानून घ्यायला नको. कारण प्रश्न आहे तो 70 प्लसचा! फक्त एकच प्रश्न पडतो तो म्हणजे भाजपच्या निष्टावंतांचं करायचं काय याचा. आयारामांमुळे भाजपचे अनेक जुने कार्यकर्ते दुखावले जाणार हे नक्की. चार वाॅर्डांचा एक प्रभाग असल्याने फारशी बंडखोरी व्हायची चिन्हे नाहीत. पण या ना त्या रुपाने ही नाराजी बाहेर पडेलत. तेव्हा हे आव्हान पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले कसे स्वीकारणार हेच पहायचे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com