
Apmc Election Result: अजित पवारांकडून विजय शिवतारे यांचा पुन्हा एकदा करेक्ट कार्यक्रम
सोमेश्वरनगर - नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने १८-० असा निर्विवाद विजय संपादन करत माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या नेतृत्वाखालील युतीला भुईसपाट केले आहे.
आघाडीला दोन जागा बिनविरोध तर लढतीतीलही सर्व सोळा जागा मिळाल्या. युतीला शिरकाव करता आला नाहीच पण ग्रामपंचायत मतदारसंघात त्यांनी लक्षवेधी लढत दिली आहे.
'नीरा'च्या निवडणुकीत अजित पवार, आमदार संजय जगताप, जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, सोमेश्वरचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी, काँग्रेस व ठाकरे गटाच्या सत्ताधारी मविआने सुरवातीलाच व्यापारी मतदारसंघातील जागा बिनविरोध पटकावल्या.
सोळा जागांच्या लढतीत विजय शिवतारे, भाजप नेते जालिंदर कामठे, गंगाराम जगदाळे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, भाजप, आरपीआय, शेतकरी संघटना यांच्या युतीने आव्हान दिले होते.
सोसायटी मतदारसंघात मविआने ९८७ ते १३०० अशा फरकाने युतीला अक्षरशः धूळ चारली. तोलारीची जागाही ४७ च्या फरकाने मिळविली. मागील वेळेप्रमाणे अनामती गेल्या नाहीत हीच शिवतारे यांची कमाई मानली जाणार आहे.
दरम्यान, ग्रामपंचायत मतदारसंघात मात्र युतीने सत्ताधाऱ्यांच्या नाकीनऊ आणले. यामध्ये मविआने ६४ ते ११७ अशा फरकाने विजय प्राप्त केला. पराभव माहीत असतानाही आणि बारामतीचे गठ्ठा मतदान असतानाही शिवतारे यांनी दिलेली ही लढत लक्षवेधी मानली जाणार आहे. त्यांना सासवड, जेजुरी, नायगाव, परिंचेमध्ये चांगली मते मिळाली.
मतदारसंघनिहाय उमेदवार व कंसात मिळालेली मते पुढीलप्रमाणे
सोसायटी मतदारसंघ
सर्वसाधारण - संदीप सुधाकर फडतरे (१२८६), अशोक आबासाहेब निगडे (१३२४), देविदास संभाजी कामठे (१३५५) (काँग्रेस पुरंदर), वामन आश्रू कामठे (१३४३), शरद नारायण जगताप (१३२८) (राष्ट्रवादी पुरंदर), पंकज रामचंद्र निलाखे (१२९३), बाळासाहेब गुलाब जगदाळे (१३४१) विरूध्द - बाबुराव दशरथ गडदरे (३३१), आनंद संजय जगताप (३२१), प्रवीण बाळासाहेब जगताप (३४०), सुरेश भालचंद्र जेधे (२९०), पंकज शशिकांत धिवार (३०९), बाळासाहेब मारूती बालगुडे (३३०), शारदा बाळकृष्ण भापकर (३०८)
महिला राखीव - शाहजान रफीक शेख (१३६५), शरयू देवेंद्र वाबळे (१४०९) विरूध्द सारिका गणेश थोपटे (३७८), सोनाली लहू कामथे (३६६)
इतर मागास प्रवर्ग - महादेव लक्ष्मण टिळेकर (१५०९) विरूध्द दिलीप विठ्ठल गिरमे (२०६)
भटक्या विमुक्त जाती जमाती - भाऊसाहेब विठ्ठल गुलदगड (१४२४) विरूध्द बाळासाहेब अण्णासाहेब खोमणे (३५६)
ग्रामपंचायत मतदारसंघ -
सर्वसाधारण - गणेश दत्तात्रेय होले (५७३), बाळू सोमा शिंदे (५५५) विरूध्द दिलीप सदाशिव कटके (४४७), भारत शांताराम मोरे (४१८)
आर्थिक दुर्बल - मनिषा देविदास नाझीरकर (५३५)विरूध्द सुशील बाळकृष्ण ताकवले (४७१)
अनुसूचित जाती जमाती - सुशांत राजेंद्र कांबळे (५५८) विरूध्द राजेंद्र भुलाजी गद्रे (४४१)
हमाल तोलारी मतदारसंघ -
विक्रम पांडुरंग दगडे (८२) विरूध्द नितीन लालासाहेब दगडे (३५)
व्यापारी मतदारसंघ -
अनिल माने, राजकुमार शहा (बिनविरोध)