Apmc Election Result : पुणे बाजार समिती निवडणूक; आण्णासाहेब मगर शेतकरी विकास पॅनेलने १८ पैकी १३ वर्चस्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Apmc Election Result

Apmc Election Result : पुणे बाजार समिती निवडणूक; आण्णासाहेब मगर शेतकरी विकास पॅनेलने १८ पैकी १३ वर्चस्व

पुणे - पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तब्बल २० वर्षांनी झालेल्या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत सर्वपक्षिय आण्णासाहेब मगर शेतकरी विकास पॅनेलने १८ पैकी १३ जागांवर विजय मिळवीत वर्चस्व निर्माण झाले आहे.

बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत आण्णासाहेब मगर सहकार पॅनेल आणि भाजपा पुरस्कृत सर्वपक्षीय आण्णासाहेब मगर शेतकरी विकास पॅनेलने एकमेकांसमोर शड्डू ठोकला होता. राष्ट्रवादी पॅनेलचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी केले तर, भाजपा पुरस्कृत पॅनेलचे नेतृत्व जिल्हा बॅकेचे संचालक विकास दांगट आणि भाजपाचे हवेली तालुकाध्यक्ष रोहिदास उंद्रे यांनी केले होते.

मतमोजणीचा पहिला निकाल हमाल मापाडी मतदार संघाचा जाहीर झाला आहे. या निकालात संतोष नांगरे यांनी विजयाची शिट्टी वाजवली. नांगरे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने पाठिंबा दिला होता.

त्यांना सर्वाधिक ८८८ मते मिळाली. त्यांनी हमाल मापाडी महामंडळाचे ज्येष्ठ नेते डॉ. बाबा आढाव यांनी जाहिर केलेल्या राजेंद्र चोरघे यांचा पराभव केला. चोरघे यांना ४०३ तर त्या खालोखाल गोरख मेंगडे ३१४ मते मिळाली.

ग्रामपंचायत मतदार संघात दोन्ही पॅनलला प्रत्येकी दोन जागा

ग्रामपंचायत मतदार संघात चार जागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनलचे २ आणि अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे सर्वपक्षीय पॅनलचे २ उमेदवार विजयी झाले आहेत. अत्यंत चुरशीने मतदान झाल्यामुळे समसमान जागांवर विजय मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघातील दोन्ही निकाल जाहिर झाले असून विजयी उमेदवारांनमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रामकृष्ण सातव ( वाघोली) हे सर्वाधिक ४०५ मते घेवून विजयी झाले आहेत.

तर, अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे सुदर्शन चौधरी (सोरतापवाडी) २५६ मते घेवून विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत मतदार संघात अनुसूचित जाती जमाती मतदार संघातील एका जागेसाठी ३ उमेदवार रिंगणात होते.

त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनलचे नानासाहेब आबनावे (चंदन नगर खराडी) हे ३०७ मतांनी विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत मतदार संघातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक मतदार संघात शेतकरी विकास आघाडीचे रवींद्र कंद (लोणीकंद) ३७५ मते घेवून विजयी झाले आहेत.

सेवा सहकारी सोसायटी गटावर भाजपा पुरस्कृत आघाडीचे वर्चस्व

सेवा सहकारी सोसायटी गटावर भाजपा पुरस्कृत आण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे वर्चस्व राहिले असून विकास सोसायटीच्या ११ पैकी ११ जागांवर आणि ग्रामपंचायत मतदार संघात चार पैकी दोन जागांवर अशा एकूण पंधरा जागांपैकी १३ जागांवर विजय मिळवला आहे.

भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि पुणे बाजार समितीचे माजी सभापती रोहीदास ऊंद्रे यांना सेवा सोसायटी मतदार संघातून सर्वाधिक १ हजार ३२ मते मिळाली आहेत. माजी सभापती दिलीप काळभोर यांना ८०५ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रशांत काळभोर यांना ८८०, माजी संचालक राजाराम कांचन ८५४ , माजी सभापती प्रकाश जगताप ९३९ , नितीन दांगट १ बजार १९ , दत्तात्रय पायगुडे ८३० हे सर्वसाधारण गटातून विजयी झाले आहे.

तर, इतर मागास प्रवर्गातील शशिकांत गायकवाड ८६० मतांनी विजयी झाले आहेत. भटक्या जाती विमुक्त जमाती गटातून लक्ष्मण केसकर ८७९ मते घेत विजयी झाले आहेत. महिला राखीव मतदार संघातून मनीषा हरपळे १ हजार ७६ मते विजयी झाल्या आहेत तर सारिका हारगुडे ८६८ एवढ्या मतांनी निवडून आल्या आहेत. हरगुडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि पुणे मनपाचे माजी स्थायी समितीचे अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांच्या पत्नी सरला यांचा पराभव केला आहे.

आडते व्यापारी गटात घुले - भोसले विक्रमी मतांनी विजयी

आडते व्यापारी मतदार संघातील दोन जागांवर जय शारदा गजानन पॅनलचे गणेश घुले आणि अनिरुद्ध भोसले विक्रमी मताधिक्याने विजयी झाले आहेत. गणेश घुले यांना ५ हजार ८५२ एवढी मते तर अनिरुद्ध भोसले यांना ५ हजार ८१६ एवढी मते मिळाली.

या गटातील उमेदवार ज्येष्ठ आडते आणि माजी संचालक विलास भुजबळ (६५० मते) अमोल घुले (३७४ मते) सौरभ कुंजीर (१ हजार ६५० मते) शिवाजी सुर्यवंशी (१ हजार २७०) यांचा मानहानीकारक पराभव झाला.