esakal | बारामतीकरांनो, घाबरू नका...पण सर्वतोपरी काळजी घ्या
sakal

बोलून बातमी शोधा

baramati

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर बारामती शहर व तालुक्यातील लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र, सर्वतोपरी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

बारामतीकरांनो, घाबरू नका...पण सर्वतोपरी काळजी घ्या

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर बारामती शहर व तालुक्यातील लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र, सर्वतोपरी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. नागरिकांनी आरोग्य यंत्रणेस सहकार्य करावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी केले आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 
खोमणे म्हणाले की, कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे काळजी घेणे अत्यावश्यक आहे. जे रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत, व जे त्यांच्या संपर्कात आले आहेत, त्यांनी घाबरून न जाता आपल्या राहत्या ठिकाणी विलगीकरणात जावे. असे रुग्ण व संपर्कातील सर्वांना प्रशासनामार्फत संपर्क साधला जाईल व पुढील कार्यवाहीसाठी मार्गदर्शन करण्यात येईल. कोणीही घाबरून जाऊ नये व स्वतःची काळजी घ्यावी. ज्यांना लक्षणे नाहीत, अशा रुग्णांनी रुग्णालयात ॲडमिट होण्यासाठी घाई करू नये. सर्वांना संपर्क साधला जाईल व योग्य ते मार्गदर्शन केले जाईल. याबाबत सर्वांनीच प्रशासनास सहकार्य करण्याची गरज आहे. 

पुणे जिल्ह्यात कोरोनाची साखळी तुटेना

दरम्यान, अजूनही काही लोक मास्क वापरत नाहीत, त्यांनी मास्क वापरणे व सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे. कामावर जाणाऱ्या युवक कर्मचाऱ्यांनी कामावरून घरी आल्यानंतर घरातील ज्येष्ठ नागरिक, आई-वडील, आजी-आजोबा यांच्यापासून सुरक्षित अंतरावर राहावे.  त्यांच्याशी बोलताना घरातही मास्क वापरावे. ज्यामुळे त्यांना होणारा कोरोना प्रादुर्भाव टाळता येईल. अनेकदा मित्रांसोबत गप्पा मारतानाही मास्क काढून ठेवले जातात, मास्कचा वापर सार्वजनिक ठिकाणीच नाही, तर कार्यालयातही केला पाहिजे, अनोळखी व्यक्तींच्या संपर्कात येतानाही मास्कचा वापर जरुर केला पाहिजे, असे डॉ. मनोज खोमणे यांनी सांगितले. 

स्वॅबबाबतही आवाहन 
ज्यांना लक्षणे नाहीत, अशा बारामती शहर हद्दीतील रुग्णांनी आरटीपीसीआर चाचणीसाठी नमुना द्यायला सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयातच जावे, शहरातील रुग्णांनी रुई रुग्णालयात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील किंवा तालुक्यातील ज्या रुग्णांना लक्षणे आहेत, त्यांनी रुई रुग्णालयात तपासणीला जायचे आहे. लक्षणांमध्ये थंडी, दोन दिवसांपासून ताप, जुलाब, कफ, दम लागणे, श्वसनाला त्रास होतो, खोकला आहे, अशा स्वरुपाची लक्षणे असतील, तर त्यांनी तपासणीसाठी जावे. लक्षणे नसलेल्या रुग्णांनी रुई रुग्णालयात गर्दी करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे.