सुटे पैसे खात्यात भरण्याचे प्रार्थना स्थळांना आवाहन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

पुणे - भाजी, दूध, किराणा यांसारख्या दैनंदिन गरजा भागविण्याकरिता नागरिकांना रोजच सुट्या पैशांची निकड भासते. बॅंकांमार्फतही शक्‍य तेवढी रक्कम सुट्या पैशांच्या स्वरूपात देण्यात येत आहे. परंतु, नागरिकांची रोजच्या सुट्या पैशांची गरज भागावी आणि चलनातला सुट्या पैशांचा प्रश्‍न सुटण्यास मदत व्हावी याकरिता सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे आणि धर्मादाय संस्थांनी त्यांच्याकडे रोज जमा होणाऱ्या नोटा आणि नाणी त्यांच्या खात्यात जमा करावीत, असे आवाहन विविध बॅंकांचे अधिकारी करीत आहेत. 

पुणे - भाजी, दूध, किराणा यांसारख्या दैनंदिन गरजा भागविण्याकरिता नागरिकांना रोजच सुट्या पैशांची निकड भासते. बॅंकांमार्फतही शक्‍य तेवढी रक्कम सुट्या पैशांच्या स्वरूपात देण्यात येत आहे. परंतु, नागरिकांची रोजच्या सुट्या पैशांची गरज भागावी आणि चलनातला सुट्या पैशांचा प्रश्‍न सुटण्यास मदत व्हावी याकरिता सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे आणि धर्मादाय संस्थांनी त्यांच्याकडे रोज जमा होणाऱ्या नोटा आणि नाणी त्यांच्या खात्यात जमा करावीत, असे आवाहन विविध बॅंकांचे अधिकारी करीत आहेत. 

देवस्थाने, प्रार्थनास्थळे आणि धर्मादाय संस्थांनी त्यांच्याकडे जमा होणाऱ्या नोटा आणि नाणी रोज त्यांच्या बॅंक खात्यांमध्ये जमा करावीत, असे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. यासंबंधीचे निर्देशही राष्ट्रीयीकृत बॅंकांना देण्यात आले आहेत. केंद्राचा हा निर्णय स्वागतार्ह असून सहकार्य केल्यास सुट्या पैशांचा प्रश्‍न मार्गी लागेल, असे बॅंकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

दरम्यान, रिझर्व्ह बॅंकेकडूनही राष्ट्रीयीकृत आणि खासगी बॅंकांना दहा ते शंभर रुपयांच्या नोटा (लोअर डिनॉमिनेशन) पुरविण्यात येत आहेत, परंतु मागणीच्या तुलनेत नोटांचा पुरवठा करणे हे सध्या तरी बॅंकांसमोरील आव्हान आहे. बहुतांश वेळेला नोटांच्या तुडवड्याअभावी दोन हजार रुपयांची एक नोट आणि उर्वरित रक्कम दहा ते शंभर रुपयांच्या नोटांच्या पटीत देण्याचा बॅंकांकडून गेल्या आठवड्याभरापासून प्रयत्न होत आहे. 

पुणे शहरातील मंदिरे, देवस्थाने, अग्यारी, मशीद, दर्गा, चर्च, गुरुद्वारा आणि बौद्ध विहारांची संख्या विचारात घेता, त्यांच्याकडून भरणा झाल्यास नागरिकांची रोजची गरज पुरविणे बॅंकांनादेखील सोईस्कर होऊ शकते. शहरात तीन हजारांहून अधिक सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे आहेत. मंदिरे आणि देवस्थानांचीच संख्या तीन हजारांच्या आसपास, सुमारे दीडशे मशिदी, तीनशे- साडेतीनशे दर्गा, साडेचारशे ते पाचशे चर्च आणि सुमारे वीस गुरुद्वारा आहेत. तसेच, दोनशेच्या आसपास बौद्ध विहार आणि तीन अग्यारी आहेत. या सर्व ठिकाणी दररोज भाविकांकडून देणगी अथवा दान स्वरूपात रक्कम जमा होते. हे पैसे चलनात आल्यास नागरिकांना सुट्या पैशांची चणचण भासणार नाही. 

बॅंकांकडेही अद्यापपर्यंत पाचशेच्या नव्या नोटा आलेल्या नाहीत. पुढील दोन- तीन दिवसांत पाचशेच्या नव्या नोटा चलनात येतील, असे बॅंक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या नोटा आल्यानंतर त्यांचा एटीएम मशिनमध्येही भरणा करता येईल. पर्यायाने बॅंकांमध्ये होणारी नागरिकांची गर्दीही हळूहळू कमी होईल आणि नागरिकांना केव्हाही एटीएममधून पैसे काढता येतील. 

एनपीए खात्यातही जुन्या नोटांचा भरणा बॅंकांकडून करून घेण्यात येत आहे. रिझर्व्ह बॅंकेकडूनही बॅंकांच्या करन्सी चेस्टकडे मागणीच्या चाळीस ते पन्नास टक्के रक्कम जमा होऊ लागल्याचे बॅंकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सुटे पैसे चलनात अधिक प्रमाणात आले, तर सध्याची आर्थिक तुटवड्याची समस्याही नियंत्रणात येईल, नागरिकांची सोय होईल, असे बॅंक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार बॅंकांमध्ये आता बोटाला शाई लावून नागरिकांना पैसे बदलून देण्यात येणार असल्याचेही बॅंक अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, टपाल खात्यातही गेल्या आठवड्याच्या तुलनेत नागरिकांची गर्दी ओसरू लागली असल्याचे टपाल खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Appeal to pay money to religious places into account