सफरचंदाचे भाव 80 ते 100 रुपयांवर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

पुणे : गेल्या आठवडाभरापासून मार्केटयार्डातील फळबाजारात हिमाचल प्रदेश येथून सफरचंदाचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे परदेशी बरोबर देशी सफरचंदाची आवक सुरू झाल्याने गेल्या तीन ते चार महिन्यांपासून सफरचंदाचे भाव उतरले असून ते 80 ते 100 रुपये प्रति किलो झाले आहेत. 

पुणे : गेल्या आठवडाभरापासून मार्केटयार्डातील फळबाजारात हिमाचल प्रदेश येथून सफरचंदाचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे परदेशी बरोबर देशी सफरचंदाची आवक सुरू झाल्याने गेल्या तीन ते चार महिन्यांपासून सफरचंदाचे भाव उतरले असून ते 80 ते 100 रुपये प्रति किलो झाले आहेत. 
आरोग्यासाठी अधिक गुणकारी समजल्या जाणाऱ्या सफरचंदास मार्केटयार्डातील फळबाजारात वर्षभर मागणी राहते. जगाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या सफरचंदाचे भाव इतके असतात, की दररोज सफरचंद खाणे सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर असते. पावसाळा हा भारतीय सफरचंदाचा मुख्य हंगाम असतो. तीन ते चार महिन्यांपूर्वी सफरचंदाची दीडशे ते दोनशे रुपये प्रतिकिलो भावाने विक्री होत होती.
  मात्र, सध्यस्थितीत हिमाचल प्रदेश येथून रिचर्ड, रॉयल, रेड गोल्ड हे सफरचंद मोठ्या प्रमाणात बाजारात येत असल्याने परदेशी सफरचंदाच्या मागणीत घट झाली आहे. परदेशी सफरचंदाच्या तुलनेत देशी सफरचंदाचे दरही तुलनेने निम्मे आहेत. सध्या किरकोळ बाजारात सफरचंद 80 ते 100 रुपये किलोच्या घरात आहे. घाऊक बाजारात या सफरचंदाच्या 25 ते 30 किलोच्या पेटीसाठी किमान एक हजार पाचशे ते तीन हजार रुपयांपर्यंतचा भाव मिळत आहे. 
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळबाजारात वॉश्‍गिंटन, अर्जेंटिना, चिली, इराण, इटली, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका येथून वर्षभर परदेशी सफरचंदाची आवक होत असते. शीतगृहात साठवणूक केलेली ही सफरचंदे मागणीनुसार बाजारात विक्रीसाठी आणली जातात. त्याचा वाहतूक खर्च आणि साठवणूक खर्च अधिक असल्याने त्यांचे किरकोळ बाजारात येईपर्यंतचे भाव वाढतात. 

भारतीय सफरचंद दोन ते तीन दिवसांनी बागेतून थेट बाजारात येतात आणि त्यांचा वाहतूक खर्च या परदेशी सफरचंदाच्या मानाने कमी असल्याने बाजारात त्यांचे भावही कमी असतात. दिवाळीपर्यंत भारतीय सफरचंदाचा हंगाम सुरू राहणार आहे. हळूहळू ही आवक आणखी वाढेल. 
- अरविंद मोरे, व्यापारी, मार्केट यार्ड. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: apple rate increase