काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी पुण्यातून अर्ज?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जुलै 2019

लोकसभा निवडणुकीच्या अपयशानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्यावर ठाम आहेत. तेव्हापासून काँग्रेसमध्ये एकच गोंधळ उडाला असून त्यांच्या जागी कोणाची निवड करावी, याबाबत देशपातळीवरील काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पण आता काँग्रेसला चिंता करण्याची काही एक गरज नाही, कारण काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षासाठी पुण्यातील एक उच्चशिक्षित, तरुणतडफदार उमेदवार इच्छुक आहे

लोकसभा निवडणुकीच्या अपयशानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे अध्यक्षपद सोडले आहे. तेव्हापासून काँग्रेसमध्ये एकच गोंधळ उडाला असून त्यांच्या जागी कोणाची निवड करावी, याबाबत देशपातळीवरील काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पण आता काँग्रेसला चिंता करण्याची काही एक गरज नाही, कारण काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षासाठी पुण्यातील एक उच्चशिक्षित, तरुणतडफदार उमेदवार इच्छुक आहे. हा उमेदवार मंगळवारी काँग्रेस अध्यक्षपदासाठीचा अर्ज दाखल करणार आहे. आता 'तो' कोण आहे ? काय करतो ? आणि काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर त्याचा अजेंडा काय असेल ? याची माहिती तुम्हाला लवकरच कळणार आहे. अध्यक्षपदासाठीची निवड लवकर झाल्यास चार राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाला नवीन अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली चांगली तयारी करता येणार आहे. 

राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर स्वतः पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षासाठी नवा उमेदवार शोधण्याचे आदेश दिले. अनेक दिवस उलटले तरीही गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा उमेदवार काही मिळाला नाही. गांधी यांची जागा कोणी घ्यायची, याच्यावरुन काँग्रेसमध्येच संभ्रम निर्माण झाला. त्यांच्यातील हा गोंधळ पाहूनच आणि देशात बदल घडविण्यासाठी भोसरी येथे राहणाऱ्या गजानंद होसाळे यांनीच काँग्रेसचा अध्यक्ष होण्याचे ठरविले आहे. आता तुम्हाला प्रश्‍न पडला असेल ते कसे शक्‍य आहे ? तर अशक्‍य कुठलीही गोष्ट नसते. राहुल गांधी यांना किंवा गांधी कुटुंबीयांना कायमच गरीब व गरीबी, मध्यमवर्गीयांविषयी आपुलकी आहे. त्यांना देशामध्ये बदल घडवायचा आहे, आणि हो त्यांना तरुणांना संधी द्यायची आहे. या सगळ्या पात्रतेमध्ये गजानंद होसाळे बसतात. विशेषतः ते केवळ 28 वर्षांचेच आहे, त्यामुळे काँग्रेसला आणखी पन्नासएक वर्ष ते पुढे घेऊन जातील, यात काही शंका नाही. 

आता आणखी एक प्रश्‍न राहीला, तो म्हणजे देशातील प्रश्‍न समजून घेण्याचा. गजानंद हे कर्नाटकमधील बिदर येथे अभियांत्रिकीची पदविका घेतलेले तरुण आहेत. बंगळुरूस्थित एका कंपनीच्या पुण्यातील कार्यालयामध्ये ते काम करीत आहेत. गावाकडे पाच-सहा एकर कोरडवाहु शेती करणाऱ्या वडिलांना मदत करीत गजानंद व त्यांचे भाऊ पुण्यात स्थायिक झाले. सध्या त्यांचे कुटुंब भोसरी येथे वास्तव्य करीत आहे. त्यामुळे घर कसे चालवायचे, शेती कशी करायची, बसमधून धक्केखात घरी कसे पोचायचे, नक्षलवादी, दहशतवाद्यांपासून विविध कट्टरपंथीय विचारधारेपासून वाचायचे कसे, यांसारख्या कित्येक प्रश्‍नांची त्यांना जन्मतः चांगली जाण आहे. ते प्रश्‍न सोडविण्यासाठी नेमकी काय उपाययोजना केली पाहीजे, याचीही त्यांना चांगलीच माहिती आहे. याबरोबरच जातीभेद, धर्मभेद, दारीद्रय, भ्रष्टाचार, लिंगभेद, विषमता, गरीबी, पर्यावरण, बेरोजगारी यांसारख्या प्रश्‍नांना ते आपल्या कृतीतून उत्तर देणार आहेत. कार्ल मार्क्‍स, महात्मा गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा समन्वय साधून त्यांना देश कल्याणकारी बनवायचा आहे. 

गजानंद होसाळे यांचा 'विक पॉईंट' एवढाच आहे, की त्यांना "राजकीय घराणेशाही' नाही. काँग्रेस काय किंवा इतर पक्ष काय सगळ्यांमध्येच घराणेशाही टिच्चून भरलेली आहे. त्यामुळे त्यांचा तिथे निभाव लागेल काय? असा प्रश्‍न तुमच्याही मनात नक्कीच निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. तरीही गजानंद होसाळे यांना काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष व्हायचेच आहे. त्यासाठी येत्या मंगळवारी (ता.23) गजानंद हे काँग्रेस भवन येथे शहराध्यक्ष रमेश बागवे व संजय जगताप यांच्याकडे अर्ज सुपुर्द करणार आहेत. त्यावेळी ते त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहेत. 
 
"सर्वसामान्य नागरिक किंवा पक्षाचा कार्यकर्ता म्हणून बदल घडविण्याचा आपण प्रयत्न करतो. परंतु अनेक अडचणी व अडथळ्यांच्या शर्यतीमुळे आपल्याला यश येत नाही. परंतु जेव्हा आपल्या हातामध्ये मोठी ताकद असेल, तेव्हाच बदल घडविणे शक्‍य होऊ शकेल. जग बदलण्याची हीच वेळ आहे. आपणच बदलले पाहीजे, म्हणूनच मी हे पाऊल उचलले आहे.'' 
- गजानंद होसाळे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: application for National President of Congres from Pune