वीज आयोगच ग्राहकांच्या मुळावर

उमेश शेळके - सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 1 जुलै 2020

महावितरण आणि महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने घरगुती विजेच्या दरात पाच ते सात टक्‍क्‍यांनी तर उद्योगांसाठीच्या विजेचे दर दहा ते बारा टक्‍क्‍यांनी कमी होणार असल्याचे जाहीर केले होते.

पुणे - घरगुती वीजदरात महावितरण कंपनीने प्रतियुनिट प्रस्तावित केलेल्या वाढीपेक्षाही महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने जादादराने वाढ करण्यास मान्यता दिल्याची माहिती समोर आली आहे. प्रतियुनिट दरात वाढ करण्याबरोबरच वहन आकारातही वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहकांना जादा दराने वीजबिल येत असल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने मान्यता दिल्याने एप्रिलपासून वीजदरात मोठी वाढ झाली. या विरोधात राजकीय पक्ष आणि संघटना आंदोलन करत आहेत. महावितरण आणि महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने घरगुती विजेच्या दरात पाच ते सात टक्‍क्‍यांनी तर उद्योगांसाठीच्या विजेचे दर दहा ते बारा टक्‍क्‍यांनी कमी होणार असल्याचे जाहीर केले होते. प्रत्यक्षात मात्र वस्तुस्थिती वेगळीच असल्याचे समोर  आले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एक एप्रिलपूर्वी ० ते १०० युनिटपर्यंत प्रतियुनिट विजेचा दर ३ रुपये ५ पैसे होता. आता तो ३ रुपये ४६ पैसे झाला. १०१ ते ३०० युनिटपर्यंत प्रतियुनिट दर हे ६ रुपये ९५ पैसे होता. आता तो ७ रुपये ४३ रुपये झाला. तसेच वहन आकार १ रुपये २८ पैसे होता. तो आता १.४५ पैसे झाला. राज्यात १०० ते ३०० युनिटपर्यंत वापर करणाऱ्या ग्राहकांची सर्वाधिक संख्या आहे. त्यामुळे या ग्राहकांच्या वीजबिलात दरमहा ६८ ते ७५ रुपयांनी वाढ झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

वीजदराचे गणित करताना इंधन समायोजन आकार विचारात घेतला पाहिजे. तो विचारात घेतला, तर आयोगाने प्रतियुनिट मान्यता दिलेली वाढ ही कमी आहे. परंतु, तो वगळून विचार केला, तर महावितरणने प्रस्तावित केलेल्या प्रतियुनिट वाढीपेक्षा जास्त वाढ आयोगाने मान्य केली आहे. दरवाढीस मान्यता देताना आयोगाने एप्रिल महिन्याचा विचार न करता वर्षभरातील दराचा आढावा घेऊन इंधन समायोजन आकार निश्‍चित करण्याची गरज आहे. 
- शंतनू दीक्षित (प्रयास ऊर्जागट)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: approval of the MERC there has been a huge increase in electricity rates