बारामतीमध्ये क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय मंजूर

मिलिंद संगई
गुरुवार, 17 मे 2018

बारामती शहर - पंचक्रोशीतील नागरिकांच्या सोयीसाठी परराष्ट्र मंत्रालयाने बारामती, अकोला, अमरावती, चंद्रपूर व सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय मंजूर केले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गेल्या अनेक दिवसांच्या पाठपुराव्यानंतर बारामतीकरांची ही मागणी मंजूर झाली आहे. या पुढील काळात बारामती व पंचक्रोशीतील नागरिकांना नवीन पासपोर्ट तयार करण्यासह नूतनीकरणासाठी पुण्याचा हेलपाटा वाचणार आहे.

परराष्ट्र विभागाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी या संदर्भात मोलाची मदत केली असून, सुप्रिया सुळे यांच्या मार्फत गेल्या अनेक दिवसांपासून बारामतीत पासपोर्ट कार्यालय सुरु व्हावे या साठी पाठपुरावा सुरु होता. आता परराष्ट्र मंत्रालयाने देशभरात 289  ठिकाणी पासपोर्ट कार्यालय सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात महाराष्ट्रात वरील पाच ठिकाणी ही कार्यालय सुरु होणार आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून बारामती पंचक्रोशीतून पासपोर्ट काढणा-यांची संख्या लक्षणीय वाढली होती, दरवेळेस ज्येष्ठ नागरिकांसह छोट्या मुलांनाही पासपोर्ट काढण्यासाठी पुण्याला जावे लागत होते. आता बारामतीत पासपोर्ट कार्यालय सुरु होत असल्याने लोकांचा वेळ, श्रम व पैसा वाचणार असून, पासपोर्ट काढणा-यांच्या संख्येतही चांगली वाढ होईल असा अंदाज आहे.

बारामती कार्यालयाला कोणते तालुके जोडले जाणार याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी, या परिसरातील पन्नास कि.मी. क्षेत्रातील नागरिकांना या पुढील काळात पासपोर्टसाठी पुण्याला जाण्याची आवश्यकता पडणार नाही. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर या सारख्या तालुक्यांना बारामती कार्यालयाशी जोडले जाईल असा अंदाज आहे.

या कार्यालयाचा प्रारंभ नेमका केव्हा होणार हेही अद्याप स्पष्ट नसले तरी परराष्ट्र मंत्रालयाने लवकरात लवकर हे कार्यालय बारामतीत सुरु करावे या साठी खासदार सुप्रिया सुळे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रयत्नशील आहेत.

Web Title: Approve Regional Passport Office in Baramati