शेडगे, थोरात, नायर भाजपकडून स्वीकृत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 मे 2017

पिंपरी - महापालिकेत घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर भारतीय जनता पक्षाकडून स्वीकृत सदस्यपदासाठी ॲड. मोरेश्‍वर शेडगे, माऊली थोरात आणि बाबू नायर यांची नावे निश्‍चित झाली. 

पिंपरी - महापालिकेत घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर भारतीय जनता पक्षाकडून स्वीकृत सदस्यपदासाठी ॲड. मोरेश्‍वर शेडगे, माऊली थोरात आणि बाबू नायर यांची नावे निश्‍चित झाली. 

सकाळी अकरा वाजता स्वीकृत नगरसेवकांसाठी आयुक्‍तांकडे नावे देण्यात येणार होती. मात्र, नावांचा घोळ कायम राहिल्याने भाजपने अधिकची वेळ मागून घेतली. सकाळी अकरा वाजता आयुक्‍त श्रवण हर्डीकर यांनी गटनेत्यांकडून स्वीकृत नगरसेवक पदांसाठी नावे मागितली. मात्र, भाजपकडून अनेक इच्छुक कागदपत्रांसह उपस्थित होते. कोणाची नावे घोषित होणार? याकडे सर्वांचे लक्ष होते. सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार हे अकराच्या सुमारास महापालिकेत आले. मात्र नावे निश्‍चित नसल्याने त्यांनी काढता पाय घेतला. त्यानंतर अनेक इच्छुकांची नावे निश्‍चित झाल्याच्या अफवा येत होत्या. यामुळे कार्यकर्त्यांमधील उत्सुकता शिगेला पोचली होती.

अखेर दुपारी पावणे चारच्या सुमारास सत्तारूढ पक्षनेत्यांच्या दालनात झालेल्या पत्रकार परिषदेत शेडगे, थोरात व नायर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या वेळी महापौर नितीन काळजे, खासदार अमर साबळे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, सरचिटणीस सारंग कामतेकर, शैला मोळक, उमा खापरे, सदाशिव खाडे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री दिल्लीहून मुंबईला दुपारी पावणेचारच्या सुमारास पोचले. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी दिलेली नावे घोषित केली आहेत. स्वीकृत सदस्य पदाबाबत मुख्यमंत्र्यांकडे नावे पाठविलेली नव्हती.
- एकनाथ पवार, सत्तारूढ पक्षनेते

युवा मोर्चातून सक्रिय शेडगे
ॲड. मोरेश्‍वर शेडगे हे बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत ते प्रभाग १८ मधून इच्छुक होते. मात्र, त्यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्या वेळी त्यांना आश्‍वासन दिले होते. दरम्यान, शेडगे हे मुंडे समर्थक म्हणून ओळखले जातात. युवा मोर्चामध्ये त्यांनी वॉर्ड अध्यक्ष ते शहराध्यक्ष अशी पदाची जबाबदारी पार पाडली आहे. सध्या ते शहर भाजपचे उपाध्यक्ष आहेत.

अमराठी चेहरा म्हणून नायर
बाबू नायर हे २०१४ मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आले आहेत. काँग्रेसमध्ये असताना २००७-१२ या कालावधीत ते स्वीकृत सदस्य होते. स्थायी समितीवरही त्यांची वर्णी लागली होती. सध्या त्यांच्यावर शहर भाजप सरचिटणीस व प्रसिद्धिप्रमुख अशी जबाबदारी आहे. दक्षिण भारतीयांच्या अनेक संघटनेत ते पदाधिकारी आहेत. अमराठी चेहरा म्हणून त्यांना संधी दिल्याचे बोलले जात आहे.

मुंडे समर्थक माऊली थोरात
माऊली थोरात हे मुंडे समर्थक आहेत. सध्या ते खासदार अमर साबळे यांचे समर्थक म्हणून मानले जातात. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांनी पत्नीसाठी भाजपकडे उमेदवारी मागितली होती. त्यांना ती नाकारली होती. सध्या ते पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे सरचिटणीस आहेत.

राष्ट्रवादीकडून भोईर, वाबळे

स्वीकृत नगरसेवकपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर व माजी नगरसेवक संजय वाबळे यांची नावे निश्‍चित केली आहेत. विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी त्यांची नावे आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे सुपूर्त केली.

भोईर हे पूर्वी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष होते. महापालिका निवडणुकीपूर्वी त्यांनी आपल्या सात नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. महापालिका निवडणुकीत त्यांना बिजलीनगर प्रभाग क्रमांक १७ मधून राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली होती. तर संजय वाबळे हे माजी आमदार विलास लांडे यांचे कट्टर समर्थक आहेत. उद्योजक असलेल्या वाबळे यांना राष्ट्रवादीने इंद्रायणीनगर प्रभाग क्रमांक आठ मधून उमेदवारी दिली होती. मात्र  दोघांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. 

योगेश बहल म्हणाले, ‘‘स्वीकृतकरिता भोईर, वाबळे, प्रशांत शितोळे, नीलेश पांढारकर आणि प्रसाद शेट्टी यांची नावे स्पर्धेत होती. मात्र माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भोईर व वाबळे यांच्या नावांवर शिक्‍कामोर्तब केले. राष्ट्रवादीचे काही नेते शितोळे यांच्या नावाबाबत आग्रही होते. ते सांगवी परिसरातील असल्याने भाजपला शह देण्यासाठी योग्य आहेत. तसेच त्यांचा महापालिकेतील अभ्यास चांगला असल्याने भाजपच्या पारदर्शक कारभाराची चिरफाड ते करतील. मात्र महापालिका निवडणुकीत शितोळे यांनी बंडखोरी केल्यामुळे जर त्यांना स्वीकृत सदस्यपदाकरिता संधी दिली असती तर कार्यकर्त्यांमध्ये वेगळा संदेश गेला असता. यामुळे शितोळे यांच्या नावाला अजित पवार यांनी बगल दिली. भोईर हे अभ्यासू असल्याने त्यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब केले.’’ या पदासाठी पांढारकर व शेट्टी यांची नावे न आल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे.

Web Title: approved corporator selection