अपूर्वा आणि पल्लवी करणार सहगायनातून हितगूज

अपूर्वा गोखले (डावीकडील) पल्लवी जोशी.
अपूर्वा गोखले (डावीकडील) पल्लवी जोशी.

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव १२ डिसेंबरपासून सुरू होत आहे. यानिमित्ताने महोत्सवात सहभागी झालेल्या कलावंतांशी बातचीत. 

दोघींच्याही आवाजाची जातकुळी वेगळी, पण विचारधारेचा गाभा मात्र एकच. एकच घराणं (ग्वाल्हेर). समान गुरू, समान तालीम. अभिव्यक्तीच्या कल्पना वेगळ्या असल्या तरी परस्परपूरक. अपूर्वा गोखले आणि पल्लवी जोशी या गाणाऱ्या बहिणीचं हे वर्णन आहे. येत्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात शेवटच्या दिवशी सहगायनातून यांचं हितगूज ऐकायची मेजवानी अनुभवता येईल. 

प्रश्न - तुम्हा दोघींना सहगायनाची गोडी कशी लागली?
अपूर्वा -
 आम्ही दहा वर्षांपासून सहगायन करू लागलो. त्याआधी एकल गायन करायचो. ते सुरूच आहे. आमचे काका मधुकर जोशी आमचे गुरू आहेत. एका गुरुपौर्णिमेला त्यांनी सहगायन करायला सांगितलं. ते आम्हालाही भावलं. अतिशय सुंदर योग असा की, सवाईत आमचं गाणं ज्या दिवशी, त्याच दिवशी या काकांच्या सहस्रचंद्रदर्शनाचा कार्यक्रम आहे. आम्ही सवाईत दुसऱ्यांदा गाणार आहोत. त्या मंचावर गाणं म्हणजे पंडित भीमसेन जोशींचे आशीर्वाद आणि लगोलग काकांचे खास प्रसंगी मिळणारे आशीर्वाद, ही आमच्यासाठी फार मोठी घटना ठरेल. सहगायन म्हणजे जुगलबंदी नाही. यात कुणीच कुणावर कुरघोडी करत नाही. एकमेकांना पूरक, पोषक गाण्यातून आनंद द्विगुणित होण्याची ती अनुभूती असते. 

प्रश्न - सहगायनात काय जपता? 
पल्लवी -
 ताईच्या आणि माझ्या आवाजाचा पोत वेगळा असला तरी घराणं एकच असल्याने रागाकडे बघण्याचा दृष्टिकोन सारखाच असतो. वेगळेपण दाखवण्याचा प्रयत्न असला तरी तो मेळ साधत, सौंदर्यनिर्मितीसाठी असतो. आमचं गाणं ऐकणारे सांगतात की, तुम्ही तुमच्या आजोबांची (पंडित गजाननबुवा जोशी) यांच्या गाण्याची आठवण तर करून देता. तसं असूनही तुमचं स्वतःचं वेगळेपणही सतत दिसतं. मला वाटतं, अनुकरणाऐवजी प्रभाव त्यांना दिसतो याचा आम्हाला आनंद वाटतो. परंपरा जपूनही आम्ही स्वतःचं काही नवं मांडतो. सहगायनातही हेच तत्त्व आहे. एकमेकींना धक्का न लावता खुलवत जाण्याचा प्रयत्न असतो. विस्कळितपणा वाटण्याऐवजी साद-प्रतिसादांतून खुलणारा तो रोचक संवाद असला पाहिजे. 
 
प्रश्न - दोघींची ताकद कशात? 
अपूर्वा -
 पल्लवी तारसप्तकात सहज जाते. तिची उत्स्फूर्तता मला नवं काही सुचायला उद्युक्त करते. माझ्या आणि तिच्या आवाजातील भिन्नता सहगायनात आनंददायी ठरते. 

पल्लवी : ताईच्या आवाजात रियाझी असण्याची वेगळी परिणामकारकता आहे. गाण्यातून ती जे विचार मांडते, तो वेगळ्या तऱ्हेनं सांगण्याची, नवसर्जनाची प्रेरणा मला मिळते. तिच्या गाण्यातला भाव मनाला कमालीचा भिडतो. सहगायन आम्हाला बरंच काही नवनवीन देऊन जातं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com