भुयार बुजविण्यास अखेर परवानगी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 एप्रिल 2019

मेट्रो ट्रान्स्पोर्ट हबचे काम सुरू असताना आढळून आलेले भुयार बुजविण्यासाठी भारतीय पुरातत्त्व विभागाने अखेर परवानगी दिली आहे. मात्र त्याची प्रतिकृती तयार करण्याची अट त्यांनी महामेट्रोला घातली आहे. त्यामुळे ट्रान्स्पोर्ट हबच्या आवारात भुयारीची प्रतिकृती उभारण्याची तयारी महामेट्रोने सुरू केली आहे.

पुणे - मेट्रो ट्रान्स्पोर्ट हबचे काम सुरू असताना आढळून आलेले भुयार बुजविण्यासाठी भारतीय पुरातत्त्व विभागाने अखेर परवानगी दिली आहे. मात्र त्याची प्रतिकृती तयार करण्याची अट त्यांनी महामेट्रोला घातली आहे. त्यामुळे ट्रान्स्पोर्ट हबच्या आवारात भुयारीची प्रतिकृती उभारण्याची तयारी महामेट्रोने सुरू केली आहे.

स्वारगेटला जेधे चौकाजवळ ट्रान्स्पोर्ट हब उभारण्याचे काम महामेट्रोकडून सुरू आहे. त्या दरम्यान खोदाई करताना गेल्या २८ मार्च रोजी सुमारे ५१ मीटर लांबीचे भुयार महामेट्रोला सापडले होते. मुठा उजव्या कालव्यातून पाणी उचलण्यासाठी १९४५-५० च्या दशकात ते उभारले असावे, असे महापालिकेचे म्हणणे होते. सध्या त्याची उपयुक्तता संपलेली असल्याचे मत महापालिकेने व्यक्त केले होते. 

राज्य सरकारच्या पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनीही पाहणी करून हे भुयार ऐतिहासिक नसल्याचे म्हटले होते. या पार्श्‍वभूमीवर महामेट्रोने पुरातत्त्व विभागाला अभिप्राय मागितला होता. त्यांनी याबाबतचे पत्र महामेट्रोला नुकतेच दिले. त्यात ट्रान्स्पोर्ट हबचे काम सुरू असलेल्या परिसरात सुमारे १० मीटर लांबीची भुयाराची प्रतिकृती उभारावी. त्यासाठी बांधकाम करताना जुन्या भुयारातील दगडांचा वापर करावा, असेही महामेट्रोला सांगण्यात आले आहे. 

ही प्रतिकृती नागरिकांसाठी खुली केल्यास पुण्यातील एक पर्यटनस्थळ म्हणून त्याचा विकास करता येईल, असेही त्यात म्हटले आहे. दरम्यान, या पत्रानुसार अंमलबजावणी करण्यास महामेट्रोने प्रारंभ  केला आहे. 

गरवारे स्थानकाचे काम वेगात 
वनाज-रामवाडी मेट्रो मार्गासाठी कर्वे रस्त्यावर गरवारे महाविद्यालयाजवळ स्थानक उभारण्याच्या कामाला नुकताच प्रारंभ झाला आहे. जमिनीपासून हे स्थानक सुमारे १३ मीटर उंचीवर असेल. त्याची लांबी १२० मीटर असेल, तर रुंदी २१ मीटर असेल. 

येत्या ऑक्‍टोबरपर्यंत हे स्थानक खुले होणार आहे. त्यासाठी रस्त्यावर दहा खांब उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. वनाज ते गरवारे महाविद्यालयादरम्यान मेट्रो मार्ग डिसेंबरपर्यंत सुरू करण्याचे महामेट्रोचे नियोजन आहे.

उड्डाण पुलावर दुहेरी वाहतूक 
कर्वे रस्त्यावरील दशभुजा गणपती चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पुलावरून दुहेरी वाहतूक नुकतीच सुरू केली आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत ती सुरू राहणार आहे. एसएनडीटी महाविद्यालयाजवळ मेट्रो मार्गाचे खांब उभारण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे महाविद्यालयासमोरून वाहनचालकांना नळस्टॉप चौकाकडे जाता येणार नाही. त्यांना एसएनडीटी महाविद्यालयाजवळून डावीकडे वळून आठवले चौकात जावे लागेल. तेथून वाहनचालकांना नळस्टॉप चौकामार्गे डेक्कनकडे किंवा इच्छितस्थळी जाता येईल, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले. हा बदल तीन महिन्यांसाठी असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: The Archaeological Survey of India has finally given permission to meet the foundations of Metro Transportation Hub