Bhagavad Gita : श्रीमदभगवतगीतेत विश्र्वकल्याणाची प्रेरणा; अरिफ मोहम्मद खान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arif Mohammad Khan statement Srimad Bhagavad Gita is an Inspiration global development

Bhagavad Gita : श्रीमदभगवतगीतेत विश्र्वकल्याणाची प्रेरणा; अरिफ मोहम्मद खान

पुणे : श्रीमदभगवतगीतेच्या सातशे श्‍लोकांमध्ये सर्व उपनिषदांचे सार एकवटलेले आहे. श्रीमद्भभगवतगीता ही आपल्या गौरवशाली परंपरेचे निर्मितीस्थान आहे. त्यामुळे भारतीय राष्ट्रजीवनाच्या निर्मितीसाठी भगवतगीतेचा प्रचार, प्रसार होणे आवश्यक आहे. शिवाय हीच हीच परंपरा आपल्याला विश्वाच्या कल्याणासाठी काम करण्याची प्रेरणा देते, असे मत केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी मंगळवारी (ता.२) पुण्यात एका कार्यक्रमात व्यक्त केले.

गीता धर्म मंडळाच्या शताब्दी महोत्सवाचा प्रारंभ आज त्यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी 'गीताधर्म - राष्ट्रधर्म' या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष डॉ. मुकुंद दातार, कार्यवाह विनया मेहेंदळे आदी उपस्थित होते. यावेळी खान यांचा श्रीमदभगवतगीतेची बृहदआवृत्ती आणि योगेश्वर श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.

खान पुढे म्हणाले, ‘‘सर्व चराचराकडे समदृष्टीने पाहण्याची प्रेरणा हीच गीतेमध्ये कथन केलेली ब्रह्मविद्या आहे.आपल्याकडे 'एकं सत विप्रा बहुधा वदंती' असे वचन आहे. म्हणजेच सत्य एक आहे, मात्र त्याला वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते. म्हणूनच आपल्या अंतरात्म्यातील प्रेरणाशक्ती जागृत झाली

तर या विविधतेमध्ये एकवटलेली एकात्मता आपण समजून घेऊ शकू.ती समजून घेतली की मग सर्व भेद, द्वेष, आप- परभाव नाहीसा होतो आणि संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची व्यापक दृष्टी मिळते. हाच गीतेमध्ये कथन केलेला धर्म आहे आणि म्हणूनच संपूर्ण विश्वाच्या कल्याणाचा विचार देणारा हा गीताधर्म आपला राष्ट्रधर्म म्हणायला हवा.’’

कार्यवाह विनया मेहेंदळे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी प्रास्ताविकात लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणेतून आणि संस्थापक अध्यक्ष सदाशिवशास्त्री भिडे आणि संस्थापक कार्यवाह पत्रमहर्षी ग.वि. केतकर यांच्या प्रयत्नातून स्थापन करण्यात आलेल्या गीताधर्म मंडळाच्या शंभर वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला.

टॅग्स :Pune Newspune