थकीत एफआरपीवरून खडाजंगी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

पुणे - शेतकऱ्यांना उसाच्या एफआरपीची थकीत रक्कम न देणाऱ्या साखर कारखान्यांना गाळप परवाना दिलाच कसा, असा प्रश्‍न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी साखर आयुक्‍तांना विचारला. या वेळी साखर आयुक्‍तांनी लावलेल्या फोनवरच थकीत एफआरपीच्या मुद्यावरून शेट्टी आणि भैरवनाथ शुगरचे अध्यक्ष आमदार तानाजी सावंत यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली.

काही कारखान्यांनी ऊस उत्पादकांना एफआरपी अद्याप दिलेला नाही. या संदर्भात शेट्टी यांच्यासह काही पदाधिकारी सोमवारी साखर आयुक्‍तालयात पोचले. त्यांनी साखर आयुक्‍त संभाजी कडू पाटील यांची भेट घेतली. त्यांनी गेल्या हंगामातील एफआरपी थकीत असलेल्या कारखान्यांवर कारवाईची मागणी केली. तसेच, काही शेतकऱ्यांना उस्मानाबाद जिल्ह्यातील भैरवनाथ शुगरकडून एफआरपी न मिळाल्याची तक्रार केली. याबाबत साखर आयुक्‍तांनी खातरजमा करण्यासाठी सावंत यांना फोन लावला. सावंत यांनी मी शेट्टी यांच्याशी चर्चा करतो, असे सांगितले. त्यावर आयुक्तांनी शेट्टी यांच्याकडे फोन दिला. त्या वेळी शेट्टी आणि सावंत यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली.

त्यानंतर शेट्टी यांनी भैरवनाथ कारखान्याने सर्व शेतकऱ्यांना पैसे दिल्याचे सिद्ध करून दाखवावे; अन्यथा गाळप परवाना निलंबित केल्याशिवाय येथून जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली. त्यावर साखर आयुक्‍तांनी माहिती घेऊन भैरवनाथ शुगरचा गाळप परवाना निलंबित करण्याचा निर्णय घेतला.

खोटी माहिती देऊन गाळप परवाना घेणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाईची मागणी साखर आयुक्तांकडे केली आहे. त्यांनी संबंधित कारखान्यांवर कारवाईचे आश्‍वासन दिले आहे. सावंत हे मला शिवसेनेचा आहे; म्हणून सांगत होते. मग शिवसेनेला पैसे बुडविण्याचे लायसन मिळाले आहे का?  
- राजू शेट्टी, खासदार  

थकीत एफआरपीमुळे भैरवनाथ शुगरचा गाळप परवाना निलंबित करण्यात आला आहे. राज्यातील १२ साखर कारखान्यांकडे एफआरपीपोटी 
शंभर कोटी रुपये थकीत आहेत. ज्या शेतकऱ्यांना एफआरपी मिळालेला नाही, त्याबाबत तपासून संबंधित कारखान्यांवर कारवाई करण्यात येईल. 
- संभाजी कडू पाटील, साखर आयुक्‍त

Web Title: Arrears FRP Issue