नाटकाची 'घंटा' पालिकेच्या हाती

रमेश डोईफोडे
Tuesday, 13 October 2020

‘सध्या कुलूपबंद असलेल्या नाट्यगृहांची सफाई तातडीने करा, स्वच्छतागृहे चकाचक करा, कलाकार आणि प्रेक्षकांच्या आरोग्याची सुरक्षितता जपली जाईल असे पाहा.ते झाल्यावर आम्ही नाटक लगेच सुरू करायला तयार आहोत...’

अभिनेते प्रशांत दामले, भरत जाधव, उमेश कामत यांसह विविध प्रमुख रंगकर्मींशी संवाद साधला असता, त्यांच्या बोलण्यात हा मुद्दा ठळकपणे आला. या तिघांमधील समान धागा म्हणजे ते अभिनयाबरोबरच नाटकांच्या निर्मितीतही सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांना या व्यवसायातील प्रश्‍नांची नेमकी जाण आहे. नाट्यगृह सुरू करण्याच्या अनुषंगाने त्यांनी मांडलेल्या अनेक विषयांत त्यांचे मतैक्‍य दिसले. अभिनेते सुबोध भावे यांची भूमिका मात्र त्यांच्यापेक्षा वेगळी आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यात महापालिकेची १४ नाट्यगृहे आहेत. त्यांतील, ‘बालगंधर्व’ (शिवाजीनगर), ‘यशवंतराव चव्हाण’ (कोथरूड), ‘अण्णा भाऊ साठे’ (पद्मावती) या नाट्यगृहांतील प्रयोगांवर बव्हंशी निर्मात्यांची भिस्त असते. त्यामुळे राज्य सरकारने, महापालिकेने परवानगी दिल्यास ही नाट्यगृहे सुस्थितीत आल्याशिवाय नाटकांचे प्रयोग सुरू होऊ शकणार नाहीत. तिथली परिस्थिती सध्या कशी आहे?.. ‘संवाद, पुणे’ संस्थेचे सुनील महाजन सांगत होते, ‘बालगंधर्व रंगमंदिरात सध्या उंदीर-घुशी फिरत आहेत!’ यावरून इतर ठिकाणच्या परिस्थितीचा अंदाज यावा. नाट्यगृहांची डागडुजी, स्वच्छता यांकडे महापालिकेने तातडीने लक्ष द्यावे. ही कामे कंत्राटदारांवर सोपविली जातात. तथापि, त्याच्या नवीन निविदा काढलेल्या नसल्याने सगळीकडची अवस्था वाईट आहे. ही कामे झाल्याखेरीज नाटकांचा पडदा वर जाणे शक्‍य नाही. त्यामुळे प्रयोगाची  तिसरी घंटा वाजणार की नाही, हे महापालिकेवरच अवलंबून आहे.’

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रंगकर्मींची भूमिका 

प्रशांत दामले - नाटक पुन्हा सुरू होण्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे तो नाट्यगृहांतील स्थितीचा. तेथील स्वच्छतागृहे चकाचकच असली पाहिजेत. ‘इतर सुविधाही चांगल्या आहेत, आवश्‍यक तेथे दुरुस्ती झाली आहे, सुरक्षिततेच्या उपाययोजना अमलात येत आहेत,’ असा विश्वास वाटला तरच नाट्यरसिकांचा प्रतिसाद मिळेल. त्यादृष्टीने महापालिकेची यंत्रणा सक्रिय झाली आहे, हे स्पष्ट झाले की निर्माते त्यांच्या तयारीला लागतील. त्यासाठी आम्हाला दोन आठवड्यांचा कालावधी पुरेसा आहे.

भरत जाधव - नाटक पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. सध्याच्या ताणतणावात त्यांना हा ‘रिलिफ‘ हवा आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने घरी जी काळजी घेतो, तीच दक्षता नाट्यगृहांतही घेतली पाहिजे. कलाकार आणि प्रेक्षक दोघांनाही ‘कम्फर्ट’ मिळावा. नाट्यगृहांतील चांगले बदल, सोयी यांची माहिती प्रसार माध्यमांनी लोकांपर्यंत पोचवावी. ‘सर्व काही सुरळीत झाले आहे’ अशी चर्चा एकदा सुरू झाली की रसिकांचा नेहमीचा ओघ सुरू होण्यास मदत होईल. प्रेक्षकसंख्या निम्मीच राहणार असली, तरी तिकिटांचे दर वाढविता येणार नाहीत. अशा परिस्थितीत नाट्यगृहांचे भाडे, जाहिरातींचे दर यांत सूट मिळाली तर खर्चाची तोंडमिळवणी करता येईल.


उमेश कामत - ‘लाइव्ह‘ नाटकात जी मजा, आनंद आहे, त्याची तुलना टीव्ही, चित्रपट आणि इतर डिजिटल माध्यमांशी होऊ शकत नाही. त्या अर्थाने नाटक एकमेवाद्वितीय आहे. वातावरण शंभर टक्के ‘नॉर्मल‘ झाल्यावर काम सुरू करू, अशी भूमिका घेतल्यास आणखी किती काळ थांबावे लागेल, याची शाश्वती नाही. बॅक स्टेज आर्टिस्ट, कलाकार, व्यवस्थापक आदी असंख्य लोक निर्वाहासाठी नाटकावर अवलंबून आहेत. नाट्यप्रयोग सुरू झाल्यावर त्यांना बळ मिळेल. हा व्यवसाय टिकून राहणे महत्त्वाचे आहे. एक चांगली गोष्ट अशी आहे, की जूनपासून ज्या गोष्टी ‘अनलॉक‘ झाल्या आहेत, त्या पुन्हा ‘लॉक’ करण्याची वेळ आलेली नाही. नाटकांच्यासंदर्भातही तेच घडेल, अशी आशा आहे. 


सुबोध भावे - ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लोकांना अजून चिंता वाटत आहे. त्यामुळे रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी मिळाली असली, तरी त्यांना मोठा प्रतिसाद लाभलेला नाही. नाटकांबाबत असे घडले तर ते निर्मात्यांना परवडेल का? समजा थिएटर भाड्यात, जाहिरातींच्या दरात थोडी सवलत मिळाली, प्रमुख कलाकारांनी त्यांचे मानधन कमी केले, तर शंभर रुपयांचा खर्च फार तर ऐंशी रुपयांपर्यंत कमी होईल; परंतु निम्मेच लोक नाटकाला आल्यावर उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ कसा घालणार? प्रेक्षक, कलाकार, तंत्रज्ञ या सगळ्यांसाठी हे वर्ष तग धरण्याचे आहे. आपण टिकून राहणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने काम करावे लागेल. नाटक लगेच पूर्वीसारखे चालू लागेल, ही शक्‍यता नाही. आजूबाजूचे जग ‘नॉर्मल‘ होईल, तेव्हा हे क्षेत्रही त्यात असेल; परंतु तूर्त नाही.

 


सत्यजित धांडेकर (राजेश्वरी प्रॉडक्‍शन) - ‘माझा नाट्यरसिक, माझे कुटुंब’ या पद्धतीने आम्ही सर्व जण काम करणार आहोत. नाट्यव्यवहार सुरळीतपणे पुन्हा सुरू व्हावा, यासाठी विविध प्रसारमाध्यमांनीही आम्हाला साथ देण्याची गरज आहे. तसे झाल्यास अनुकूल वातावरण निर्माण होऊन आर्थिक उलाढालीस चालना मिळेल. त्याचा लाभ या क्षेत्रातील हजारो लोकांना होईल.

सुनील महाजन (संवाद, पुणे) - रंगमंच गेले सात महिने पूर्ण शांत आहे. ही सांस्कृतिक टाळेबंदी लवकरात लवकर उठवावी, अशी मागणी आम्ही राज्य सरकार आणि महापालिका यांच्याकडे केली आहे. सर्व कलावंत नाट्यगृहातील तिसरी घंटा वाजण्याची वाट आतुरतेने पाहात आहेत. त्याची दखल संबंधितांनी घ्यावी. सरकारचे सर्व नियम, अटी यांचे पालन करण्याची आमची तयारी आहे.

मोहन कुलकर्णी (मनोरंजन) - प्रेक्षकांत असलेली भीती दूर होण्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी आपली सर्व नाट्यगृहे सुस्थितीत आहेत, याची काळजी महापालिकेने घेतली पाहिजे. तेथील जनरेटर, पेस्ट कंट्रोल, वातानुकूलन यंत्रणा, ध्वनी, प्रकाश आदी तांत्रिक बाबींची खातरजमा केली पाहिजे. यासंदर्भात पुण्यातील विविध नाट्यव्यवस्थापकांच्या वतीने महापौर, अतिरिक्त आयुक्त, तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी यांना नुकतेच निवेदन दिले आहे.
 


समीर हंपी (एस. एच. एंजटप्रायजेस) - पुण्यात एखादे नाटक चालले, की ते जगभरात चालते, अशी या शहराची ख्याती कोरोनापूर्व काळात होती. ते सद्य-स्थितीत पुन्हा घडू घडते. पुणेकर रसिक गेले काही महिने जिवंत कलाकृतीच्या अनुभवास मुकले होते. नाट्यगृहे सुरू झाल्यावर ते हा आनंद पुन्हा पहिल्याच उत्साहात घ्यायला लागतील आणि रंगकर्मींना मनापासून साथ देतील, असा विश्वास आम्हाला आहे.


प्रवीण बर्वे (पराग पब्लिसिटी) - केंद्र सरकारने १५ ऑक्‍टोबरपासून नाट्यगृहे खुली करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार, राज्यातही लगेच अंमलबजावणी झाली पाहिजे. आम्ही तिकीटविक्रीच्या खिडकीपासून आतील बैठक व्यवस्थेपर्यंत प्रत्येक गोष्टीत नाट्यरसिकांची काळजी घेणार आहोत. त्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात तडजोड केली जाणार नाही. मात्र, महापालिकेवरही बरेच काही अवलंबून आहे. त्यांनी त्यांच्या नाट्यगृहांच्या देखभालीचे काम तातडीने सुरू करावे.


श्रीपाद पद्माकर (जिगीषा क्रिएशन्स) - नाट्यगृह सुरू होण्याबाबत आमची भूमिका सकारात्मक आहे; परंतु त्यातील व्यावहारिक बाजूही समजावून घ्यावी. केवळ पुण्या-मुंबईतील नव्हे, तर राज्यभरातील नाट्यगृहे सुरू करणे आवश्‍यक आहे. कारण फक्त दोन-तीन शहरांत प्रयोग करणे, निर्मात्यांना परवडण्याजोगे नाही. महाराष्ट्रातील सगळ्याच नाट्यगृहांत सुविधा उपलब्ध झाल्यास, आम्हाला त्याप्रमाणे आखणी करणे सोईस्कर होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article about artists interacted with the theater closed