Pune Rain : भाजपवाल्यांनो पुण्याचे हे काय केले?

अमित गोळवलकर
Thursday, 10 October 2019

पावसाचा काय दोष? तो पडणार... मग कुठल्या एल निना किंवा एल निनो (जळो काय ते) प्रभाव असो... पडतोय एवढं नक्की, पण इतक्या वर्षात अशी का वेळ यावी, की पुणेकरांना कधी गुडघाभर, कधी छातीभर पाण्यातून वाट काढत घरी जायला लागावं...

अजून पाच दिवस असाच पाऊस पडला तर पुण्यात उभ्या असलेल्या भाजपच्या उमेदवारांविरोधात असलेल्यांना प्रचाराची गरजच पडणार नाही... खरंय ते. गेल्या महिन्याभरात अशी वेळ अनेकदा येऊन गेली. सायंकाळी किंवा रात्री पाऊस पडावा आणि त्याने पुणेकरांचं जगणं नकोनकोसं करुन टाकावं... आज निवडणुका लढविणाऱ्या प्रत्येकानं स्वतःच्या मनाशी विचार केला, तर पुणेकरांसमोर कुठल्या तोंडानं आपण जाणार आहोत, असा प्रश्न त्यांना नक्की पडेल.

पावसाचा काय दोष? तो पडणार... मग कुठल्या एल निना किंवा एल निनो (जळो काय ते) प्रभाव असो... पडतोय एवढं नक्की, पण इतक्या वर्षात अशी का वेळ यावी, की पुणेकरांना कधी गुडघाभर, कधी छातीभर पाण्यातून वाट काढत घरी जायला लागावं... याचं उत्तर त्या महापालिकेत दडलंय... वरं (वरवर) जनहितम् ध्येयम् असं ब्रीद बाळगणाऱ्या. बहुदा त्या वास्तुचाच तो दोष असावा. कारण इथं गेलेला कधी सरळ वागतच नाही.

Image may contain: outdoor

आता आता एका पक्षाची सत्ता आली. त्या आधी किमान तीन दशके त्यांचे विरोधक महापालिकेवर राज्य करत होते. त्यावेळचे प्रश्न वेगळे होते, पण ते नक्की होते. त्यावेळी पुण्याची सार्वजनिक वाहतूक हा विषय सगळ्यांनी च्युईंगमसारखा चघळला, पण शेवटी त्याचे रबर झाल्यानंतर थुंकूनही टाकला.

पुढे आलेल्यांनी मेट्रोचं गाजर दाखवलं. भाबडा पुणेकर चला थोडी वाट पाहू म्हणून रस्त्यावरून आपल्या दुचाक्या हाकायला लागला. पूर्वीचे बरे आणि आताचे वाईट असं काही नाही. कारण त्यावेळी पुण्याच्या गर्दीच्या रस्त्यावरून भल्या मोठ्या पीएमटी (नंतर बापडी ती पीएमपीएमएल) धावायची. छोट्या बसेस रस्त्यावर आणणे म्हणेज आपले कमिशन छोटे करणे, अशी भावना असावी बहुदा. 

Image may contain: outdoor and water

नंतर सत्ता बदलली. पूर्वी एक'हाती' होती. नंतर दोन पक्ष मिळून महापालिका चालवायला लागले, पण परिस्थिती काही बददली नाही. शेजारीच असलेल्या पिंपरी-चिंचवडने मात्र तोपर्यंच चांगलीच कात टाकली होती. मुंबईत समुद्राच्या लाटा येतात, बाकी ठिकाणी राजकीय. तशी एक लाट आली आणि पुन्हा महापालिकेत सत्ता बदल झाला.

आतातरी काहीतरी बदलेल म्हणून पुणेकर वाट पाहात राहिला. रस्ते चकाचक दिसायला लागले. पूर्वी काळे असायचे. आता करड्या रंगाने रस्त्यांचा साज बदलला. डांबराच्या गल्ल्या सिमेंट काँक्रीटच्या झाल्या. त्यावेळी सहा-सहा महिने झालेला त्रास पुणेकरांनी सहन केला. चला गुळगुळीत रस्त्यांवरुन जायला मिळेल म्हणून!

Image may contain: one or more people, night, tree, car and outdoor

पण हे सिमेंट काँक्रीटचे रस्तेच पुढे रडायला लावणार आहेत, हे पावसाळ्यात मुळा-मुठेचा पूर पाहायला जाणाऱ्या पुणेकराला कुठे माहीत होतं. यंदाच्या पावसाळ्यात आणि गेल्या काही दिवसांत त्याला लकडी पुलावर पूर पाहायला जावं लागलं नाही. कारण साक्षात पूरच त्याच्या दारात आला होता. त्यातूनच जीव मुठीत धरून तो घरी येत होता आणि येणाऱ्या मुला-बाळांची वाट पाहात होता. पानशेतचा पूर-पानशेतचा पूर असं आमच्या पिढ्यांनी ऐकलं, पण तेव्हा पूर आला आणि गेलाही होता एकदाच. पण इथं रोजच येतोय. 

हे का? असं विचारायचं वेळ आलीये. रोजच्या रोज पाऊस आला, की झाडं पडताहेत. त्यांच्या मुळाशी पाणी जाण्यापासून कुणी रोखलं हे विचारायला हवं. रस्त्यांवर सिमेंट काँक्रीटच्या ओकाऱ्या काढणाऱ्या कंत्राटदारांच्या क्षमता तपासायला हव्यात. सिमेंट काँक्रीटचे रस्ते म्हणजे शहर पुढारलेले हे समजणाऱ्या पुढाऱ्यांची त्यांच्या कथित समाजकारणाबाबत 'पाॅलिग्राफ' घ्यायला हवी. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या सगळ्यांच्या पदव्यांची नाही, तर दहावीची प्रमाणपत्रे तपासायला हवीत!

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- Pune Rains : मदतीस गेला अन् स्वत:चाच जीव गमावून बसला

- Pune Rains : पुणेकरांनो सावधान! पुण्यावर सुमारे 15 किलोमीटरचा ढग

- Pune Rain : मुसळधार पावसामुळे कर्वे रस्त्याला नदीचे स्वरूप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article about Pune Rain written by Amit Golwalkar