डिजिटल उत्सावाचा ‘श्रीगणेशा’

Ganpati
Ganpati

पुण्याचा गणेशोत्सव देशभरात प्रसिद्ध आहे. त्याचा आनंद लुटण्यासाठी राज्य-परराज्यांतून असंख्य लोक पुण्यनगरीत येतात. कोरोनामुळे यंदा उत्सवी स्वरूप कोठे दिसले नाही. वैभवशाली मिरवणुका, भव्यदिव्य देखावे-सजावट हे सर्व बाजूला ठेवून यावेळी मंडळांना साधेपणा जपावा लागला. त्यामुळे कार्यकर्त्यांबरोबरच भाविकांचाही हिरमोड झाला असला तरी संकटकाळात परंपरागत उत्सव संतुलितपणे कसा साजरा करावा, याचा अनोखा आदर्श मंडळांनी घालून दिला आहे. 

कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात मार्चमध्ये सापडला. तेव्हापासून शहरावर हळूहळू भीती-निराशेचे मळभ दाटू लागले. लॉकाडाउनमुळे ठप्प झालेले व्यवसाय, अनेकांच्या गेलेल्या नोकऱ्या, हातावर पोट असणाऱ्यांचे झालेले हाल आणि सतत वाढत जाणारी रुग्णसंख्या यामुळे या सळसळत्या शहरातील लाखो लोकांच्या मनावर प्रचंड नकारात्मक परिणाम झाला. निराशेचे हे मळभ काहीसे दूर करण्यास, मनाला उभारी देण्यास यंदाच्या गणेशोत्सवाने मोठी भूमिका बजावली. 

कार्यकर्त्यांचे मोहोळ 
हजारो कार्यकर्त्यांचे मोहोळ हे पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे वैशिष्ट. मंडळांच्या माध्यमातून हजारो कार्यकर्ते घडले. यातूनच अनेक राजकीय-सामाजिक नेते, कलाकार उदयाला आले. कार्यकर्ते घडण्याची ही प्रक्रिया गेली १२८ वर्षे अखंड सुरू आहे. गणेशोत्सव हा कार्यकर्ते घडविणारा कारखानाच आहे. मंडळाचा कार्यकर्ता नेहमी रस्त्यावर असतो. कोरोना काळातही याचे प्रत्यंतर आले. लॉकडाउनमध्ये गरजूंना मदत करण्यात, रुग्णांना अहोरात्र सेवा देण्यात, सर्वसामान्यांच्या हाकेला लगेच धावून जाण्यात मंडळाचा कार्यकर्ता सदैव तत्पर राहिला. साऱ्या शहराने गेल्या चार महिन्यांत याचा अनुभव घेतला. संकटकाळात रस्त्यावर उतरणाऱ्या या कार्यकर्त्यांसाठी गणेशोत्सव हा ऊर्जेचा झरा असतो. यंदा हा उत्सव होणार की नाही, अशी शंका निर्माण झाली होती. 
अशा स्थितीत गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडणे फार महत्त्वाचे होते. यासाठी मंडळांचे कौतुक करावे तितके थोडेच. खरे तर, २१ मे रोजी जेव्हा मानाच्या पाच तसेच प्रमुख मंडळांनी एकत्र येऊन उत्सव साधेपणाने साजरा करायचे ठरविले, त्यावेळी ही बाब अशक्‍य वाटत होती. कारण पुण्यात सुमारे चार हजार नोंदणीकृत, तर तितकीच नोंद नसलेली मंडळे आहेत. शिवाय वीस हजार गृहनिर्माण सोसायट्यांत गणपती बसविले जातात, ते वेगळेच. इतकी सारी मंडळे सोशल डिस्टन्सिंग तसेच आरोग्याचे सारे नियम पाळून उत्सव कसा साजरा करणार, हा यक्ष प्रश्‍न होता. 

काळानुरूप लवचीक बदल 
गणेशोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे काळानुरूप लवचीक बदल. त्यामुळे तो केवळ टिकला नसून, सतत वृद्धिंगत होत आहे. मंडळांच्या कार्यकर्त्यांनी यंदाही लवचीक भूमिका घेत सारे बदल सहजपणे स्वीकारले. झगमगाट, सजावट तसेच अनाठायी खर्चाला फाटा, छोटे मंडप अशी आखणी केली गेली. सर्वांचेच आर्थिक कंबरडे मोडल्याने कमी खर्चात उत्सव साजरा करण्याचे आव्हान कार्यकर्त्यांपुढे होते. त्यांनी हे आव्हान लीलया पेलले. महत्त्वाचे म्हणजे, सर्व मंडळांनी एकत्र येऊन घेतलेले सर्व निर्णय कसोशीने पाळत प्रशासनाला उत्तम सहकार्य केले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

टेकसॅव्ही कार्यकर्ते 
बंधने आल्यावर कल्पनेला धुमारे फुटतात. यंदा लोक फारसे रस्त्यावर येणार नाहीत, गर्दी झाल्यास त्यांच्याही जिवाला धोका आहे, याचा विचार करून नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हा उत्सव घराघरांत पोचवण्याचा विचार या वेळी प्रथमच व्यापक स्तरावर पुढे आला. फेसबुक, इन्स्टाग्राम, यू-ट्यूब अशा डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर कसा करता येईल, याचा विचार टेकसॅव्ही कार्यकर्त्यांनी केला. त्यातून अनेक कल्पना आकाराला आल्या. त्यांना देश-परदेशातून अमाप प्रतिसाद मिळाला. भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडळाने पहिला ऑनलाइन संगीत महोत्सव घेतला. त्यात नामवंत कलाकारांनी आपली कला सादर केली. 

‘पूर्वी मंडळे केवळ मंडपात मोठे स्क्रीन लावत होते. यंदा आमच्यासह अनेक मंडळांनी प्रथमच डिजिटल प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर केला,’ असे निरीक्षण कसबा गणपती सार्वजनिक तरुण मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी नोंदविले. 

तांबडी जोगेश्वरी मंडळाने ऑनलाइन विचार संमेलन भरविले. मंडळाचे सहकार्यवाह सौरभ धडफळे म्हणाले, ‘तणावाचा सामना कसा करायचा, यासह नोकरीच्या संधी यावर रोज नामवंतांची व्याख्याने झाली.’ 

‘तुळशीबाग ही छोट्या दुकानदारांची कर्मभूमी. या सर्वांपुढे सध्या असंख्य समस्या आहेत. त्यांना योग्य दिशा देण्यासाठी तुळशीबाग मंडळाने तज्ज्ञांनी व्याख्याने घेतली. त्यातून दुकानदारांना आर्थिक योजनांची माहिती दिली,’ असे मंडळाचे कोशाध्यक्ष नितीन पंडित यांनी सांगितले. 

यंदा सर्वाधिक कमी प्रदूषण नोंदवले गेले. ही परंपरा पुढील वर्षी राखायला हवी, अशी अपेक्षा गुरूजी तरुण मंडळाचे कार्याध्यक्ष पृथ्वीराज परदेशी यांनी व्यक्त केली. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी सांगत होते, ‘यंदा रस्त्यावर भाविक आले नाहीत, ही रुखरुख आहेच; पण ऑनलाइन दर्शन तसेच आरतीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. वयोवृद्धांना घरबसल्या गणरायाचे दर्शन घडले. तब्बल अडीच कोटी भाविकांनी याचा लाभ घेतला. मंडळाच्या २१ दिवसांच्या ऑनलाइन अथर्वशीर्ष निरुपणाला, महिलांच्या ऑनलाइन अथर्वशीर्ष पठणाला अमाप प्रतिसाद लाभला. पुढच्या वर्षी या तंत्रज्ञानाचा अधिक वापर करण्यावर आम्ही भर देणार आहोत. कोरोना काळात मंडळातर्फे दररोज ससूनमधील तीन हजार रुग्णांना जेवण दिले जात आहे. आठ रुग्णवाहिका अव्याहतपणे मदतीसाठी रस्त्यावर धावत आहेत.’ 

ज्या गोष्टींसाठी पैसे लागत नाहीत, असे अनेक समाजोपयोगी उपक्रम यावेळी विविध मंडळांनी राबविले, हे यंदाचे आणखी एक वेगळे वैशिष्ट असल्याचे निरीक्षण अभ्यासक आनंद सराफ यांनी नोंदविले. ते म्हणाले, ‘शहरातील ५० हून जास्त मंडळांनी रक्तदान शिबिरे घेतली. प्रशासन व कार्यकर्ते असा वाद कोठेही उद्भवला नाही. पोलिस, डॉक्‍टर, बॅंडवाले, मांडववाले, सजावटकार, सफाई कामगार तसेच हातावर पोट असणाऱ्यांना मंडळांनी भरभरून मदत केली.’ 

कोरोनासारख्या जीवघेण्या साथीच्या काळात परंपरागत उत्सव संतुलितपणे कसा साजरा करायचा, याचा अनोखा आदर्श यावर्षी पुण्यातील गणेशोत्सव मंडळे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी घालून दिला. विघ्नहर्त्या गणेशाचा हा लोकोत्सव मंडळांनी तितक्‍याच उत्साहाने; पण संयमाने आणि संवेदनशीलतेने साजरा करून एक नवा पायंडा पाडला आहे, हे नक्की. 

महत्त्वाची निरीक्षणे

  • मंडळांकडून बदलांचा स्वीकार 
  • कार्यकर्त्यांची स्वयंशिस्त वाखाणण्याजोगी 
  • ‘क्रायसिस मॅनेजमेंट''चा आदर्श
  • देखाव्यातून नव्हे, कृतीतून समाजप्रबोधन 
  • डिजिटल प्लॅटफॉर्मची रोवली मुहूर्तमेढ
  • प्रशासन व कार्यकर्ते वाद नाही 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com