हाडाचा शिक्षक अन्‌ सरस्वतीचा उपासक

NM-Joshi
NM-Joshi

ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉ. न. म. जोशी आज (ता. ११) ८५ व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्ताने...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्‍यातील गारवडे या टुमदार गावी न. म. सरांचे बालपण गेले. महात्मा गांधींच्या हत्येनंतर या कुटुंबाची ताटातूट झाली. अनेक व्यथावेदनांसह आपले शालेय शिक्षण पूर्ण करून सर कर्मधर्मसंयोगाने पुणे येथे स्थिरस्थावर झाले. पुण्यातील अनेक नामवंत शाळांमध्ये १४ वर्षे शिक्षक म्हणून सेवा केली. टिळक महाविद्यालयात प्राध्यापकपदी रूजू झाले, मात्र जिथे गेले तिथे समरस झाले. नवनवीन उपक्रम राबविले. थोरामोठ्यांच्या संपर्कात राहिले. साहित्य क्षेत्रातही मुशाफिरी केली. विशेष म्हणजे स्वत:चे शिक्षण सुरू ठेवले. राष्ट्रभाषा, आंग्लभाषा, सिंधी, फ्रेंच भाषा शिकून बहुभाषिक झाले. पुढे विद्यावाचस्पतीही झाले. त्यांनी १४ विद्यार्थ्यांना पीएचडीला मार्गदर्शन केले आहे. तर चार विद्यार्थ्यांनी ‘सरांचे साहित्य आणि व्यक्तिमत्त्व’ या विषयात पीएचडी केली आहे. 

नोकरी, शिक्षण, लेखन, व्याख्याने, संपादन, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सदस्य, मराठी साहित्य संमेलनांतील वावर, बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अशा भूमिका लीलया निभावताना वेळप्रसंगी पडेल ते घरकामही त्यांनी आनंदाने केले आहे. आई, पत्नी आणि आता सूनबाई देखील नोकरी करत असल्याने पाहुण्यांना त्यांचा स्वहस्ते चहापान करण्याचा आतिथ्य संस्कार माझ्यासह अनेकांनी अनुभवला आहे. ‘स्त्री-सबलीकरण’ म्हणजे हेच नव्हे काय? त्यांनी जे शिकवले. ते गिरवलेही. म्हणूनच संसार आणि सरस्वती एकावेळी सांभाळणारे हे सारस्वत अनेकदा यशस्वी होत राहिले आहेत. 

सरांच्या लेखणीतही जादू आहे. साहित्यातील सर्वच प्रकारात तिचा वावर आढळतो. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, रामशास्त्री प्रभुणे, अण्णा भाऊ साठे इ. प्रमुख व्यक्तिरेखांवर सरांनी कादंबरी लेखन केले आहे. तसेच अनेक लघुकथा, नाट्यसंहिता, बालवाङ्मय, प्रबंधलेखन, प्रस्तावना, स्फुट आणि स्तंभलेखनातून सर आपल्याला नियमितपणे भेटतातच; परंतु ‘बखर एका सारस्वताची’ या त्यांच्याच सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याला प्रकाशित झालेल्या आत्मचरित्रातून न. सरांच्या आयुष्याचे अवलोकन करता येते.

त्यांच्या साडेआठ दशकांच्या जीवननाट्यात बालगंधर्व, साने गुरुजी, स्वा. सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, अण्णा भाऊ साठे, यशवंतराव चव्हाण, डॉ. शंकरदयाळ शर्मा, अटलबिहारी वाजपेयी, अभिनेते राजकपूर, हेमामालिनी, भीमसेन जोशी आणि तत्कालीन सर्व प्रतिभावंत साहित्यिकांच्या मांदियाळीत ते वावरले. आजही त्यांचे रूबाबदार दिसणे आणि दिलखुलास हसणे प्रत्येकासाठी प्रेरणा देणारे ठरते.

सरांचा जन्म ३६ सालातील असला तरी जातील तेथील समाजासाठी ६३ चा आकडा कसा उपयुक्त आहे, हे ते सोदाहरण विशद करतात. थोडक्‍यात कविवर्य बा. भ. बोरकरांनी वर्णन केल्याप्रमाणे ‘देखणे जे हात त्यांना निर्मितीचे डोहाळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे...’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com