आम्ही आहोत आध्यात्मिक, धार्मिक नव्हे! 

सोमवार, 15 मे 2017

वयाच्या एकोणव्वदाव्या वर्षी ते एकटेच अमेरिकेहून हजारो मैलांचा प्रवास करून आलेत. एवढेच नाही; तर येथे ते दररोज कार्यक्रमांमध्ये व्यग्र आहेत. ही माझी कदाचित शेवटची भारत भेट असेल, असे ते म्हणतात; परंतु त्यांचा 'फिटनेस' पाहिला तर ते एकदा नव्हे; तर अनेकदा अमेरिका-भारत प्रवास करतील, असे कोणालाही वाटेल. 

पुणे - अमेरिकेत काही वर्षांपासून 'माइंड, बॉडी मेडिसीन' हा परवलीचा शब्द बनला आहे. मोठी विद्यापीठे आणि संशोधन संस्थांनीही या विषयाला वाहिलेले स्वतंत्र विभाग स्थापन केले आहेत. महर्षी विद्यापीठापासून सुरू झालेला हा प्रवास स्टॅन्फर्ड- हार्वर्डपर्यंत येऊन पोचला आहे. व्यापक संशोधन होत असून, अमेरिकेतील या नवीन विज्ञानाचे चमत्कारिक परिणाम दिसून येऊ लागले आहेत. 

डॉ. गुरुराज मुतालिक गेल्या आठेक वर्षांपासून या विषयाचा अमेरिकेत अभ्यास करत आहेत. पुणेकरांना, विशेषत: वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित मंडळींना डॉ. मुतालिक हे नाव नवे नाही. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात ते प्राध्यापक होते; तसेच अधीक्षकही होते. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण मंडळाचे संचालक असताना त्यांना जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) निमंत्रण आले आणि ते अमेरिकेत 'डब्ल्यूएचओ'मध्ये संचालकपदी रुजू झाले. या पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी अमेरिकेतच 'माइंड, बॉडी मेडिसीन'वर अभ्यास सुरू केला. 

डॉ. मुतालिक यांची नुकतीच एका कार्यक्रमात भेट झाली. वयाच्या एकोणव्वदाव्या वर्षी ते एकटेच अमेरिकेहून हजारो मैलांचा प्रवास करून आलेत. एवढेच नाही; तर येथे ते दररोज कार्यक्रमांमध्ये व्यग्र आहेत. ही माझी कदाचित शेवटची भारत भेट असेल, असे ते म्हणतात; परंतु त्यांचा 'फिटनेस' पाहिला तर ते एकदा नव्हे; तर अनेकदा अमेरिका-भारत प्रवास करतील, असे कोणालाही वाटेल. 

थेट त्यांच्याकडूनच 'माइंड, बॉडी मेडिसीन' (एमबीएम)बद्दलची माहिती घेताना, अमेरिकेत आरोग्य क्षेत्रात होत असलेल्या नव्या बदलांची कल्पना आली. अमेरिकी 'एमबीएम'चे मूळ भारत आणि चीनमध्ये आहे. विशेषत: योगशास्त्रात आहे. पाचेक दशकांपूर्वी महर्षी विद्यापीठाच्या माध्यमातून अमेरिकेत 'एमबीएम'ची बीजे रोवली गेली आणि आज अमेरिकेतील आघाडीच्या विद्यापीठांमध्ये 'एमबीएम'च्या शाखा आहेत. यावर संशोधन केल्यानंतर 'हा तर चमत्कार आहे' असे अमेरिकी विद्यापीठांना वाटले. त्यामुळे आजघडीला अमेरिकेत नवा वर्ग उदयास आला आहे, 'आम्ही धार्मिक (रिलिजिअस) नाही; पण आध्यात्मिक (स्पिरिच्युअल) आहोत, असे या वर्गाचे म्हणणे आहे. आज अशा नागरिकांची संख्या अडीच कोटींच्या घरात असल्याचे डॉ. मुतालिक सांगतात. तेथे नियमित योगाभ्यास करणाऱ्यांची संख्या 20 टक्के आहे; तर 56 टक्के लोक प्रचलित वैद्यकीय पद्धतीऐवजी अन्य पद्धतीचा उपयोग करीत आहेत. 'एमबीएम' म्हणजे दुसरे काही नसून मनःशक्तीचा शरीरदुरुस्तीसाठी कसा उपयोग करायचा याचे ज्ञान होय. त्याची केंद्रे कोलंबिया हॉस्पिटल, हार्वर्ड हॉस्पिटल अशा किती तरी नामांकित संस्थांमध्ये सुरू आहेत. 

शारीरिक तंदुरुस्तीसाठी आपल्याकडे अनेक साधने आहेत; आपण जिममध्ये जातो, पिळदार शरीरयष्टी कमावतो आणि त्याचे प्रदर्शन करतो; पण मनोबल वाढवण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. त्याची गरज अमेरिकनांनी ओळखली आणि मोठ्या प्रमाणावर ध्यानकेंद्रे, योगाभ्यास केंद्रे सुरू केली आणि त्यांचा अनुभव घेणाऱ्या नागरिकांना मनाच्या शक्तीचा प्रत्यय येऊ लागला आहे. 

डॉ. मुतालिक यांनी कर्करोग आणि मनःशक्ती यावर संशोधन केले आहे. सध्या ते अमेरिका, भारतात या विषयावर व्याख्यान देत असतात. डॉ. विनोद शहा यांच्या जनसेवा फाउंडेशनने त्यांचे व्याख्यान नुकतेच आयोजित केले होते. कर्करोगासारख्या दुर्धर आजारांनादेखील सुरवातीच्या टप्प्यात 'एमबीएम'द्वारे रोखता येऊ शकते, असे ते सांगतात. 

योग सर्वांत लोकप्रिय 
''अमेरिकन सोसायटी खूप 'डायनॅमिक' आहे. सरकारने आपल्यासाठी काही करावे याची ती वाट पाहत नाही. स्वत:साठी चांगले काय ते निवडते आणि त्याचा उपयोग सुरू करते आणि सरकारने ते स्वीकारावे म्हणून दबाव आणते. सध्या 56 टक्‍क्‍यांहून अधिक लोक आधुनिक वैद्यकशास्त्राखेरीज पर्यायी पॅथीचा उपयोग करताना दिसतात. त्यात भारतीय योग सर्वाधिक लोकप्रिय आहे. त्यानंतर चिनी पद्धती ऍक्‍युपंक्‍चर, ऍक्‍युप्रेशर; तसेच युरोपीय होमिओपॅथी यांचा क्रमांक लागतो. 'एमबीएम'चा उदय पर्यायी पद्धतीच्या अभ्यासातूनच झाला आहे. मीदेखील 'एमबीएम'द्वारेच स्वत:चा फिटनेस सांभाळतो आहे,'' असे डॉ. मुतालिक यांनी सांगितले. 

Web Title: Article Mind, Body Medicines