Video : अंदमानात समुद्राच्या पाण्याखालची सफर

स्कुबा डायव्हिंग करताना अनिमिष लिमये.
स्कुबा डायव्हिंग करताना अनिमिष लिमये.

अनिमिष लिमये हा पुणेकर तरुण अंदमानातील हेवलॉक बेटावर येणाऱ्या पर्यटकांना स्कूबा डायव्हिंग शिकवतो. समुद्रात टाकलेल्या कचऱ्यामुळे पाण्याच्या आतील जीव, वनस्पती व प्रवाळ आदींना धोका पोहोचू शकतो. याबद्दल जाणीव जागृती करीत पर्यटकांमधून सागरी पर्यावरण दूत तयार करण्यावर त्याचा भर आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अनिमिष हा पुणेकर तरुण सागरी पर्यावरण सुरक्षित राहावे, यासाठी धडपडत असतो. तो म्हणाला, ‘‘लोकांना समुद्राच्या पाण्यात खोलवर किती मोठं जग आहे, याबद्दल फारसं माहीत नसतं. मी यासाठी स्कूबा डायव्हिंग शिकवायचा मार्ग निवडला. आत्तापर्यंत एकशेवीस जणांना हे शिकवताना, त्यांच्या मनावर सागरी पर्यावरण सुरक्षित ठेवण्याची गरज बिंबवली.

या सगळ्यांच्या मनात आता समुद्राविषयी कायमच आदर राहील आणि ते इतरांना सागरी पर्यावरणाबद्दल सांगत राहतील, असा विश्वास आहे. जीवशास्त्रातील पदवीनंतर मी सागरी पर्यावरण संवर्धन तसेच जैवविविधता यातील अभ्यासक्रम शिकून एका स्वयंसेवी संस्थेत काम केलं. तेथील कामाचा भाग म्हणून समुद्राविषयी संशोधन, महत्त्वाचा तपशील गोळा करीत होतो. एके दिवशी वाटलं की, या सगळ्यांचा वापर शैक्षणिक पातळीवर विद्यार्थी व शिक्षकांना फार होईल. सर्वसामान्य माणसाला याचा काय उपयोग? सागरी पर्यावरणाबाबत त्याला कसं जागं करायचं? मला पाण्यात खोल बुडी मारता येत होतीच. स्कूबा डायव्हिंगचं रीतसर प्रशिक्षण घेऊन ते इतरांना शिकवायचं. त्या माध्यमातून लोकांमध्ये सागरी पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करायची, असा निर्धार केला.’’

अनिमिषने असेही सांगितले की, गेल्या पाच वर्षांपासून गोवा, इंडोनेशिया, झांजिबार, वेस्ट इंडीज, अंदमानमध्ये मी स्कूबा डायव्हिंग शिकवत आलो आहे. सध्या अंदमानच्या हेवलॉक बेटावर माझा मुक्काम आहे. भारतीयांमध्ये सागरी पर्यावरणप्रेमी निर्माण व्हायला हवेत. आपल्या एवढ्या प्रचंड लोकसंख्येपैकी मोजक्‍याच लोकांना पोहता येतं. त्यातूनही समुद्रात खोल बुडी मारू शकणाऱ्यांची संख्या फारच कमी. समुद्र किनाऱ्यांवर किंवा थेट समुद्रात टाकलेल्या कचऱ्यामुळे पाण्याच्या आतील जीव, वनस्पती व प्रवाळ आदींना धोका पोहोचू शकतो. सागरी पर्यावरण सुरक्षितता आणि संवर्धनासाठी वातावरण निर्माण होणं गरजेचं आहे. अतिशय रम्य अशी समुद्राच्या पाण्याखालची सफर पर्यटकांना घडवून आणल्यावर मी त्यांना या संदर्भात जाणीव जागृती करणारे दूत म्हणून काम करण्याचं आवाहन करतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com