Video : जर्मनी व भारतादरम्यान असाही एक सांस्कृतिक सेतू

जर्मनीतील स्त्रीयांची भारतीय पोशाख परिधानाची हौस पूर्ण करून आगळावेगळा भगिनीभाव जागविणाऱ्या (उजवीकडील पहिल्या) सुजाता ओगले.
जर्मनीतील स्त्रीयांची भारतीय पोशाख परिधानाची हौस पूर्ण करून आगळावेगळा भगिनीभाव जागविणाऱ्या (उजवीकडील पहिल्या) सुजाता ओगले.

जर्मनीत ४८ वर्षं राहात असलेल्या सुजाता ओगले या तेथील लोकांना भारतीय संस्कृतीबद्दल माहिती पुरविण्यासाठी उपक्रम राबवतात. येथील सण, उत्सव, पेहराव, खाद्यपदार्थ व संगीत आदींचा समावेश असलेल्या कार्यक्रमांचं आयोजन करतात. तेथील नागरिकांकडून दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीचा विनियोग त्या भारतातील गरजू संस्थांना मदत म्हणून करतात. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जर्मनीत वास्तव्याला असताना, तेथील लोकांना भारताबद्दल चांगली माहिती देणं, हा छंद विरळाच म्हणायला हवा. सुजाता ओगले यांनी मायभूमीची ओळख जर्मनवासीयांना निरनिराळ्या उपक्रमांमधून करून देण्याचा सामाजिक वसा घेतला आहे. त्या म्हणाल्या, ‘‘भारत देशाबद्दल अनेक माध्यमांतून, इतर देशवासीयांच्या मनात निर्माण होणारी प्रतिमा बरेचदा चांगली नसते. जर्मनीतल्या लोकांना भारताबद्दल चांगली माहिती पुरविण्यासाठी मी वेगवेगळे उपक्रम राबवले. कित्येक वर्षं मी इथल्या प्रौढ शिक्षण केंद्रात इंग्रजी शिकवते.

जर्मन विद्यार्थ्यांसाठी मी लिहिलेल्या ‘स्पीक अँड इंप्रेस’ या पुस्तकातील एक प्रकरण महात्मा गांधींवर आहे. जर्मन भाषेत मी ‘जर्मनी व जर्मन नागरिक - एका भारतीय महिलेच्या दृष्टिकोनातून’ असं पुस्तक लिहिलं. याची नवी आवृत्ती अलीकडेच प्रसिद्ध झाली आहे. या पुस्तकात भारतीय प्रथा, जर्मनी व भारतातील लोकसमजुती आदींबाबत विवेचन आहे. यातील निवडक अंशाचं वाचन करून, त्यावरील चर्चेसाठी मला बऱ्याच ठिकाणी बोलावलं जातं. अनेक जर्मन नागरिकांना भारतीय पोशाख, दागिने वगैरेंबाबत कुतूहल असतं. अशांसाठी मी खास भारतीय वस्त्रप्रावरणांचे ‘फॅशन शो’ इथं आयोजित करते. आपल्या स्वयंपाकाच्या पद्धतींमध्येही त्यांना रस असल्याने मी त्या बाबतीतले वर्ग घेऊ शकले.’

सुजाताताईंनी असंही सांगितलं की, जर्मनीत सुमारे १२ टक्के इतर देशीय लोक कायमचे वास्तव्याला आहेत. आणखी सुमारे २० टक्के लोक मूळचे जर्मन नाहीत. हे लक्षात घेऊन ‘एकच जग सर्वांसाठी’ हा कार्यक्रम आयोजित केला. त्यात सहभागींनी आपापल्या देशांतील सांस्कृतिक झलक दाखवणारं सादरीकरण केलं. यावेळी जमा झालेली देणगीची रक्कम मायभूमीतील गरजूंना दिली. भारताबद्दल आयोजित प्रदर्शनाला हजारभर लोकांनी हजेरी लावली. प्रवेशशुल्क नसतानाही स्वेच्छेने भारतातील वंचितांच्या कल्याणासाठी देणग्या दिल्या. त्यांचा विनियोग महाराष्ट्रातील सामाजिक संस्थांच्या मदतीसाठी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com