अब पछताए होत क्या...

अब पछताए होत क्या...

जगात कोणतीही गोष्ट खऱ्या अर्थी फुकट कधी मिळत नाही. वरकरणी ‘मोफत’ वाटणाऱ्या गोष्टींआड अनेकदा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भुर्दंड दडलेला असतो; पण ते लक्षात न आल्यामुळे संबंधितांची फसगत होते आणि नंतर पश्‍चात्तापाची वेळ येते. सध्या अशा घटना सातत्याने घडत आहेत. असे व्यवहार करताना आधीच सावध न राहिल्यास संत कबीरांच्या दोह्यात म्हटल्याप्रमाणे ‘अब पछताए होत क्या, चिड़िया चुग गयी खेत,’ ही वेळ येऊ शकते...

परदेशात स्थायिक आहे, असे सांगणाऱ्याची ओळख फेसबुकच्या माध्यमातून होते... मैत्री वाढते... त्याला अचानक प्रेमाचा पुळका येतो आणि ‘तुला महागडी भेटवस्तू पाठवली आहे,’ असा त्याचा मेसेज येतो... भेटवस्तूवर सीमाशुल्क (कस्टम्स ड्यूटी) भरायचे आहे, म्हणून तो ‘मैत्रिणी’ला एका खात्यावर काही लाख रुपये ऑनलाइन पद्धतीने भरायला लावतो.. आणि गोष्ट येथेच संपते! कारण ती कथित वस्तू कधीच मिळत नाही, तो अज्ञात मित्रही संपर्क साधायचे बंद करतो. आपली फसवणूक झाली आहे, हे उशिराने लक्षात आलेली महिला पोलिसांकडे धाव घेते.. हे चक्र अजूनही सुरूच आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नऊ लाखांचा फटका
परदेशातील ‘गिफ्ट’च्या नादी लागून पुण्यातील एका महिलेने नुकतेच नऊ लाख रुपये गमावले. त्याची फिर्याद दोन दिवसांपूर्वी पोलिसांकडे दाखल झाली आहे. हिंदी चित्रसृष्टीत ठरावीक कथानके त्यांतील पात्रांची नावे बदलून वेगवेगळ्या चित्रपटांत पाहायला मिळतात, तसा हा प्रकार आहे. ‘फुकटात भेटवस्तू देतो’, ‘वर्षभरात दामदुप्पट पैसे करून देतो’, ‘तुमच्या वडिलांच्या विमा पॉलिसीची (विनाक्‍लेम) काही लाखांची रक्कम मिळवून देतो’... अशी ठरावीक प्रलोभने दाखवून दुसऱ्यांच्या पैशांवर डल्ला मारण्याच्या अनेक घटना आजवर घडल्या आहेत. त्या माहीत झाल्यावर इतरांनी सावध होणे अपेक्षित आहे; पण प्रत्यक्षात तसे होत असल्याचे दिसत नाही.

व्यवहारज्ञानाचा अभाव
अर्थसाक्षरता, व्यावहारिक ज्ञान यांच्या अभावातून हे आर्थिक फटके सहन करण्याची वेळ ओढवते. ‘फेसबुक’सारखी समाजमाध्यमे आधुनिक जीवनात अविभाज्य घटक झाली असली, तरी त्यांतून प्रस्थापित होणारी मैत्री, संपर्क अनेकदा आभासी असतो. त्यावरील व्यक्तीचे नाव, लिंग, अन्य प्रोफाईल खरेच असेल, याची शाश्‍वती नसते. त्यामुळे ज्या व्यक्तीला आपण आयुष्यात कधी पाहिले नाही, तिच्या सांगण्यावर- भूलथापांवर विश्‍वास ठेवून कोणी डोळे झाकून लाखो रुपये देत असेल, तर खिशाला चाट बसणे अटळ आहे.

‘फसगतप्रवण’ वृत्ती
विशिष्ट रस्त्यावर काही ठिकाणी ‘अपघातप्रवण क्षेत्र’ असा फलक ठळकपणे लावलेला असतो. कारण त्या ठिकाणी वारंवार दुर्घटना होत असतात. त्याचप्रमाणे, काही व्यक्तींचा स्वभाव, कार्यपद्धती (त्यांची) फसवणूक होण्यास अनुकूल असते. त्यांच्याकडून समाजमाध्यमांवर मांडले जाणारे विषय, छायाचित्रे, त्यांची आवड-नावड, इतरांच्या ‘पोस्ट’वर त्यांच्याकडून व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रिया यांतून त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील जमेच्या आणि कमकुवत बाबीही स्पष्ट होत असतात. त्या हेरून समाजमाध्यमांवरील सराईत चोर आपले सावज निश्‍चित करू शकतात. त्यांनी टाकलेल्या जाळ्यात अडकून आतापर्यंत असंख्य ‘भाबड्या’ लोकांनी कोट्यवधी रुपये गमावले आहेत.

‘केवायसी’चा बहाणा
काही वेळा पैशाचे वा अन्य प्रलोभन नसते; पण आर्थिक गैरसोय होण्याची भीती दाखवून बॅंक खात्याची गोपनीय माहिती देण्यास भाग पाडले जाते. ‘त्वरित माहिती द्या, अन्यथा तुमचे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड बंद पडेल,’ असा फोन आल्यावर अनेक जण कसलीही शहानिशा न करता, समोरच्याला हवा तो तपशील देऊन मोकळे होतात. हे म्हणजे चोराच्या हाती तिजोरीची चावी सुपूर्त केल्यासारखे असते! मध्यंतरी ‘पेटीएमची केवायसी प्रोसेस’ या नावाखाली असेच प्रकार झाले. ‘तुमच्या पेटीएम अकाउंटची ‘केवायसी’ पूर्ण करायची आहे. त्यासाठी बॅंक डिटेल्स पाहिजेत,’ किंवा ‘लिंक पाठवतो. त्यावर सगळी माहिती भरा,’ असे मोबाईल फोनवर सांगून कितीतरी बॅंक खाती रिकामी करण्याचे प्रकार घडले आहेत. हे उद्योग करणारे शर्विलक बहुधा महाराष्ट्राबाहेरील असतात. उत्तराखंडमधील काही गावांतील गुन्हेगार यासाठी कुख्यात आहेत. अपरिचित मुलखात जाऊन त्यांचा शोध घेणे महाराष्ट्रातील पोलिसांना जिकिरीचे जाते. त्यामुळे तक्रार दाखल झाली, तरी खात्यातून गायब झालेले पैसे पुन्हा परत मिळणे, हे जवळपास दुरापास्त झाले आहे.

जागरूक राहण्याची गरज
पैसे कमवायला कर्तृत्व नक्कीच लागते; पण त्याहीपेक्षा ते टिकवणे आणि वाढवणे, अधिक अवघड असते, असे म्हणतात. ज्यांची फसवणूक लाखाच्या पटींत झाली आहे, ते बव्हंशी सुशिक्षितच असणार; परंतु त्यांना अर्थसाक्षर म्हणता येणार नाही. या अर्थभानाच्या अभावी त्यांच्यावर हे संकट आले आहे. ते टाळण्यासाठी स्वतः जागरूक राहणे, याला पर्याय नाही. आर्थिक गुन्हेगारीच्या बातम्या दैनिकांत, अन्य माध्यमांत सतत प्रसिद्ध होत असतात. त्यांचा अभ्यास नाही; पण निदान नीट वाचन केले, तर चोरांच्या वाटा कळायला मदत होईल. हे करूनही, "आपल्याबाबत असे घडणार नाही'' या अंधविश्‍वासाने कोणी ‘विषाची परीक्षा’ घेत असेल, तर त्यांना लुबाडण्याची संधी चोरांना वारंवार मिळत राहणार हे नक्की!

ही दक्षता घ्याच 

  • आपल्या बॅंक खात्याचा तपशील कधीही कोणाला फोनवर सांगू नका.
  • बॅंका खात्यासंबंधीची गोपनीय माहिती कधीही फोनवर विचारत नाहीत.
  • केवळ समाजमाध्यमांतून संपर्कात आलेल्या अपरिचित व्यक्तींशी आर्थिक व्यवहार टाळा.
  • ‘परदेशातील भेटवस्तू’ हा बहुधा सापळा असतो! त्यात अडकू नका.
  • क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड सेवा बंद केली असल्याचा फोन आल्यास, संबंधिताला माहिती देण्याचे टाळा. स्वतः बॅंकेत जाऊन अधिकाऱ्यांशी बोला.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com