भय इथले संपवूया...!

भय इथले संपवूया...!

‘कोरोना’चे संकट अद्याप संपुष्टात आलेले नाही; पण म्हणून ‘यापुढे खूप गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे’ या कल्पित भयाचे ओझे डोक्‍यावर घेऊन ‘वर्तमाना’तील आनंदाला पारखे होण्याचे कारण नाही! ‘मास्क-सोशल डिस्टन्सिंग-हातांची स्वच्छता’ ही त्रिसूत्री पाळा आणि  सुरक्षित राहा... मस्त राहा!

‘कोरोना’च्या अभूतपूर्व संकटाने गेले सहा-सात महिने संपूर्ण जगाला झाकोळून टाकले आहे. त्याच्या विध्वंसकतेची नेमकी कल्पना नसल्याने, जागतिक आरोग्य संघटनेने इशारा देऊनही सुरुवातीला अनेक देश गाफील राहिले. त्याचे परिणाम त्यांना आणि त्यांच्यामुळे इतरांना भोगावे लागले. आता परिस्थिती सुधारू लागली आहे. आपत्तीचे निवारण पूर्णपणे झाले नसले, तरी ती बऱ्यापैकी नियंत्रणात आली आहे. पुण्यातील बाधितांची वाढती संख्या हा काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय चर्चेचा विषय ठरला होता; पण या शहरातील सक्रिय रुग्णांचा आकडा आणि मृत्युदर अलीकडे देशभरात नीचांकी पातळीवर आला आहे. हे परिवर्तन केवळ आरोग्याच्या पातळीवर नव्हे, तर आर्थिक उलाढालींतही प्रतिबिंबित होऊ लागले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मंदीची छाया विरळ
‘कोरोना’मुळे लागू करण्यात आलेला ‘लॉकडाउन’ अद्याप मागे घेण्यात आलेला नाही. मात्र, त्याचे स्वरूप पूर्वीसारखे जाचक राहिलेले नाही. शाळा, मंदिरे, चित्रपटगृहे असे काही अपवाद वगळले, तर बरीचशी क्षेत्रे खुली झाली आहेत. ‘नियम पाळून तुमचे नित्यव्यवहार पार पाडा,’ असे साधे सूत्र आहे. त्याचे चांगले परिणाम व्यवसाय-उद्योगांत दिसू लागले आहेत. मोटारी, स्वयंचलित दुचाकी आदी वाहनांची विक्री पूर्ववत पातळीवर पोचली आहे. ‘कोरोना’च्या आधीपासूनच अडचणीत असलेला बांधकाम व्यवसाय मंदीच्या छायेतून बाहेर येऊ लागला आहे. गुंतवणुकीसाठी नाही; पण निवासासाठी लोक घरखरेदीकडे वळू लागले आहेत. सोने-चांदी, कपडे, गृहोपयोगी वस्तू, मोबाईल फोन, विविध गॅजेट आदींच्या खरेदीसाठी दुकानांतील गजबज वाढली आहे. विशिष्ट मॉलमध्ये ग्राहकांची झुंबड आजही पाहायला मिळत आहे. ऑनलाइन बाजारांचे ‘मेगा सेल’ सुरू झाले आहेत.

दिवाळीआधी ‘लक्ष्मी’ प्रसन्न
ही सर्व उदाहरणे म्हणजे अर्थचक्राला गती येत असल्याचे निदर्शक आहे. अनेक खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची पगारकपात मागे घेतली आहे. विविध क्षेत्रांत प्रचंड पसारा असलेल्या ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ने आधी केलेली कपातही कर्मचाऱ्यांना परत देण्याचा निर्णय घेतला आहे. (टाटा उद्योगसमूहाने आर्थिक संकट असतानाही परिवारातील सर्वांना पूर्ण पगार देण्याचे धोरण ठेवले होते.) याचा लाभ त्यांच्या लाखो कर्मचाऱ्यांना होत आहे. ही उद्योगसाम्राज्ये असल्याने त्यांच्या निर्णयांची चर्चा प्रसारमाध्यमांत विशेषत्वाने होते. मात्र इतरही अनेक कारखाने-व्यवसायांत कर्मचाऱ्यांना दिलासा देणाऱ्या गोष्टी घडत आहेत. कामगार संघटनांबरोबर वेतनवाढीचे करार होत आहेत, दिवाळी बोनस जाहीर झाला आहे. केंद्र सरकारनेही प्रवास भत्त्याच्या स्वरूपात कर्मचाऱ्यांच्या हातात खर्च करण्यासाठी पैसा दिला आहे. हा पैसा बाजारात चैतन्य निर्माण करण्यास हातभार लावणार आहे.

हिवाळ्यातील धास्ती
‘कोरोना’चे संकट जगातून केव्हा हद्दपार होईल किंवा पूर्ण नियंत्रणात येईल, याचा अंदाज कोणालाही नाही. आता मॉन्सूनने भारताचा निरोप घेतला असून, हिवाळ्याची चाहूल लागली आहे. ‘थंडीच्या दिवसांत हा आजार पुन्हा वेगाने डोके वर काढेल, कोरोनाची दुसरी लाट येणार आहे,’ असे भाकीत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, काही देशांमध्ये रुग्णसंख्या वाढू लागल्याच्या बातम्याही येऊ लागल्या आहेत. फ्रान्स, जर्मनी आदी देशांनी ‘लॉकडाउन’, संचारबंदी आदी निर्बंध जाहीर केले आहेत. मग आपल्याकडे तेच होईल का, अशी काळजी अनेकांना वाटत आहे. ती रास्त असली, तरी तेथील आणि भारतातील परिस्थिती एकसमान आहे, असे समजण्याचे कारण नाही.

‘त्रिसूत्री’ महत्त्वाची
काही देशांतील नागरिकांनीच नव्हे, तर तेथील कारभाऱ्यांनीही ‘कोरोना’बाबत प्रारंभी बेपर्वाई दाखविली. टाळेबंदी, मास्कची सक्ती अशा उपायांना त्या ठिकाणी विरोध करण्यात आला; काही शहरांत  
तर लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले! भारतात शिस्तीचा बडगा दाखवून का होईना, परिस्थिती आटोक्‍यात आली आहे. लोकांनी निर्बंधांसह जगण्याची नवीन जीवनशैली स्वीकारली आहे.  
त्यामुळे थंडीचा काळ ‘कोरोना’'' विषाणूच्या वाढीला पोषक ठरला, तरी घाबरण्याचे कारण नाही. त्याला प्रतिकार करण्यासाठी नागरिकांनी ‘मास्क - सोशल डिस्टंन्सिंग - हाताची स्वच्छता’ या त्रिसूत्रीचे पालन केले आणि सार्वजनिक आरोग्य यंत्रणा संभाव्य धोक्‍याला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहिल्यास ‘कोरोना’ला त्याच्या ऐन भरातही निष्प्रभ करणे नक्कीच शक्‍य आहे.

चिंतातुर नव्हे; दक्ष राहा
दुसरे म्हणजे, तज्ज्ञांचे अंदाज प्रत्येक वेळी वास्तवात उतरतातच असे नाही. याचे एक ठळक उदाहरण म्हणजे, भारतात ‘कोरोना’चे आक्रमण सुरू झाले, तेव्हा काही अभ्यासकांनी संख्याशास्त्रीय पद्धतीने मांडणी करून आगामी प्रत्येक महिन्यातील संभाव्य रुग्णांची संख्या वर्तवली होती. तो आकडा भयावह वाटावा असा होता. प्रत्यक्षात तेवढी गंभीर स्थिती उद्‌भवली नाही. तथापि, याचा अर्थ आपण यापुढे नियमांना न जुमानता मुक्त व्यवहार करावेत, निष्काळजी राहावे, असे अजिबात नाही. आपणास चोवीस तास दक्ष राहावेच लागणार आहे; पण उगाच कल्पित भयाचे ओझे डोक्‍यावर घेऊन ‘वर्तमाना’तील आनंदाला पारखे होण्याचे कारण नाही!

संधीची कवाडे खुली
देशात ‘फील गुड’ वातावरणनिर्मिती होऊ लागली असली, तरी सरसकट आम जनतेसाठी सारे आलबेल झाले आहे, असे नाही. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, काही व्यवसायांतील मरगळ अद्याप दूर झालेली नाही, गृहकर्जाचे थकलेले हप्ते कसे फेडायचे याची चिंता मध्यमवर्गीयांना आहे... प्रश्‍न अनेक आहेत. मग त्यांच्यासाठी सद्यःस्थितीत फरक नेमका कोठे पडला आहे?... तो असा आहे, की गेल्या सहा-सात महिन्यांत सगळ्याच संधींची दारे जवळपास बंद होती. कारण जो उद्योग वा व्यावसायिक स्वतः अडचणीत आहे, तो इतरांना काय मदत करणार, अशी परिस्थिती कडक टाळेबंदीच्या काळात होती. आता हे चित्र बदलत असून, तेथील कवाडे खुली होऊ लागली आहेत. त्याचा फायदा गरजूंना नजीकच्या काळात मिळू शकेल. त्यामुळे नकारात्मक भावना बाजूला ठेवून, आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी पुन्हा जोमाने कामाला लागण्याची गरज आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com