बातमी पलीकडे : उजळा दिवे संयमाचे!

Lamp
Lamp

घराघरांत आज चर्चा आहे ती रात्रीच्या दिवे लावण्याची. पंतप्रधानांनी एक कार्यक्रम दिला, त्याची अंमलबजावणी सर्वजण करतीलच. पण, खरा प्रश्‍न आहे तो संयमाच्या दिवे लावणीचा. उत्सव-सण साजरे करायला आपण पटाईत आहोत, आपली ती परंपराही आहे. पण अधिक गडद होत चाललेल्या संकटावर मात करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने घालून दिलेले शास्त्रीय नियम पाळण्यासाठी आपण आग्रही राहायलाच हवे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडने तर आता स्वतःहून प्रचंड बंधने घालून घेण्याची गरज आहे.

कोरोनाची केंद्र बनलेल्या चीनमधील वुहान, इटलीतील मिलान या शहरांच्या यादीत भारतातील पुणे येण्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे. गेल्या रविवारी पुणे आणि पिंपरी-चिंचवड धरून ३६ कोरोना पॉझिटिव्ह होते तर एकाचा मृत्यू झाला होता. बरोबर सात दिवसांनी हा आकडा ७० हून अधिक झाला असून मृतांची संख्या दोन झाली आहे.

वुहान किंवा मिलान आणि पुण्यात फरक काय आहे, असा आपल्याला प्रश्‍न पडला असेलच. तर फरक हा आहे की, वुहान आणि मिलानमध्ये कोरोनाचा हाहाकार झाला होता, तेव्हा कोरोना काय आहे, याची पूर्ण कल्पना आपल्याला होती, त्याला रोखण्यासाठी काय उपाययोजना, कोणती काळजी घ्यायला हवी होती याची यथेच्छ माहिती आपल्याला होती, पण आपण तेवढ्या गांभीर्याने स्वतःवर बंधने घालून घेतली नाहीत. उलट प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांवरच हजारो ‘पुणेरी’ प्रश्‍न उपस्थित केले. 

‘लॉकडाऊन’चा नेमका अर्थ समजून न घेता अनेकजण गावभर फिरत राहिले. बाहेरच्या येणाऱ्यांवर सुरवातीच्या काळात योग्य निर्बंध घातले गेले नाहीत. जिल्हा प्रशासन असेल किंवा पोलिसांच्या सूचनांना आपण गांभीर्याने न घेता हा अतिरेक सुरू आहे, असे म्हणून त्या धुडकावून लावल्या. त्यामुळेच आज ‘लॉकडाउन’ची बंधने अधिक कडक करावी लागली. तरीही पोलिसांकडे बाहेर पडण्यासाठी परवानगी मागणारे सव्वालाखाहून अधिक अर्ज आले आहेत. याशिवाय, जे नियम न पाळताच बाहेर पडत आहेत, त्यांची संख्या याहून अधिक आहे. त्यामुळे दिवे लावून स्वयंशिस्तीचा प्रकाश आपण स्वतःभोवती पाडला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचे सार्थक झाले असे म्हणावे लागेल. 

पुण्याला आता चारही बाजूंनी कोरोनाचा विळखा पडला आहे. सिंहगडरोड, विमाननगर, पर्वती, कोंढवा, मंगळवार पेठ, रविवार पेठ, पिरंगुट असे शहराच्या सर्वबाजूंना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आपण फार सुरक्षित आहोत, असे समजण्याचे मुळीच कारण नाही. गरज आहे ती प्रत्येकाने स्वत:ला सुरक्षित ठेवण्याची. घरात भाजीपाला, दूध, औषधे, किराणा या गोष्टी लागणारच आहेत. पण त्याचे योग्य नियोजन करता आले पाहिजे. दूध, गॅस, भाजीपाला मिळणारच नाही, असे समजून अनेक ठिकाणी आजही रांगा आहेत. शहराच्या काही उपनगर भागात आजही ‘लॉकडाऊन’चे नियम पाळताना दिसत नाही. पेठांसारख्या काही भागात त्याचे चांगले पालन होताना दिसत आहे. पण जोपर्यंत सर्वजण मिळून आपण घराबाहेर पडण्याचे बंधन घालून घेणार नाही, तोपर्यंत ‘कोरोना’ हा तुमची पाठ सोडणार नाही, हे इतर देशांच्या अनुभवावरून स्पष्ट होते. आता सर्वांना १४ एप्रिलचे वेध लागले आहेत. लॉकडाऊन उठवा अशी मागणीही आता समोर येत आहे, पण पुणे जिल्ह्यातील रुग्णांचा आकडा एवढ्या दिवसांत कमी का झाला नाही, याची कारणेही आपल्यालाच शोधावी लागतील. 

लॉकडाउनमुळे अनेक संकटे आपल्यासमोर आहेत, पण सध्या जीव वाचविण्याला अधिक प्राधान्य द्यायला हवे, हे केवळ एकट्याने समजून घेऊन उपयोगाचे नाही, तर प्रत्येकाने स्वतःसाठी आणि सर्वांनी सर्वांसाठी काही नियम पाळलेच पाहिजेत. त्यासाठी अजूनतरी घरी बसणे हाच उपाय आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com