‘दम’ नाही ‘दिमाग’च वापरा!

Corona-Test
Corona-Test

पालकमंत्री अजित पवार जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर अधिकाऱ्यांना दम देऊ लागले आहेत. पण, कोरोना विरोधातील लढाईत गेल्या सहा महिन्यांत पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवडमध्ये काय केले याचे एकही समाधानकारक उत्तर त्यांच्याकडे नाही. मुंबई, मालेगाव आदी भागातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येऊ शकते, मग पुण्यात का नाही, हा प्रश्‍न आता सर्वांना पडला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रशासन, राज्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी एकत्रित प्रयत्नांची मोट बांधली तरच कोरोनावर मात करणे शक्‍य आहे, अन्यथा परिस्थिती यापेक्षा गंभीर होईल. कोरोनावरील लस एवढ्यात येईल अशी कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. याचा अर्थ सरळ आहे, कोरोनासोबतची लढाई आणखी काही महिने-वर्ष लढावीच लागणार आहे. ही महामारी आहे. महामारीशी लढताना सामुदायिक शक्तीच वापरावी लागणार आहे. तुकड्या तुकड्यांतील प्रयत्न किंवा ‘जम्बो’सारखे फाटेल तेथे ठिगळे लावून आता भागणार नाही. 

एकट्या पुण्यात रुग्णांची संख्या सव्वा लाखावर पोहोचली आहे. तर तब्बल तीन हजारांच्या घरात पुणेकरांचा मृत्यू झाला आहे. नोंद नसणारे किंवा ज्यांची चाचणीच झाली नाही, असा आकडा अद्याप बाहेर आलेला नाही. मार्चपासून आजही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या ७४ भागात लॉकडाउनची परिस्थिती कायम आहे. दुसऱ्यांदा शहर लॉकडाउन करण्याचा प्रयोगही फसला आहे. अशा वेळी स्वतःची प्रतिकारशक्ती वाढवून कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या कशी वाढेल यावर भर द्यावा लागेल. 

पुण्यात सुदैवाने कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या ७० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आहे. उपचार घेणारे रुग्ण केवळ सतरा हजार आहेत. तरीही पुण्यासारख्या महानगरात सर्व यंत्रणा कामाला लागल्यानंतरही आरोग्य सुविधेची लक्तरे निघाली आहेत. सध्याची परिस्थिती सुधारण्यासाठी ‘कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग’ला पुन्हा एकदा महत्त्व द्यायला हवे. थकलेल्या यंत्रणा सध्या केवळ कागद रंगविण्याचे काम करीत आहे. रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचे अद्यापही गांभीर्याने ट्रेसिंग होत नाही. त्यामुळेच ही साखळी तोडता येत नाही. 

कात्रज, हडपसर-मुंढवा, वारजे, कोथरूड-बावधन, नगररोड या शहराच्या चोहोबाजूंनी आता रुग्ण संख्या वाढली आहे. ती रोखण्यासाठी स्वतंत्र प्लॅन करावा लागेल. पालकमंत्री दर आठवड्याला आढावा बैठक घेतात, पण त्यात ठरवलेल्या किती गोष्टी होतात, हे तपासावे लागेल. एका बाजूला आपण ‘न्यू नॉर्मल’साठी झटत असताना कोरोनाचे संकट अधिक गडद होणे कोणालाच परवडणारे नाही. 

या प्रश्‍नांची उत्तरे मिळतील का?

  • कोणाचाही वशिला न लावता रुग्णांना बेड कधी मिळेल?
  • खासगी रुग्णालयांकडून होणारी बिलांची लूट थांबणार का? 
  • औषधोपचारांचे दर ठरवून देणार का? 
  • औषधांच्या नावाखाली मेडिकल दुकानांकडून होणारी लुबाडणूक थांबेल का? 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com