Metro
Metro

मेट्रोचा विस्तार करण्याच्या अंमलबजावणीचाही ‘स्पीड’ वाढवा

पालकमंत्री अजित पवार यांनी शंभर किलोमीटरपर्यंत मेट्रोचा विस्तार करण्याच्या सूचना देऊन पुण्याच्या वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला. ‘एचसीएमटीआर’च्या (उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गा) जागी ‘मेट्रो निओ’चा प्रस्तावही मांडण्यात आला. हे प्रकल्प शहरासाठी महत्त्वाचे आहेतच; त्यामुळे त्यांची व्यवहार्यता तपासून अंमलबजावणी होण्यासाठी पवार यांना लक्ष द्यावे लागणार आहे.

सध्या प्रत्येक पुणेकराचा दररोज वाहतूक कोंडीत अडकून सरासरी किमान दोन ते तीन तास वेळ वाया जात आहे. त्याचबरोबर छोट्या-मोठ्या तसेच प्राणघातक अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे पुण्यातील कोणत्याही नागरिकाला विचाराल, तर तो ‘आधी वाहतूक कशी सुरळीत होईल, हे बघा,’ हेच सांगताना दिसतो. वाहतुकीचा हा प्रश्‍न खरोखरीच जटिल  बनला आहे. पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था दुर्लक्षित आणि टिंगलीचा विषय झाला आहे. त्याचेच दुष्परिणाम पुणे आणि पिंपरीकरांना भोगावे लागत आहेत.अजूनही ‘पीएमपी’ला ऊर्जितावस्था आणावी, अशी मानसिकता ना इथल्या लोकप्रतिनिधींमध्ये ना प्रशासनात दिसून येते.

मागील सरकारच्या काळात निदान मेट्रोला गती मिळाली आणि अनेक अडथळ्यांची शर्यत पूर्ण करून पुण्यात मेट्रो रुळावर आली. पहिल्या टप्प्यात ३१ किलोमीटरचा मार्ग पूर्ण होत आहे. पण, मेट्रोचा विस्तार शहराच्या चारही दिशांना जोपर्यंत होणार नाही आणि मेट्रोला जोडणाऱ्या इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांचे जाळे विणले जाणार नाही तोपर्यंत शहरातील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्‍न सुटणार नाही. त्यादृष्टीनेच पालकमंत्र्यांच्या बैठकीत चर्चा झाल्यानुसार पिंपरी ते निगडी, स्वारगेट ते कात्रज, वनाज ते चांदणी चौक, शिवाजीनगर ते लोणी काळभोर, नाशिकफाटा ते चाकण, स्वारगेट ते हडपसर हे मार्गही तेवढेच महत्त्वाचे वाटतात. अर्थात, मेट्रोचा मार्ग उभारण्यासाठी कोट्यवधींचा खर्च येतो. हा खर्च एकदम उचलणे राज्य-केंद्र सरकार आणि पुणेकरांनाही शक्‍य होणार नाही. त्यामुळे या मार्गांमध्ये प्राधान्यक्रम ठरवून काम करावे लागेल. त्यासाठीच्या निधीची तरतूद आणि प्रकल्पाच्या किमती वाढणार नाहीत, याचीही दक्षता घ्यावी लागेल. 

मेट्रोसारखीच शहरात गेल्या वीस वर्षांपासून ज्या प्रकल्पांवर केवळ चर्चाच सुरू आहे; अशा ‘एचसीएमटीआर’च्या जागी आता ‘मेट्रो निओ’ करण्याचा विचारही पुढे आला आहे. खरेतर ‘एचसीएमटीआर’ची त्याच वेळी अंमलबजावणी झाली असती, तर आज शहरातील वाहतुकीचे चित्र वेगळे असते. पण, आम्हाला एखादा प्रकल्प पूर्ण करण्यापेक्षाही त्यावर चर्चा करण्यात, त्याची किंमत वाढविण्यात अधिक रस असतो.

गेल्या वीस वर्षांत असे अनेक प्रकल्प आपण किमती काही पटींमध्ये वाढवून केले आहेत. आता ‘मेट्रो निओ’चे तसे होणार नाही ना, हे पाहावे लागेल. पवार यांच्या कामांचा झपाटा मोठा आहे. पण, प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पातळीवर त्यांना अधिक लक्ष द्यावे लागेल. वाहतुकीच्या इतर पर्यायांचा विचार करताना ‘पीएमपी’ला सर्वाधिक प्राधान्य द्यावे लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com