ही तर केवळ धोक्‍याची घंटा!

संभाजी पाटील
रविवार, 29 सप्टेंबर 2019

आज कात्रज उद्या..!
विधानसभेच्या निवडणुका आता लागल्या आहेत, त्यामुळे राजकारणी पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्याचे नाटक जरूर करतील; पण त्याने प्रश्‍न सुटणार नाही, तर ओढे-नाले अडविणाऱ्या, त्याच्या आसपास बांधकाम परवानग्या देणाऱ्या यंत्रणांना जाब विचारावा लागेल. व्यवस्थांवर टीका करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना, तज्ज्ञांना ही परिस्थिती सुधारण्यासाठी योग्य पर्याय द्यावे लागतील; अन्यथा आज कात्रज झाले, उद्या पाषाण असेल, हाच काय तो फरक राहील.

विकास हवा; पण कोणती आणि कोणाची किंमत मोजून! पंचवीसहून अधिक निष्पाप पुणेकरांचे प्राण काही तासांच्या आत पावसाने घेतले. अतिवृष्टीने हा प्रकार झाल्याचे समाधान मानून गप्प बसावे एवढी छोटी ही घटना निश्‍चितच नाही. कात्रज- मांगडेवाडीप्रमाणे शहराच्या चारही बाजूंनी पुण्याभोवती मृत्यू घोंघावतोय..! याची ही केवळ एक झलक होती... 

पुणे शहराचा आकार बशीसारखा आहे. त्याच्या चारही बाजूंना असणाऱ्या टेकड्यांमुळे शहराचे हवामान अल्हाददायक राहते. खडकवासला आणि त्याच्यावर असणाऱ्या धरणांमुळे शहराला मुबलक पाणीपुरवठा होतो. शहराच्या आसपास असणाऱ्या टेकड्यांपासून उगम पावणारे ओढे-नाले हे वर्षानुवर्षे शहराचे पर्यावरण जपण्याचे काम करीत आहेत; पण गेल्या दहा-पंधरा वर्षांत याच नैसर्गिक स्रोतांवर विकासाच्या नावाखाली डल्ला मारण्यात आला आहे, त्यामुळेच विकास आराखड्यातून अनेक ठिकाणचे ओढे-नाले गायब करण्याचा प्रताप तत्कालीन नियोजनकर्त्यांनी केला. त्याचे भोग आता सर्वसामान्य पुणेकरांना भोगावे लागत आहेत. 

बुधवारी रात्री झालेल्या १०० ते १३० मिलिमीटर पावसाने अर्धे पुणे संकटात सापडले. लोकांची घरी जाण्याची वेळ, तेव्हाच पाऊस आला आणि ओढे-नाले भरून वाहू लागल्याने सर्वत्र हाहाकार माजला. कात्रजच्या घाटातून उगम पावणाऱ्या आंबिल ओढ्याला नदीचे रूप आले. ओढ्याच्या कडेला भराव घालून त्यावर बांधलेल्या भिंती फोडून पाणी लोकांच्या घरात घुसले. 

कात्रज पट्ट्यात सोमवारपासूनच पाऊस पडत होता; पण बुधवारी कहर झाला. भिलारेवाडी, मांगडेवाडी, गुजर- निंबाळकरवाडी या कात्रज घाटाच्या पट्ट्यातील सहा वाड्यांच्या भागातून मोठ्या प्रमाणावर पाणी थेट कात्रजच्या पेशवे तलावाकडे आले. या पट्ट्यात पडलेला पाऊस त्या भागात थांबलाच नाही. या भागात सध्या मोठ्या प्रमाणावर नागरीकरण होत आहे, त्यामुळे एकतर मोठ्या प्रमाणावर या भागात टेकडीफोड होत आहे, दुसरीकडे प्लॉटिंग पाडताना ओढे-नाले सर्रास बुजविण्यात आले आहेत. या सर्वांचा परिणाम बुधवारी रात्री दिसून आला. 

कात्रज बोगद्याच्या दोन्ही बाजूंना आजही टेकडीफोड सुरू आहे. प्रश्‍न हा आहे, की जे सर्वसामान्य नागरिकांना दिसते, ते जिल्हा प्रशासनास का दिसत नाही? हीच बाब महापालिका प्रशासनालाही लागू होते. दहा ते पंधरा वर्षांपूर्वी विकास आराखड्यात आणि नकाशावर दिसणारे ओढे-नाले कुठे गेले? जे नाले आहेत त्यांची रुंदी कमी झाल्यानंतर कोणती कार्यवाही करण्यात आली? 

आंबिल ओढ्याच्या दोन्ही बाजूंना भराव टाकण्यात येत होते, त्या वेळी लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन नेमके कोठे होते? केवळ पावसाच्या माथी मारून या गंभीर प्रश्‍नाला मुळीच बगल देता येणार नाही. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत ज्या घरातील निष्पाप लोकांचे बळी गेले, त्यावर थातूरमातूर उत्तरे देऊनही भागणार नाही. गरज आहे, ती ठोस पावले उचलण्याची; नैसर्गिक स्रोत अगदी डोंगरमाथ्यापासून नदीपर्यंत जपण्याची.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Sambhaji Patil on Pune Flood