युद्ध जिंकायचंय, तर...!

रविवार, 31 मे 2020

घरात अन्‌ घराबाहेर... राज्य सरकारने रस्त्यावर थुंकणाऱ्यांसाठी एक ते पाच हजारांपर्यंतच दंड तसेच शिक्षेचे आदेश काढले आहेत. जर आपल्याला लॉकडाउन वाढायला नको असेल तर सार्वजनिक स्वच्छतेच्या किमान सवयी लावून घ्याव्याच लागतील. त्याहीपेक्षा ९५ टक्के नियम पाळणाऱ्यांना इतर ५ टक्‍क्‍यांमुळे त्रास होणार असेल तर अशांवर अंकुश ठेवावा लागेल. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी घरात आणि घराबाहेरही काटेकोर राहावे लागेल.

राज्यात किंवा पुण्यात १ जूननंतर काहीतरी मोठा चमत्कार होईल, असे समजण्याचे मुळीच कारण नाही. ‘लॉकडाउन पाच’ की आणखी सहा, सात हे आकडे मोजण्यातही आता अर्थ नाही. टप्प्याटप्प्याने खुलेपण येईल, त्याचा अधिक सावधानतेने जीवन पूर्ववत करण्यासाठी कसा वापर करता येईल, हेच आता आपल्या हातात आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पुण्यात म्हटलं तर परिस्थिती सुधारतेय, म्हटलं तर नाही; पण परिस्थिती हाताबाहेर गेली नाही हे नक्की. आता या परिस्थितीला चांगल्या अवस्थेत नेण्यासाठी पुन्हा एकदा सामुदायिक आरोग्यभान आणि एकमेकांना व्यवसाय, उद्योग, कौटुंबिक गरजांमध्ये मदतीचा हात देण्याची आवश्‍यकता निश्‍चित असेल.

पुणेकरांनो लॉकाडाउन वाढला; पण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन शक्य आहे!

पुण्यात ३० जूनपर्यंत २२ हजार ९४० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यातील ॲक्‍टिव्ह रुग्णांची संख्या ९ हजार ७४३ असेल आणि त्यासाठी सुमारे २१६ आयसीयू बेड आणि १०७ व्हेंटिलेटर कमी पडतील, अशी शक्‍यताही वर्तविली आहे. हे आकडे यासाठी की पुढच्या काळात आपली आरोग्य सज्जता वाढवावी लागेल. पुण्यात एका बाजूला जनता वसाहतीचे उदाहरण आहे. येथे एकही रुग्ण नसताना तेथील संख्या झपाट्याने वाढली. दुसरीकडे पाटील इस्टेट झोपडपट्टीत तब्बल १७२ रुग्ण असतानाही तेथे योग्य ती काळजी घेतली गेल्याने गेल्या आठवडाभरात एकही नवा रुग्ण आढळला नाही. झोपडपट्टीसारख्या दाट वस्तीतही कोरोनाला रोखता येते, याची उदाहरणे बरीच आहेत. या सर्वांचा गाभा सार्वजनिक स्वच्छता हाच आहे. त्यामुळे लॉकडाउनचे काय व्हायचे ते होईल, नव्या सवयींना आणि प्रशासनाच्या पातळीवर नव्या योजनांच्या अंमलबजावणीला सुरुवात करावी लागेल. तरच कोरोनाचे युद्ध आपण जिंकू.