दागदागिने; मॅचिंग मास्क, सॅनिटायझर राहू द्या

दागदागिने; मॅचिंग मास्क, सॅनिटायझर राहू द्या

कोरोनामुळं जगरहाटीतील सगळंच बदललंय. लग्नाची बैठक तरी त्याला कशी अपवाद असेल. सरकारी नियमामुळे अवघ्या पाच जणांतच अशीच एक बैठक सुरू आहे. ‘पाचामुखी ठरवू लग्न’ असेच त्याचे स्वरूप आहे. वधु-वरांचे आई- वडील व मुलीचे मामा एवढेच उपस्थित आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा                           

वरपिता : तुम्हाला लग्न दोन्ही अंगाने करून द्यावे लागेल. 
वधूची आई : एका व्यक्तीला एकच अंग असताना. मग दुसरं कुठून आणायचं. 
वधूपिता : ‘अगं, दोन्ही अंगानं म्हणजे दोन्ही कडचा खर्च करायला लागंल, असे पाहुणे म्हणतात. 
वधुची आई : का? आमच्या मुलीला कोरोना झालाय का? आणि झाला असला तरी घाबरायचं काम नाही. सगळं व्यवस्थित होतंय. 
मुलीचे मामा : शिवाय आमची मुलगी कोरोनाचे सगळे नियम पाळते. सॅनिटायझरची बाटली पर्समध्ये ठेवते. मास्क वापरला नाही म्हणून चारवेळा पाचशे-पाचशे रुपयांचा दंड नवऱ्या मुलाने भरला आहे.
वधुची आई : आमची ऐपत आहे दंड भरायची. तुमची नसेल म्हणून तुम्ही नियम पाळताय. 
वधुपिता : तुम्ही आधी मास्क नीट लावा. नंतर तुमच्या मागण्या काय आहेत? ते सांगा. एकमेकांची उणी-धुणी काढायला आपण राजकीय आखाड्यात बसलोय का?  
वरपिता : आता कसं बोललात? आमच्या मुलाला आम्ही इंजिनिअर केलंय. त्यासाठी खूप खर्च केलाय. त्यामुळे त्याचं लग्नही दिमाखदार झालं पाहिजे. पावण्या-रावळ्यांनी तोंडात बोटं घातली पाहिजेत, सगळा डामडौल पाहून. 
वधुची आई : तुमच्या अपेक्षा तरी सांगा. 
वरपिता :  नवऱ्या मुलासाठी ‘एन -९५’ मास्क आणि पीपीई कीट द्यावे लागेल. शिवाय ब्रॅंडेड कंपनीचा महागडा सॅनिटायझरही द्यावा लागेल आणि मुलाच्या आईसाठी पैठणीचा मास्क लागेल. तिथे कसलीही तडजोड चालणार नाही. 
वराची आई : आणि वऱ्हाडी मंडळींसाठी खादीचे मास्क लागतील. तिथे आम्हाला कमीपणा आणू नका. वाटल्यास मुलीच्या अंगावर सोनं नाही घातलं तरी चालेल; पण मास्कमध्ये कसली हयगय नको. 
वधुपिता : ठीक आहे. वऱ्हाडासाठी टावेल-टोपीसारखे ‘देण्या- घेण्याचे’ मास्क आणणार नाही. त्यांना ते वापरता येतील, असेच आणू. 
वरपिता : दुसरं महत्त्वाचं म्हणजे मुलाच्या आजीसाठी वेलबुट्टीचे मास्क आणा. नाहीतर रुसून बसेल. मागील लग्नात आमच्या म्हातारीला वेलबुट्टीची साडी घेतली नाही म्हणून सगळ्यांशी तिने ‘कट्टी’ घेतली होती. तिच्या या कट्टी-बट्टीच्या नादात लग्नाला तासभर उशीर झाला. त्यामुळे वेलबुट्टीला विसरू नका. आता गावाकडील लग्नात वेलबुट्टीची साडी कोठून आणणार? मग नवरी मुलीची नणंद फारच हुशार हो! 
वधुपिता : नवरी मुलीची नणंद म्हणजे? 
वरपिता : माझी मुलगी हो. तिला एक आयडिया सुचली. तिने एका साडीवर पेनाने वेलबुट्टीची नक्षी काढली व त्यावर ‘वेलबुट्टी’ असे लिहले. तेव्हा कोठे म्हातारीचा रुसवा पळाला. ‘आजी, वेलबुट्टीची साडी छान आहे हो’  असं आम्हीच वऱ्हाडातील काही जणांना म्हणायला सांगितले होते. तेव्हा कोठे म्हातारीची कळी खुलली. म्हणून म्हणतोय, तेवढा वेलबुट्टीचा मास्क आणा. 
वराची आई :  मंगल कार्यालयात पाच ठिकाणी पाच-पाच लिटरचे फूट प्रेस सॅंनिटायझर लावावे लागतील.  
वधुचे पिता : अजून काय हवंय का? 
वराची आई : फार काही नको. फक्त नवऱ्या मुलीच्या नणंदेला मॅचिंग मास्क घ्या म्हणजे झालं. लग्नाआधी चार-पाच दिवस ती तिचे कपडे तुमच्याकडे पाठवून देईल. त्यावरून मास्कचं बघा. 
वधुपिता : जेवणासाठी कोणते पदार्थ ठेवायचे? 
वरपिता : कोणतेही ठेवा. फक्त जेवताना एका माणसानंतर चार खुर्चा रिकाम्या ठेवा. सोशल डिस्टन्सिंग पाळलं पाहिजं. 
मामा : हुंडा-दागिने इतर मान पानाचं काय? 
वरपिता : तसलं काही नको. फक्त मास्क आणि सॅनिटायझरमुळे पावण्या-रावळ्यात आम्हाला मान खाली घालायला लावू नका आणि हो दुसरं महत्त्वाचं म्हणजे आमच्याकडील कोणी मास्क घातला नाही म्हणून पोलिसांनी पाचशे रुपये दंड ठोठवला तर तेवढा दंड तुम्ही भरा. 
मामा : तुमच्या सगळ्या अटी मान्य; पण ही दंडाची मागणी अमान्य. कोरोनाच्या काळात लोकांना स्वयंशिस्त हवीच. दुसरा कोणी दंड भरणार असेल, तर त्याची झळ त्यांना बसणार नाही. त्यामुळे ते पुन्हा नियम मोडायला तयार होतील म्हणून ही अट नकोच. 
वरपिता : चालेल. मग फोडायची का सुपारी. (सर्व जण एका सुरात - चालेल, फोडा)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com