खटक्यावर खटका; त्यावर झटका!

Panchnama
Panchnama

वीज कंपनीच्या रांगेत उभे राहून दिनूभाऊ वैतागून गेले होते. बरं त्यांचा नंबर आला तर लंचसाठी काउंटर तरी बंद व्हायचा नाहीतर बिल भरायची वेळ तरी संपलेली असायची. पहिल्याच दिवशी ते रांगेत उभे न राहता सरळ पुढे जाऊ लागले तर ‘अहो रांगेत या... रांगेत. आमचा वेळ जात नाही म्हणून आम्ही रांगेत उभे नाही आणि खुशाल तुम्ही वीज कंपनीचे जावई असल्यागत पुढे चाललाय.’ असे म्हणून एका साठीच्या गृहस्थाने त्यांना हटकले. ‘‘अहो, मला वीजबिल भरायचे नाही. फक्त... ’ 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘येथे कोणालाच बिल भरायचे नाही. ही एवढी वाढीव बिले कशाची, याचा जाब विचारायचा आहे.’’ रांगेतील एकाने म्हटले. तरीही दिनूभाऊ पुढे जाऊ लागले. ‘जावई... जावई.. मागे फिरा.’ असे एक-दोघांनी म्हटल्यावर ते माघारी आले व रांगेत उभे राहिले. त्यानंतर पुढील दोन तास ते रांगेत होते. प्रत्येकजण हातातील बिल घेऊन समोरच्या कर्मचाऱ्यासमोर नाचवत होता. ‘घर विकून तुमचं बिल भरू का? एवढं बिल येतंच कसं’? 

‘लॉकडाउनमुळे सरासरी बिले दिली आहेत. थकबाकी वाढली आहे. युनिटप्रमाणे बरोबर बिल आहे,’ हे वाक्‍य टेप केल्यासारखं प्रत्येक ग्राहकाला तो ऐकवत होता. दोन तासांनी दिनूभाऊचा नंबर आला. तेव्हा लंच ब्रेकची पाटी लागली. त्यामुळे ते वैतागून गेले. भूक लागल्याने त्यांनी घरी परतायचा निर्णय घेतला. दोन दिवसांनी एकदाचा त्यांचा नंबर आला. ‘मला ऐंशी हजार बिल आले आहे.’ दिनुभाऊंनी तक्रार नोंदवली. 

‘आधी बिल भरा. नंतर बोला.’ कर्मचाऱ्याने उत्तर दिले. 
‘वाढीव बिलाप्रमाणेच तुम्ही वाढीव बोलू नका. मला बिल येतंच कसं’?
‘बिल येतंच कसं म्हणजे? तुम्ही काय वीजमंडळाचे जावई आहात का’? कर्मचाऱ्याच्या या वाक्‍यावर रांगेत हशा पिकला. 
त्यामुळे दिनुभाऊंच्या रागाचा पारा चढला. रागाने ते रांगेतून बाहेर पडून एका अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये घुसले.
‘ग्राहकांचा अपमान करण्यासाठी तुम्ही कर्मचारी नेमलेत का?’ असे म्हणून घडलेला प्रकार सांगितला.

‘तुम्ही आधी बिल भरा. कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठीही आमच्याकडे पैसे नाहीत.’ अधिकाऱ्याने खुलासा केला. 
‘माझ्या एकट्याच्या बिलातून तुम्ही कर्मचाऱ्यांचे पगार करणार आहात का?’ दिनूभाऊंनी संताप व्यक्त केला. 
‘तुम्हाला बिलाची रक्कम मोठी वाटत असेल तर तुम्ही तीन हप्त्यात भरा.’
‘जिकडे जाईल तिकडे ‘हप्त्यां’शिवाय बोलणे नाही. सर्वसामान्यांनी जगायचे कसे’? दिनुभाऊंनी वैतागून म्हटले. 

‘तुम्ही बिल भरून टाका. बिल कमी होणार नाही. माफ तर मुळीच होणार नाही.’ अधिकाऱ्याने ठामपणे सांगितले.
‘पण मी बिल का भरू? माझ्या नवीन घरी वीजजोड हवाय म्हणून मी गेल्या सहा महिन्यांपासून खेटे मारतोय. अजून घरात वीजही आली नाही, तरीही  बिल मात्र आलंय.’
‘काय सांगता? अधिकाऱ्याला आश्‍चर्याचा धक्का बसला. त्यातून सावरत ते म्हणाले, ‘‘पण तरीही तुम्ही आधी ऐंशी हजार रुपये भरा. तासाभरात वीजजोड देतो की नाही बघा.’

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com