हेचि ‘फळ’ काय मम तपाला...

Panchnama
Panchnama

कोणाच्या मदतीला धावून जाण्याचा आम्हाला फार कंटाळा आहे. एकूणच ‘धावणे’ या प्रक्रियेपुढे आमचं काही ‘चालत’ नाही. त्यामुळे कितीही पोट सुटलं तरी ‘चालेल’ पण ‘धावणार’ नाही, अशी प्रतिज्ञा बायको समोर नसताना अनेकदा केली. मात्र, तरीही सदाभाऊंच्या मदतीला आम्ही धावून गेलो, ते फक्त काही सीताफळे आपल्याला फुकट मिळतील, या आशेने. शेवटी फुकटचा मोह कोणाला टळला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

बालाजीनगरमधील स्वस्तिक सोसायटीत ही सीताफळे पोचवायची होती. माझ्यासमोरच सदुभाऊ खोक्‍यात सीताफळे भरत होते. पण चवीसाठी त्यांनी एकही सीताफळ आमच्यापुढे केले नाही. कदाचित स्वतंत्ररीत्या पाच-सहा सीताफळे देणार असतील, असा आम्ही समज करून घेतला, पण शेवटपर्यंत ती मिळाली नाहीत.

‘सीताफळ फार महाग आहेत हो. जपून न्या’ याचे पालुपद मात्र चालू होते. सासवडला बहिणीला भेटायला गेल्यानंतर त्यांच्या गावातील सदूभाऊ सहज म्हणून घरी आले होते. त्यावेळी त्यांनी ही जबाबदारी सोपवली. ‘स्वस्तिक सोसायटीत रिक्षा जाते ना’ किमान रिक्षाचं भाडं मिळावं म्हणून आम्ही म्हटलं. ‘जाते म्हणजे काय? बालाजीनगरला दत्ता जगदाळे यांच्या घरी जायचं आहे, असे नुसतं म्हणा. दहा रिक्षावाले एका ‘चाका’वर तयार होतील. इतका माझा भाऊ फेमस आहे.’ 

दहा किलोच्या सीताफळाचा बॉक्‍स डोक्‍यावर घेऊन आम्ही एसटी बसस्थानक गाठले व त्यानंतर धनकवडीला घरी आलो. बॉक्‍स वाहून खांदे व पाठ दुखत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही रिक्षात बॉक्‍स घेऊन बालाजीनगला निघालो पण स्वस्तिक सोसायटीच सापडेना.

दाटी- वाटीची वस्ती, अरुंद गल्ल्या यामुळे पत्ता शोधताना खूप अडचणी आल्या. रिक्षावालाही वैतागून गेला. ‘समोरची दिसतेय ना तीच स्वस्तिक सोसायटी’ असे सांगून त्याने आम्हाला उतरवले व शंभर रूपये घेऊन गेला. आम्ही बॉक्‍स घेऊन त्या सोसायटीत गेलो तर ती दुसरीच सोसायटी निघाली. मग आम्ही सीताफळांचा बॉक्‍स डोक्‍यावर ठेवून ‘आहे का स्वस्तिक सोसायटी’? असं एखाद्या फेरीवाल्यासारखं ओरडू लागलो. अर्ध्या तासानंतर ही सोसायटी आम्हाला सापडली. लिफ्ट वगैरे काही नव्हती. त्यामुळे जिने चढून जाऊ लागलो. दुसऱ्या मजल्यावरील एका घरात आम्ही चौकशी केली. त्यावेळी त्या गृहस्थाने संताप व्यक्त करीत, ‘ दत्ता जगदाळे म्हणजे स्वार्थी आणि अप्पलपोटी माणूस. पाचव्या मजल्यावर राहतात.’ असे म्हणून धाडकन दरवाजा बंद केला. त्यानुसार आम्ही गेलो तर मुलीने दरवाजा उघडला.

‘सीताफळे आणलीत.’ असे म्हटल्यावर ‘नकोत आम्हाला,’ असे म्हणून दरवाजा आपटला. पुन्हा दरवाजा वाजवल्यानंतर मुलाने उघडला. त्याला सगळं सांगितल्यावर आम्हाला घरात घेतलं. दत्ता जगदाळेंसह घरातील व्यक्तींचे जेवण चाललं होतं. आम्ही अंग चोरून तिथंच उभे राहिलो. अर्ध्या तासाने जगदाळे हात पुसत बाहेर आले. ‘जेवणाची वेळ असल्याने चहा विचारत नाही. पण पुढच्यावेळी जेवल्याशिवाय सोडणार नाही’ असे म्हणून बॉक्‍स घेतला. घशाला कोरड पडली होती पण पाणी मागण्याचा धीर आम्हाला झाला नाही. तसेच घरी आलो. तासाभरानंतर जगदाळे ओरडतच घरी आले.

‘सगळ्या सीताफळांचा चिखल केलाय. तुमच्या धुसमुसळेपणाची शिक्षा आम्हाला का. एक हजार रुपये नुकसानभरपाई द्या. नाहीतर पोलिसांत जाईल.’ अशी धमकी दिली. मुकाट्याने हजार रुपये त्यांच्या हातावर टेकवले. मात्र, त्यांच्या शेजाऱ्याचे ‘दत्ता जगदाळे म्हणजे स्वार्थी आणि अप्पलपोटी माणूस’ हे वाक्‍य आम्हाला पटलं.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com