आमच्याशी कसेही वागा; दाखवून देऊ तुमची जागा!

Panchnama
Panchnama

‘नानासाहेब आज निवृत्त होणार,’ या दिलासादायक बातमीने अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. आरोग्य विभागातील तक्रार निवारण कक्षात नानासाहेब नोकरीला होते. सहकारी व नागरिकांशी हुज्जत घालणे व कमीतकमी शब्दांत दुसऱ्यांचा अपमान करणे, हे त्यांचे अतिशय आवडते काम. गेली अनेक वर्षे हे काम ते इमाने- इतबारे करीत आले आहेत. त्यामुळे नानासाहेब निवृत्त होणार, याचा सगळ्यांनाच आनंद झाला होता. त्यामुळे त्यांचा निरोपसमारंभही थाटात करायचा, हे सहकाऱ्यांनी ठरवले. त्यासाठी वर्गणीही शंभर रुपये काढली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काहींनी आनंदाच्या भरात पाचशे रुपये देऊन टाकले. कार्यक्रमावेळी हॉलमध्ये सर्वांत आधी नानासाहेब जाऊन बसले पण अनेकजण उशिरा आले. त्यामुळे कार्यक्रमाला उशिरा सुरवात झाली. त्यामुळे ते वैतागून गेले.‘‘आम्ही काय आता रिकामटेकडे. तुम्ही कामाच्या ओझ्याने दबून गेलेले. साहेबांच्या कार्यक्रमाला तासभर आधी येताल व पुढेपुढे कराल. आमच्या कार्यक्रमाला वेळेतही येणार नाही. तुमचेही बरोबर म्हणा ! साहेब पगारवाढ देऊ शकतो.

मी काय देणार? त्यातून मी तर निवृत्त होणारा. कोण कशाला फिकीर करतंय,’’ असं म्हणून त्यांनी उशिरा येणाऱ्यांची बिनपाण्याने केली. भाषण करताना ध्वनिक्षेपक ‘फुर्रर्र फुर्र’ करू लागला. यावर नानासाहेब चांगलेच उखडले. ‘हल्ली गल्ली बोळातही अत्याधुनिक ध्वनियंत्रणा असते. मात्र, आमच्या कार्यक्रमात ‘फुर्रर्र फुर्र’ करणारा ध्वनिक्षेपक चालू आहे. आम्ही काय येथे ‘फुर्रर्र..फुर्र..’ करून चहा प्यायला आलोय का? कुठं कुठं पैसे वाचवताल.’

मेनूवरही त्यांनी आक्षेप घेतला. ‘वेफर्स, गुलाबजामून आणि बटाटेवडा हा काय निरोप समारंभाचा मेनू असतो का? माझे वय साठ आहे. त्यात डायबेटिस व ब्लडप्रेशर आहे. त्यामुळे गोड व तेलकट पदार्थ मी काही खाणार नाही, याची तुम्हाला कल्पना असेलच? पण सत्कारमूर्तीलाच उपाशी ठेवायचं, हा तुमचा डाव मी ओळखून आहे.’’ त्यानंतर नानासाहेबांनी शाल व श्रीफळाकडे आपला मोर्चा वळविला. थोडा फार खर्च केला असता तर चांगली शाल घेता आली असती. पण चार- पाच वर्षांपासून स्टोअरमध्ये पडून असलेली शाल देऊन काय साधलंत? नारळात पाणी आहे का नाही, हे तरी पहायचं.? द्यायचं म्हणून देण्यात काय अर्थ आहे.’’ असे म्हणून संयोजकांकडे रागाने कटाक्ष टाकला. 

आता तुम्ही प्रेझेंट म्हणून डिनर सेट दिला आहे. त्याची काय गरज होती का? आम्ही घरी काय पत्रावळीवर जेवतो का? थोडे- फार जास्त पैसे काढून एखादे सोन्याचा गणपती देता आला नसता? पण सत्कारमूर्तीला जास्तीत जास्त त्रास देणे व त्याला कोणतीही गोष्ट उपयोगी पडणार नाही, हे पाहणे, हेच तुमचे काम दिसतंय. तुमच्या या कृत्याचा मी निषेध करतो.’’ असे म्हणून त्यांनी कर्मचाऱ्यांकडे पाहिले.

‘तुमच्या मनात आले असेल, यांच्याशी आता कसंही वागा, कसाही अपमान करा, काहीही फरक पडत नाही. मात्र, एक गोष्ट लक्षात ठेवा. सरकारने मला नोकरीत दोन वर्षांची वाढ दिली आहे. तीसुद्धा प्रमोशनवर. मी या सेक्‍शनचा आता प्रमुख असणार आहे.’ असे म्हणून हातातील ऑर्डर त्यांनी फडकवून दाखवली. ते ऐकून कर्मचाऱ्यांच्या पायाखालची वाळूच सरकली.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com