झटका रे झटका; कारभार ह्यो लटका!

Panchnama
Panchnama

मा. मुख्य अभियंता, 
सप्रेम नमस्कार, 
तुम्ही दिलेल्या वीजबिलामुळे आमच्या मुलाचे लग्न ठरले, तसेच समाजातही पत वाढली. त्यामुळे खास आभाराचे पत्र तुम्हाला पाठवत आहे.

आम्हाला नुकतेच नव्वद हजार रुपयांचे वीजबिल प्राप्त झाले. यापूर्वी सरासरी पाचशे रुपये आम्हाला बिल यायचे. त्यामुळे हे बिल पाहून आम्हाला ‘शॉक’ बसला. योगायोगाने त्याच दिवशी आमच्या मुलाला मुलगी पाहण्यासाठी सांगलीला जायचे होते. तसे आम्ही गेलोही. बैठकीत मुलीकडच्यांनी पुण्यात घर केवढे आहे, असे विचारले. त्या वेळी आमच्यासोबत आलेल्या केशवभाऊंनी ‘घर केवढे आहे म्हणून काय विचारता, महिन्याला नव्वद हजार रुपये नुसते वीजबिलच भरत्यात. यावरून अंदाज करा,’ असे म्हणून त्यांच्यासमोर बिल ठेवले. मुलीच्या वडिलांनी ते हातात घेऊन नव्वद हजारांच्या आकड्याची खात्री केली. त्यानंतर त्यांचा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. बरीच मोठी असामी आहे, असे म्हणून आमच्याशी ते फार आदराने वागू लागले व त्याच बैठकीत आम्ही मुलाचे लग्न ठरवून मोकळेही झालो. गेल्या तीन वर्षांपासून आम्ही मुलासाठी स्थळे पाहतोय. पन्नास-साठ मुलींनी नकार कळवला. मात्र, आज एकाच बैठकीत मुलाचे लग्न ठरले, याचे सारे श्रेय तुम्हालाच जाते. त्यामुळे मुलाच्या लग्नाची पत्रिकाही लवकरच घेऊन येणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पूर्वी आम्ही विविध अर्ज भरताना निवासाचा पुरावा म्हणून वीजबिल जोडत होतो. आता मात्र आम्ही किती श्रीमंत आहोत, हे दाखवण्यासाठी वीजबिल जोडत आहोत, ही सारी आपलीच कृपा. गेल्या तीन-चार महिन्यांपासून एक बॅंक आम्हाला वीस लाखांचे कर्ज द्यायला चाल-ढकल करीत होती. सगळी कागदपत्रे असूनही खेटे मारायला लावत होती. कर्ज फेडण्याची तुमची ऐपत नाही, असे सुचवत होती. मग आम्ही बॅंकेच्या मॅंनेजरला भेटलो. तोही खूप आढेवेढे घ्यायला लागला. मग काय त्याला वीजबिल दाखवले. समोरची व्यक्ती महिन्याला नव्वद हजार रुपये केवळ बिलच भरतेय, हे पाहून मॅनेजरच्या मनात आमच्याविषयी आदर जाणवला. त्याने ताबडतोब आमच्यासाठी चहा व नाश्‍ता मागवला व तिथल्या तिथे आमचे कर्ज मंजूर केले. येताना आम्ही केवळ वीजबिल घेऊन आलो होतो, जाताना वीस लाखांचा चेक घेऊन गेलो. तीन-चार महिने खेटा मारूनही आमचे कर्ज मंजूर होत नव्हते. मात्र तुम्ही दिलेल्या बिलामुळे एका झटक्‍यात ते मंजूर झाले.

हे वीजबिल आम्ही सहज फेसबुकवर टाकले. त्यावेळी दोन हजार लाइक व दीड हजार कमेंट मिळाल्या. पूर्वी आमच्या पोस्टवर फार फार तीन-चार लाइक व दोन-तीन कमेंट मिळायच्या; पण वीजबिलाच्या पोस्टमुळे चित्रच बदलले. बंगला आहे की फॉर्महाउस, कोठे आहे, किती स्क्वेअर फुटांचा आहे, असे प्रश्‍न अनेकांनी आदरपूर्वक विचारले. आता आम्ही ‘आज फार उकडतंय’ किंवा ‘दुपारची वामकुक्षी छान झाली’ अशा किरकोळ पोस्ट टाकल्या तरी दीड-दोन हजार कमेंटस व तितक्‍याच लाइक्‍स मिळतात. सोशल मीडियावर मला जी प्रतिष्ठा मिळाली आहे, ती सारी कृपा आपलीच आहे, हे मी नम्रपणे सांगू इच्छितो. 

ता. क. - वीजबिल आम्हाला भरायचे आहे. मात्र, अनेक जण वीजबिल माफ होणार आहे, असे सांगत असल्याने थांबलो होतो; पण आता ती धूळफेक होती, हे लक्षात आल्याने बिल भरायचे ठरवलंय. त्यासाठी बॅंकेत कर्जप्रकरण करतोय. ते मंजूर झाल्यावर लगेच बिल भरतो.
कळावे, 
आपला विश्‍वासू 
दिनूभाऊ पुणेकर

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com