पुणेरी दसरा... सपशेल स्पेश्‍शल!

Panchnama
Panchnama

चिंगे, अगं लवकर ऊठ. आज विजयादशमी आहे ना! पुस्तके-पाटीपूजन नको का करायला? काय म्हणतेस वह्या, पाटी-पुस्तके सात महिन्यांपासून माळ्यावर टाकली आहेत आणि पुस्तकांऐवजी मोबाईलची पूजा करणार आहेस, का तर त्याच्यावर ऑनलाइन क्‍लास चालतात म्हणून.    

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अगं फक्त कूस काय बदलतेस. विचार बदल. तरंच आयुष्य घडंल. होळीपासून दिवाळीपर्यंत शाळेला ‘कोरोना’ची सुटी मिळाल्याने तू अगदी सुस्तावली आहेस. आमच्या लहानपणी एवढी सुटी आम्हाला कधीच मिळाली नव्हती. काय? दरवर्षी उन्हाळा, दिवाळीबरोबरच कोरोनाचीही सुटी मिळायला पाहिजे, अशी मागणी करतेस, हे अती होतंय. आळशीपणाचं हे लक्षण आहे.   

चिंगे, सकाळच्या थंडीत सगळी कामे उरकून घे. दुपारी कडक ऊन पडायच्या आत आपल्याला बाहेर खरेदीला जायचंय आणि सायंकाळचा पाऊस येईपर्यंत घरी परतायचंय. शिवाय रात्री रावण दहनालाही जायचंय. या पावसामुळे रावणाचं दहन करायचं का त्याला बुडवून मारायचं, हेच कळेनासं झालंय. बाकी ‘ये रे पावसा’ या बालगीताऐवजी ‘रेन रेन  गो अवे’ हेच गीत मुलांना आता म्हणायला लावायची वेळ आली आहे. पण ‘गो कोरोना गो’ म्हणून कोरोना जात नाही आणि ‘रेन रेन गो अवे’ म्हणून पाऊसही पडायचा थांबत नाही. आपण घंटी आणि थाळ्या वाजवत बसावं, हेच खरं.   

चिंगे, काय म्हणालीस आमच्या लहानपणी एकच ऋतू चांगला चार महिने चालायचा. आता पुण्यात एकाच दिवसात सकाळी हिवाळा, दुपारी उन्हाळा आणि रात्री पावसाळा अनुभवायला मिळतोय. काळ बदलतोय. पण इतका? आता मात्र तुझी हद्द झाली. चौथीत शिकतेस आणि ‘पूर्वीचं पुणं आता राहिलं नाही’ असंही वर म्हणतेस.  

अगं चिंगे, पुण्यात अजून बर्फ पडत नाही, हे काही कमी आहे का? काय म्हणतेस, तो पडला तर कसा मोजायचा? अगं पुण्याची मोजमापाची परिमाणं वेगळीच असतात. भिडे पूल पाण्याखाली गेल्याशिवाय पुण्यात पूर आलाय, हे कोणी मान्य करीत नाही. तसेच संपूर्ण लक्ष्मी रोड बर्फाच्छित झाल्याशिवाय पुण्यात बर्फवृष्टी झाली, हे मान्य  होणार नाही. भिडे पूल पुराचं तर लक्ष्मी रोड बर्फ मोजण्याचं परिमाण होईल बघ. भिडे पूल पाण्याखाली गेला आहे, हे पाहण्यासाठी झेड ब्रीजवर गर्दी होते ना. तसं पुण्यातील बर्फ पाहण्यासाठी टिळक चौकात तुडुंब गर्दी होईल. बरं ते जाऊ दे. आज आपल्याला सोसायटीत सीमोल्लंघन करायचं आहे बरं! बरेच महिने घरात बसून तू वैतागली आहेस. त्यामुळे सोसायटीच्या गेटबाहेर जाऊन दसऱ्याचं सोनं लुटू; पण त्यासाठी ‘बेरजेचं पॅकेज’ (SUM) सोबत असू दे. चिंगे, माझ्याकडं अशी वेड्यासारखी काय बघतेस? ‘बेरजेचं पॅकेज’ (SUM) म्हणजे सॅनिटायझर, अंब्रेला (छत्री) आणि मास्क. कोरोना आणि ऊन-पावसापासून वाचण्यासाठी आपल्याला हे सतत जवळ ठेवलं पाहिजे. चल लवकर ऊठ. नाहीतर हिवाळा संपून उन्हाळा लागायचा.   

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com