दातृत्वाची परिसीमा

Anantrao-Sane
Anantrao-Sane

बाह्या दुमडलेला स्वच्छ पांढरा शर्ट, किंचितशा सैल पँटमध्ये शर्ट खोवलेला, हळुवारपणे बोलणे, दोन-चार वाक्‍यांनंतर चेहऱ्यावर मंद स्मित करीत खिशातून काजू किंवा बदाम हातांवर ठेवीत एखाद्या सामाजिक घटनेचा उल्लेख करणारे आणि आपण कशी मदत करूया, असा उच्चार करणारे साने डेअरीचे संचालक अनंतराव साने खऱ्या अर्थाने संवेदनशील, क्रियाशील सच्चे समाजसेवक, जिमखाना परिसराचे वैभव होते. त्‍यांचे निधन नुकतेच झाले. त्‍यांना आदरांजली.

अनंतरावांशी माझा परिचय झाला तब्बल ६५ वर्षापूर्वी साने डेअरीमुळे, एका सामान्य कष्टकरी कुटुंबात १९३४ मध्ये जन्मलेले,  अनंतरावांमध्ये प्रामाणिकपणा, हरहुन्नरीपणा, कष्टप्रद कामाचे दैनंदिन जीवन याचा वारसा मिळाला विष्णूपंत आणि लक्ष्मीबाई या मात्यापित्यांकडून. वडिलांनी गाई म्हशी पाळून दुधाचा व्यवसाय लक्ष्मी रोडवर सुरू केला. वडिलांचे स्नेही परांजपे यांची भांडारकर रस्त्यांवरील डेअरी काही कारणास्तव नीट चालत नव्हती. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दुर्दैवाने विष्णूपंतांचे अकाली निधन झाले आणि लक्ष्मीबाईंनी आपल्या मुलांसह भांडारकर रस्त्यांवरील डेअरीचा कारभार सांभाळण्याचे धाडस केले १९४४ मध्ये. दहा वर्षाचे बालक अनंत मातेसह डेअरीत काम करू लागले. डेअरीचा जम बसला आणि अनंतरावांना व्यायामाचा छंद जडला. उत्साही मित्रांसमवेत शाखेत जाऊन समाजसेवा व्यायाम याची ओळख झाल्यावर १९५० मध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, राजमाचीकर, भय्याजी जोशी यांनी हनुमान व्यायाम मंडळ स्थापन केले. 

ते १९५४मध्ये गोवा, दमण, दीव मुक्ती आंदोलनाने वातावरण भारीत झाले. ते सच्चे स्वातंत्र्यसैनिक होते. सरकारकडून मानधन घ्यायचे नाही या उच्चविचाराने त्यांनी कागदोपत्री कोणताही पुरावा स्वीकारला नाही. डेअरीचा जम बसल्यावर त्यांनी लक्ष्मी मोटर्स वर्कशॉप काढले. चारचाकींची सर्व प्रकारची दुरुस्ती त्यांनी आत्मसात केली. त्यांनी १९६० पासून डेअरीमध्ये संपूर्ण लक्ष घातले. पुण्याच्या परिसरांतील गावांमध्ये जाऊन गरजूंना मदत, मार्गदर्शन करून अनेक दूधवाल्यांशी संबंध प्रस्थापित केले. मोठ्या प्रमाणावर दूधसंकलन, पाश्‍चरायझेशन आदी आधुनिक तंत्रज्ञान कार्यरत केले. 

समाजातील कष्टकरी, गरजू आपादग्रस्त घटकांना सढळ हाताने आर्थिक साहाय्य करण्याचा त्यांचा कल कधीच उमगला नाही. त्यांना प्रसिद्धीची हाव कधीच नव्हती. हनुमान व्यायाम मंडळ, विनायक नवयुग मित्र मंडळ, अनंत चर्तुदशीच्या भव्य मिरवणुकीत पोलिसांना हजारो पिशव्या दूध, ‘सकाळ’च्या माध्यमांतून पूरग्रस्त, आपत्तीग्रस्त, बॉम्बस्फोटग्रस्तांना निधी देणे, अनेक शेतकरी तरुणांना देशी गाईचे गोठे उभारून देणे योगविद्या संस्था, वसूबारसेचा भव्य गोमाता पूजन इत्यादी माध्यमातून त्यांनी लक्षावधी रुपयांचे दान केले.

प्रामाणिक शारीरिक श्रमांचे कौतुक आणि दातृत्व यांचा मला न विसरता येणारा अनुभव आला. गिरीप्रेमीच्या एव्हरेस्ट नागरी मोहिमेच्या वेळी २०१२ मध्ये. एव्हरेस्ट मोहिमेसाठी निधी संकलनासाठी मी अनेकांना भेटत होतो. अनंतरावांना त्या मोहिमेची माहिती दिली. निधीची अपेक्षा बोलून दाखविली. त्यांनी क्षणार्धात निक्षून सांगितले ‘एकही पैसा देणार नाही’  मी स्तब्ध झालो.

अपेक्षाभंग पचवता पचवता मी उठू लागलो. त्यांनी हाताला धरून खाली बसविले. त्यांच्या दैनंदिन खुराकासाठी रोज २० लिटर गाईचे दूध पुढच्या ६० दिवसांसाठी दिले. मिनिटाभरांत हिशोब करून १६०० लिटर्स टोकन्सची पिशवी माझ्या हातात ठेवली! १९ मे २०१२ रोजी गिरिप्रेमीच्या नऊ मावळ्यांनी एव्हरेस्ट सर करून विश्‍वविक्रम प्रस्थापित केल्याची बातमी झळकली. आपण त्या मावळयांना भेटायला बाकरवडया, पेढे घेऊन काठमांडूला जायचे अशी ऑर्डर दिली. आम्ही २६ मेला तेथे पोचलो. एव्हरेस्टवीरांना अनंतरावांनी दिलेले आलिंगन मी कधीच विसरू शकत नाही.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com