रसिकहो, रंगूया कलारंगी..!

Drama
Drama

संगीत, नाटक, सिनेमा, वाचन अशांतूनच माणसाची बौद्धिक भूक भागते. अशा कलासक्त रसिकांसाठी कोरोनाचा काळ अतिशय खडतर गेला असणार. सततच्या काळजीतून निर्माण झालेली नकारात्मकता दूर करण्यासाठी मनोरंजनाची ही माध्यमे उपयुक्त आहेत. हळूहळू ती पुन्हा रुळावर येताहेत. मात्र, ही ‘नांदी’ कायमस्वरूपी टिकण्यासाठी गरज आहे ती प्रेक्षकांच्या साथीची. हा सांस्कृतिक वारसा जतन करणे ही आपल्या प्रत्येकाची समाज म्हणून जबाबदारी आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

थंडीची चाहूल लागल्यावर पुण्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात धांदल सुरू होते. दिवाळीपाठोपाठ पुणेकरांना एकापेक्षा एक बहारदार सांस्कृतिक महोत्सवांची मेजवानी मिळते. यानिमित्त संगीत, गायन, नाटक, चित्रपट अशा विविध कलाक्षेत्रांतील दिग्गजांची प्रतिभा अनुभवण्याची संधी रसिकांना मिळते. देशभरातील कलाकार या संधीची वाटच पाहत असतात. जाणकार पुणेकर रसिकांच्या पसंतीची पावती हा त्यांच्यासाठी मोलाचा ठेवाच असतो. यंदा मात्र या साऱ्या हव्याहव्याशा वातावरणावर कोरोनाचे मळभ दाटले आहे. ‘दिवाळी पहाट’, डिसेंबरमध्ये होणारा ‘सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव’, पाठोपाठ होणारे अशाच प्रकारचे चार ते पाच महोत्सव, सिनेरसिकांचा आवडत्या ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’च्या (पिफ) आदी सांस्कृतिक संचितांकडे केवळ पुण्यातीलच नव्हे, तर राज्यातील रसिकांचे लक्ष लागलेले असते. यंदा कोरोनामुळे या सर्वच कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत संभ्रमावस्था आहे. शासनपातळीपासूनचा हा संभ्रम वेळीच दूर होण्याची गरज आहे.

मोठा पडदा आणि प्रतिसाद
‘अनलॉक’च्या प्रक्रियेत सरकारने सिनेमागृहे सुरू करण्यास परवानगी दिली, मात्र प्रेक्षकांच्या प्रतिसादाअभावी ती पुन्हा बंद करण्याची वेळ चालकांवर आली. लोकांच्या मनात कोरोनाची भीती अजूनही आहेच, मात्र गेल्या नऊ महिन्यांत सर्वसामान्यांच्या बदललेल्या सवयी हे महत्त्वाचे कारण ठरावे. लॉकडाउन व नंतरच्या काळात घरात बसून राहावे लागल्याने अनेकांची पावले ‘ओटीटी’कडे वळली. कमी खर्चात हवे ते मनोरंजन, हव्या त्या मालिका व चित्रपट मोबाईलवर सहज उपलब्ध झाले. तसेच, या काळात नवे चित्रपटही प्रदर्शित झाले नाहीत. या साऱ्याचा एकत्रित विपरीत परिणाम चित्रपट उद्योगावर झालेला दिसतो. ‘ओटीटी’ ही आत्ताची गरज आहे, मात्र प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याची आपली सवय मोडू न देता मोठ्या पडद्यावरील चांगले विषय व प्रयत्नांना आपला प्रतिसाद कायम ठेवण्याची गरज आहे.  

नाटक आणि सांस्कृतिक भूक
आता पुण्यात तब्बल नऊ महिन्यांनंतर व्यावसायिक नाटकांचा पडदा उघडला जात आहे. कोरोनामुळे नाटकांवर जणू संक्रांतच आली होती. शहरात नाट्य प्रयोगांची पुन्हा सुरवात झाली ती अलीकडेच झालेल्या ‘अँटीगनी’च्या प्रयोगाने. त्यानंतर ‘सावल्या’चा प्रयोग झाला, मात्र ही नाटके समांतर रंगभूमीवरील होती. ही नाटके नक्कीच महत्त्वाची आहेत, मात्र त्यांवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी आहे. व्यावसायिक रंगभूमीवरील अनेक कलाकार व पडद्यामागील कलावंतांपुढे कोरोनाने अडचणींचा डोंगरच उभा केला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा व्यावसायिक नाटके सुरू होणे सकारात्मक बाब आहे. नाटकांतील जिवंत पात्रे प्रेक्षकांना तृप्त करतात, जगण्यातील ‘जिवंत’अनुभव देऊन जातात. त्यामुळेच नाटक पाहण्याच्या आठवणी मनावर कायमच्या कोरल्या जातात. प्रेक्षकांची हीच गरज लक्षात घेऊन व्यावसायिक रंगभूमीवरील यशस्वी कलाकार प्रशांत दामले, भरत जाधव यांनी पुढाकार घेत पुढील आठवड्यापासून पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा ‘तिसरी घंटा’ वाजवण्याचा निर्णय प्रशासनाच्या मदतीने घेतला आहे. आता गरज आहे प्रेक्षकांची नाट्यगृहात जाऊन नाटक पाहण्याची, आपली जबाबदारी ओळखून, सर्व नियम पाळून महाराष्ट्राची नाटकांची परंपरा जिवंत ठेवण्यासाठी या कलाकारांना साथ देण्याची...

नाटक, सिनेमा ही ‘मनोरंजनाची कोठारे’ आता खुली होण्याची प्रक्रिया सुरू होते आहे. कोरोनामुळे शतकभरात प्रथमच मनोरंजनाची भूक भागविणे प्राधान्यक्रमात शेवटच्या क्रमांकावर गेले होते, आता ते पुन्हा सुरू होत असताना प्रेक्षक म्हणून आपली जबाबदारी मोठी आहे. मोठा सांस्कृतिक वारसा, परंपरा असलेल्या आपल्या राज्यातील कला व कलाकार जिवंत राहणे ही प्रागतिक समाज म्हणूनही आपली जबाबदारीच आहे. सर्व नियमांचे पालन करून, प्रशासनाला सहकार्य करून या कलांना प्रतिसाद दिल्यास या कला पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणेच बहरतील यात शंका नाही...

मनाला भिडणारे नाटक अनेक वर्षे मनात रेंगाळते. तो अनुभव काही ‘ओटीटी’ किंवा अन्य ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून मिळत नाही. सध्या नाटक सुरू होणे, त्याने विचार करायला लावणे, मनोरंजन करणे आवश्‍यक आहे. त्यातून ऊर्जा मिळते, साचलेले काही तरी बाहेर येते. नवीन काही तरी पाहिल्याचे समाधान मिळते. कलावंतांप्रमाणेच प्रेक्षकही नाटके पाहण्यास आसुसलेले आहेत. कदाचित लगेच गर्दी होणार नाही; पण कोठे तरी सुरुवात होतेय, हे आनंददायी आहे.
- सुबोध भावे, अभिनेता

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com