esakal | आनंद लुटा; पण नियम पाळा!
sakal

बोलून बातमी शोधा

New-Year

नववर्षाचे स्वागत हा दरवर्षी एखाद्या सणासारखा सोहळा असतो. ‘खाओ, पिओ, मजा करो’ हा त्या दिवशी तरुणाईचा मंत्र असतो. यंदा मात्र ‘कोरोना’ आणि त्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी लागू केलेल्या निर्बंधांमुळे या उत्साहाला आवर घालावा लागणार आहे. त्यामुळे सर्वांचा हिरमोड होणार असला, तरी ३१ डिसेंबरला रात्री पोलिसांशी वाद घालण्यापेक्षा त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचा समंजसपणा सर्वांनी दाखविला पाहिजे.

आनंद लुटा; पण नियम पाळा!

sakal_logo
By
रमेश डोईफोडे

नववर्षाचे स्वागत हा दरवर्षी एखाद्या सणासारखा सोहळा असतो. ‘खाओ, पिओ, मजा करो’ हा त्या दिवशी तरुणाईचा मंत्र असतो. यंदा मात्र ‘कोरोना’ आणि त्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी लागू केलेल्या निर्बंधांमुळे या उत्साहाला आवर घालावा लागणार आहे. त्यामुळे सर्वांचा हिरमोड होणार असला, तरी ३१ डिसेंबरला रात्री पोलिसांशी वाद घालण्यापेक्षा त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचा समंजसपणा सर्वांनी दाखविला पाहिजे.

जनुकीय बदल असलेला ‘कोरोना’चा नवा विषाणू ब्रिटनमध्ये आढळला आहे. त्याचा संसर्ग वेगाने होतो. त्यामुळे जगभरात पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याला रोखण्यासाठी लॉकडाउनसारखे उपाय युरोपात योजले जात आहेत. आपल्याकडे हा उपाय आजारापेक्षा भयंकर ठरला. त्याबद्दल विशिष्ट टप्प्यानंतर सार्वत्रिक रोष निर्माण झाला. सरकारला त्याची जाणीव असल्याने तूर्त टाळेबंदीची मात्रा लागू केली जाण्याची शक्‍यता नाही. मात्र नाताळ, नववर्षाचा संभाव्य जल्लोश आणि अन्य कार्यक्रमांच्या निमित्ताने सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी पुण्यात ५ जानेवारीपर्यंत रोज रात्री ११ ते सकाळी सहादरम्यान जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ‘थर्टी फर्स्ट’चा आनंद लुटा; पण तो दिलेल्या वेळेत आणि सर्व नियम पाळून, असा मध्यम तोडगा काढण्याचा प्रयत्न यात आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हॉटेलचालकांची निराशा
टाळेबंदीचा सर्वाधिक फटका ज्या उद्योग-व्यवसायांना बसला, त्यांत हॉटेल-रेस्टॉरंटचा समावेश आहे. या क्षेत्रातील अनेक व्यावसायिक अजूनही सावरलेले नाहीत. नववर्षाच्या पूर्वसंध्येला एरवी रेस्टॉरंट-बारमध्ये झुंबड उडते. अनेक ठिकाणी मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यासाठी भरभक्कम प्रवेशशुल्क आकारले जाते. या उलाढालीतून किमान वर्षअखेरीस तरी बरी कमाई होऊन आधीच्या नुकसानाची थोडी-फार भरपाई होईल, अशी आशा हॉटेलचालकांना होती; परंतु रात्रीच्या जमावबंदीमुळे त्यावर पाणी पडले आहे.

कोरेगाव भीमा येथे नागरिकांची होणार आरोग्य तपासणी 

शिस्तीला पर्याय नाही 
वस्तुतः अनेकांचे ‘सेलिब्रेशन’ ३१ डिसेंबरला रात्री दहा-अकरानंतरच सुरू होते. ते पहाटेपर्यंत चालते. त्याच्या तपशिलात जायला नको; पण वर्षानुवर्षांचे हे ‘वेळापत्रक’ अंगवळणी पडलेल्या उत्साही जनांना ‘११ च्या आत घरात’ हे बंधन रुचणारे नाही. त्यांच्या दृष्टीने दुधाची तहान ताकावर भागविण्याचा हा प्रकार आहे. तथापि, त्याला पर्याय नाही. लोकांना थोडी मुभा मिळाली, की दिलेल्या सवलतीपेक्षा अधिक स्वातंत्र्य घेतले जाते, नियमांना मुरड घातली जाते, असे अलीकडे वारंवार घडले आहे. गणेशोत्सव, दसरा-दिवाळीत, तसेच अगदी आळंदीच्या कार्तिकी वारीतही हा अनुभव आला आहे. सामाजिक जबाबदारीप्रतीची ही उदासीनता घातक ठरू शकते.

न्यायालयीन कामकाज पूर्णतः सुरू करण्याला तारीख पे तारीख

‘कोरोना’चे संकट नियंत्रणात आले असले, तरी आजही देशात सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे गेल्या १० महिन्यांतील खडतर परिस्थितीची पुनरावृत्ती नवीन वर्षांत होऊ द्यायची नसेल, तर सरत्या वर्षाला काटेकोर शिस्तीतच  निरोप दिला पाहिजे. २०२१ हे ‘हॅपी न्यू इयर’ ठरण्यासाठी ते अत्यंत आवश्‍यक आहे!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत काढले फोटो; दोन आरोपींना अटक 

ता. ३१ डिसेंबर
रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत जमावबंदी.
उपाहारगृहे रात्री ११ च्या आत बंद होणार. 
नववर्ष घरातच साजरे करण्याचे प्रशासनाचे नागरिकांना आवाहन.
बंदोबस्तासाठी पाच हजार पोलिस तैनात.

Edited By - Prashant Patil

loading image