Vidhan Sabha 2019 : भाजपच्या नाराजांवर काँग्रेसची कसब्यात भिस्त

मंगेश कोळपकर
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

खासदार गिरीश बापट हे कसब्यातून तब्बल 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. येथील बहुतांश नगरसेवक भाजचेच आहेत...

पुणे : महापौर मुक्ता टिळक यांची कसबा विधानसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही वेळातच काँग्रेसने अरविंद शिंदे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शहराध्यक्ष अजय शिंदे यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे येथील लढतीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. 

खासदार गिरीश बापट हे कसब्यातून तब्बल 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. येथील बहुतांश नगरसेवक भाजचेच आहेत. सुमारे 2 लाख90 हजार मतदार असलेल्या कसब्यात सर्वच प्रकारचे  मतदार आहेत. जुन्या पुण्याचे अस्तित्व येथे पावलोपावली दिसते.

होय, मी गुन्हा केलाय म्हणणारे खडसे संपले की संपविले?

टिळक आणि अरविंद शिंदे हे महापालिकेत तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. या मतदार संघातून भाजपचे हेमंत रासने, गणेश बिडकर, धीरज घाटे, महेश लडकत आदी 12 जण निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. पण टिळक यांनी बाजी मारली. काँग्रेसमध्ये शिंदे यांना रविंद्र धंगेकर, कमल व्यवहारे यांच्याशी सामना करावा लागला. धंगेकर यांनी 2014 मध्ये येथून निवडणूक लढविली होती. शिंदे यांचे नाव लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार म्हणून ही चर्चेत होते. त्याचा फायदा त्यांना विधानसभेच्या उमेदवारीसाठी झाला. 

भाेरमध्ये मुळशीचा बंडखोरी पॅटर्न

कसबा मतदारसंघ हा टिपिकल भाजप स्टाईल मतदारसंघ नाही. बहुजन मतदारांची संख्या येथे मोठी आहे. त्यांचे मतदान निर्णायक ठरते, हे या पूर्वी ही दिसून आले आहे. त्या मतदारांवर आणि भाजपमधील नाराज गटांवर शिंदे यांची भिस्त असेल. या मतदारसंघातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय आहे. संघाची यंत्रणा ही येथे आहे. तसेच बापट यांची येथे स्वतःची यंत्रणा ही आहे. टिळक यांना दगाफटका होणार नाही, या साठी त्यांचे लक्ष असेल. तसेच टिळक आमदार झाल्यावर त्यांच्या प्रभागात बापट यांच्या सूनबाई स्वरदा यांची वर्णी लागू शकते, असेही आडाखे येथे कार्यकर्ते बांधत आहेत. महापौर असल्यामुळे टिळक गेली अडीच वर्षे झोतात आहेत, त्याचाही त्यांना फायदा होऊ शकतो. शिंदे हे देखील तयारीचे गडी आहेत. त्यांचे पक्षातीत नेटवर्क आहे. या मतदारसंघात मनसेचे हक्काचे मतदार आहेत. त्यांच्या बळावर अजय शिंदे रिंगणात उतरले आहे. एक चांगला, अभ्यासू कार्यकर्ता अशी त्यांची प्रतिमा आहे. 

भाजपमधील गटबाजी, मतदारसंघातील जातीय समीकरणे येथे निर्णायक ठरतील, अशी सध्या चिन्हे आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article written by mangesh kolapkar on bjp and congress situation on kasba assembly constituency