सॅनिटायझर, मास्कचा कृत्रिम तुटवडा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 मार्च 2020

बाजारपेठेत माल उपलब्ध आहे, परंतु तो ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, दुकानांपर्यंत जाणे गरजेचे आहे. त्यासाठी मनुष्यबळ आवश्यक आहे.
- रमेश न्याती, वितरक

सॅनिटायझर, मास्क यांची गरज वाढती आहे, परंतु त्यांचा पुरवठा होण्यावर मर्यादा आलेल्या आहेत. त्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.
- डॉ. चंद्रशेखर कर्वे, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेडिकल फाउंडेशन

पुणे - औषध कंपन्यांकडे माल आहे, औषधे विकण्यासाठी दुकाने खुली आहेत, परंतु त्यांची वाहतूक करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे सॅनिटायझर, मास्क यांचा कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी औषध वितरण क्षेत्रातून होत आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाच्या संसर्गामुळे सध्या वाहतूक बंद आहे. त्याचा फटका औषध निर्मिती आणि औषध वितरण क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर बसत आहे. अनेक औषध कंपन्यांची गोदामे मुंबई परिसरात तसेच पुण्याबाहेर आहेत. तेथील गोदामामधून येणारा माल वितरक आणि दुकानांपर्यंत पोचवण्यासाठी ट्रक आणि टेम्पोची सध्या चणचण भासत आहे. त्याचप्रमाणे माल ठेवण्यासाठी आणि उतरविण्यासाठी मनुष्यबळाचीही कमतरता मोठ्या प्रमाणात भासत आहे. 

मोदींची जाहीर केलेल्या पीएम केअर्सला करू शकता मदत; वाचा कोणाची किती मदत

पोलिसांच्या भीतीमुळे मनुष्यबळ सध्या उपलब्ध होत नसल्याचे वितरकांचे म्हणणे आहे. या बाबतचे मनुष्यबळ सध्या घराबाहेर पडण्यास तयार नाही. त्यामुळे कंपन्यांकडे माल असूनही तो ग्राहकाकांपर्यंत पोचत नसल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.

अत्यावश्यक सेवा कायद्याअंतर्गत औषधांची वाहतूक होऊ शकते, परंतु माल ट्रकमध्ये भरणार कोण आणि ट्रकमधून उतरणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

याबाबत पुणे केमिस्ट असोसिएशनचे सचिव अनिल बेलकर म्हणाले, “ औषध निर्मिती, औषध वितरण आणि संबंधित मालाची वाहतूक करण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी संघटनेचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत प्रशासनाची संवाद साधला आहे.”


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Artificial breakdown of the sanitizer and mask