अंगठ्यात बसविला कृत्रिम कुर्च्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 जानेवारी 2019

पुणे : पायाच्या अंगठ्यात कृत्रिम कुर्च्या बसविण्याची देशातील पहिली शस्त्रक्रिया पुण्यात करण्यात आली. एका 52 वर्षीय पुरुषावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या रुग्णाला संधिवात होता, त्यामुळे डाव्या पायाच्या अंगठ्यात तीव्र वेदना होत होत्या. अंगठ्याची हालचाल करणेही अक्षरशः त्यांच्या जिवावर येत होते. अशा रुग्णावर ही पहिली शस्त्रक्रिया झाली. 

पुणे : पायाच्या अंगठ्यात कृत्रिम कुर्च्या बसविण्याची देशातील पहिली शस्त्रक्रिया पुण्यात करण्यात आली. एका 52 वर्षीय पुरुषावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या रुग्णाला संधिवात होता, त्यामुळे डाव्या पायाच्या अंगठ्यात तीव्र वेदना होत होत्या. अंगठ्याची हालचाल करणेही अक्षरशः त्यांच्या जिवावर येत होते. अशा रुग्णावर ही पहिली शस्त्रक्रिया झाली. 

हडपसरमधील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शनिवारी देशातील पहिली पायाच्या अंगठ्याची रोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या झाली. संधिवातामुळे या रुग्णाच्या डाव्या पायाच्या अंगठ्याला तीव्र वेदना होत होत्या आणि यामुळे त्याच्या हालचालींवर परिणाम झाला होता. आता या शस्त्रक्रियेमुळे त्याला पूर्णपणे हालचाल करता येईल. अस्थिरोग शल्यचिकित्सक डॉ. संपत डुंबरे पाटील आणि डॉ. सेलेन पारेख यांनी ही शस्त्रक्रिया केली. 

याविषयी अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. डुंबरे पाटील म्हणाले, ""सांधे एकमेकांवर घासू नयेत यासाठी मधे कुर्च्या असतात. वयोमानानुसार, तसेच संधिवातासारख्या विकारांनी या कुर्च्यांची झीज होते. त्यातून रुग्णाला प्रचंड वेदना होतात. पायाच्या अंगठ्यातील झिजलेल्या कुर्च्यांवर उपचारासाठी फ्यूजन शस्त्रक्रिया केली जाते. यातून रुग्णाच्या वेदना कमी होत असल्या तरीही हालचालींवर मर्यादा येते. त्यातून मार्ग काढण्यासाठी कृत्रिम कुर्च्या बसविण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली.'' 

डॉ. सेलेन पारेख यांनी 10 व्या "पारेख इंडो-यूएस फूट ऍन्ड अँकल सर्जरी कॉन्फरन्स'मध्ये केलेली ही "कार्टिवा सिथेंटिक कार्टिलेज इम्प्लांट' शस्त्रक्रिया उपस्थित डॉक्‍टरांसाठी थेट प्रक्षेपित करण्यात आली. डॉ. रॉब हॉलोवे, डॉ. बोनी चेन, डॉ. डॅनी स्कॉट आणि डॉ. मल्हार दवे यांचा शस्त्रक्रिया पथकात समावेश होता. 

अशी झाली शस्त्रक्रिया

कृत्रिम कुर्च्या बसविण्यासाठी कॉन्टॅक्‍ट लेन्ससारख्या कृत्रिम साहित्याचा वापर केला जातो. ते एकमेकांवर बसविले जातात. त्याचा आकार एखाद्या रेझरच्या ब्लेडससारखा दिसतो. हे त्यानंतर दोन हाडांमध्ये बसविले जाते. त्यांच्या आकारामुळे ते हाडांमध्ये संपूर्णपणे जात नाही आणि थोडे बाहेर राहिल्यामुळे दोन्ही हाडे एकमेकांना घासत नाहीत.

त्यामुळे नैसर्गिक हालचाल करतानाही रुग्णाला वेदना होत नाहीत. या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला दुसऱ्या दिवशी घरी पाठविण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर लवकर बरे होण्यामध्ये फिजिओथेरपीचा महत्त्वाचा वाटा असतो. पुढील चार आठवड्यांतच रुग्ण आपले दैनंदिन कामकाज सुरू करू शकेल, असा विश्‍वासही डॉ. डुंबरे पाटील यांनी व्यक्त केला. 

Web Title: Artificial Kurcha in the Thumb